शैलीकार यशवंतराव ५६

प्रकरण ७ - महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे वारकरी

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत कै. यशवंतराव चव्हाणांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे.  आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला.  यामुळे सामान्य लोकांतही जागृती झाली.  सत्तेचे विकेंद्रीकरण केले.  सहकारी चळवळीला उत्तेजन दिले.  ग्रामीण जीवनाचा कायापालट केला.  माणसांचे कसब, गुण, कर्तृत्व याविषयी यशवंतरावांना अतिशय आस्था होती.  तसेच समाजातल्या गोरगरीब, रंजल्या-गांजल्यांबद्दल त्यांचे मनही अवाढव्य होते.  त्यामुळे समाजातील गुणी, कर्तृत्ववान जनतेस त्यांचा आधार होता.  सत्ताधारी हा असा असावा लागतो.  आज दुर्दैवाने भ्रष्टाचार सर्वत्र सरकारच्या आणि सहकाराच्या अनेक खात्यांतून व संस्थांतून दिसून येतो आहे.  सत्ताधारी हा असा असावा लागतो.  गांजलेल्यांना, पीडितांना तो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्याचा आधार वाटावा.  यशवंतराव हे तसे होते म्हणून ते जनतेचे मार्गदर्शक केंद्रबिंदू बनले.  लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत.  यशवंतराव हे केवळ वारसा हक्काने नेते बनले नव्हते, तर लोकांचे लोकनेते होते.  अशा वेळी यशवंतराव चव्हाणांचे सहकारी चळवळीविषयीचे विचार एखाद्या दीपगृहाप्रमाणे सर्व समाजाला मार्गदर्शक ठरतील.

यशवंतरावांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला असला तरी आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर व बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी राजकीय जीवनात विविध पदांवर काम केले.  अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या उपपंतप्रधानांपर्यंत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळ्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला.  यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते.  राजकारणाच्या क्षेत्रात राहून त्यांनी आपले अनेक छंद जोपासले.  मराठी मुलखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळ गंगाधर टिळकांनंतर यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्त्वाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्‍त झाले.  माणसाला व्यक्तिमत्त्व लाभतं पण विभूतीमहत्त्व लाभायला फार मोठी पुण्याई लागते.  व्यक्तीचं कर्तृत्व जेव्हा बौद्धिक चिकित्सेच्या पलीकडे जाते तेव्हा ती विभूती होते.  यशवंतरावांनीसुद्धा आपल्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाने स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखविले.  रूढ अर्थाने कोणत्याही प्रकारची अनुकूल पार्श्वभूमी व वातावरण नसतानाही केवळ असामान्य कलागुण, अखंड खडतर मेहनत यामुळेच ते लोकनेते व राज्यकर्ते बनले.  महाराष्ट्राच्या राजकीय व सहकार क्षेत्रात त्यांचे कार्य इतके व्यापक व सर्वस्पर्शी आहे की, आज जे प्रगत महाराष्ट्राचे चित्र आपण पाहतो, अनुभवतो ते उभे करण्याचे योगदान यशवंतरावांचे फार मोठे आहे.  त्यांचे हे ॠण कधीही न फिटण्याइतके मोठे आहे.  महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषी औद्योगिक सहकार परिवर्तनाचा नवा दृष्टिकोन त्यांनी जनतेसमोर ठेवला.  ग्रामीण भागाचा कायापालट केला.  कष्टकरी आणि कामगार माणसाला माणूस म्हणून विकासाच्या नव्या वाटेवर स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्‍न केला.  म्हणूनच त्यांच्या हयातीत लोकांचे प्रेम लाभले.  आजही अलोट प्रेम त्यांच्याबद्दल आहे.  श्रमाइतके व घामाइतके जगामध्ये काही सुंदर नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती.  श्रमिकाविषयी म्हणूनच त्यांना फार मोठा जिव्हाळा व जवळीक वाटत होती.  

सहकारी प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रात औद्योगिक प्रगती झाली.  साखर कारखाने, सूत गिरण्या, कापड कारखाने, तेल गाळणे, फळ प्रक्रिया इत्यादी उद्योगधंद्यांची निर्मिती सहकारी तत्त्वांवर झाली.  हजारो सर्वसामान्य व्यक्तींनी आपले भांडवल व श्रम संघटीत केले आणि उद्योगधंद्याला चालना मिळू लागली.  त्यामुळे शेतीप्रधान महाराष्ट्राचे रूपांतर औद्योगिक महाराष्ट्रात होण्यास सहकाराने मोलाची कामगिरी बजावली.  महाराष्ट्राची ही सहकारी चळवळ देशात सर्वात आघाडीवर आहे.  ही चळवळ अग्रेसर असण्याचे श्रेय प्रामुख्याने या चळवळीला लाभलेल्या निःस्पृह आणि थोर नेतृत्वास द्यावे लागेल.  या चळवळीतील कै. लल्लूभाई सामळदास, कै. वैकुंठ मेहता, कै. डी. जी. कर्वे, कै. भास्करराव जाधव, कै. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, कै. धनंजयराव गाडगीळ, कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतदादा पाटील, कै. गुलाबराव पाटील यांच्या थोर नेतृत्वाची परंपरा असलेल्या विचारवंतांना द्यावे लागेल.  या विचारवंतांनी सहकारी सूत गिरण्या, सहकारी सोसायट्या, सहकार खरेदी-विक्री संघ, सहकारी बाजार समित्या, सहकारी बँका यांसारख्या सहकारी संस्थांचे जाळे विणून सहकारी चळवळ नावारूपाला आणली.  या चळवळीला खरी दिशा दिली ती कै. यशवंतराव चव्हाण यांनी.