शैलीकार यशवंतराव ५१

यशवंतराव तसे घट्ट मनाचे नेते होते.  त्यांच्या अंतर्मनात डोकावणे कठीण.  तसे ते कमालीचे मुत्सद्दी आणि अत्यंत सावध, विचारांनी समृद्ध व आचाराने निष्कलंक.  म्हणून त्यांचा अनेकांनी उल्लेख केला आहे.  विचारांची संस्कारक्षमता, भावनेची कोमलता आणि बुद्धीचे औदार्य यांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.  ते सर्वांशी मिळतेजुळते घेत. मुद्दाम कुणाला दुःख द्यावे, कोणाचा अवमान करावा हे त्यांच्या स्वभावात नव्हते.  कटुता न ठेवणे आणि कटुता नसणारे वातावरण निर्माण करणे हाच त्यांचा स्वभावधर्म बनला होता.  या स्वभावाला अनुसरूनच त्यांचे वागणे आणि बोलणे होते.  पक्षामध्ये डावे नि उजवे यांचा सुवर्णमध्य साधण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला.  आयुष्यभर त्यांनी विवेकाने वागण्याचा प्रयत्‍न केला.  अनेक संकटे आली पण विवेक सुटू दिला नाही.  दुसर्‍यांचे विचार कमीत कमी वेळात समजावून घेण्याची कला त्यांनी चांगलीच अवगत केली होती.  एवढेच काय एखाद्याचा एकदा परिचय झाला की ते चिरकाल आपल्या टवटवीत स्मृतिकमळात साठवून ठेवत.  या त्यांच्या गुणग्राही स्वभावामुळे त्यांनी अनेक टीकाकारांनाही आपले मित्र बनवले.  त्यांच्या खेळकर, मनमोकळ्या अन् मिश्किल नम्र विनोदातून हास्याची कारंजी निर्माण होत असत.  आणि टीकाकारांच्या त्या टीकेच्या पिचकार्‍या त्या कारंज्यात अदृश्य होत असत.  लोकांमध्ये राहण्याची त्यांना हौस असे.  लोकांपासून दूर जायचे, त्यांची पर्वा करायची नाही, असे त्यांना कधीच वाटले नाही.  एखादी गोष्ट त्यांच्या मनाला पटली नाही व नाईलाजाने करावी लागली तर ते बेचैन होत असत.  असा हा माणुसकीला जपणारा 'माणूसवेडा' माणूस होता.  एखाद्यावर भरभरून स्नेह करणारा, त्याला त्या वर्षावात चिंब भिजवणारा, हवाहवासा वाटणारा अत्यंत चारित्र्यवान माणूस होता.

यशवंतरावांची शरीरयष्टी फार उंच आणि धिप्पाड अशी नव्हती.  बांधा मध्यम प्रकारचा होता.  त्यांची प्रकृती फार स्थूलही नव्हती आणि फारशी सडपातळही नव्हती.  रंग सावळा, रुंद चेहेरेपट्टी, भव्य कपाळ आणि जबडा मोठा होता.  नाक काहीसे मोठे, पांढरे शुभ्र दात, आणि भुवयांच्या खाली लखलखणारे चमकदार टपोरे डोळे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.  पांढरे स्वच्छ धोतर, सैलसा पांढरा अंगरखा आणि पांढरीशुभ्र अणकुचीदार टोरी असा त्यांचा पोशाख होता.  अधुनमधून ते जाकीट वापरत असत.  विदेशात मात्र कोट, सूट, पँट असा पोशाख असे.  सुरुवातीस मात्र अंगरखा, धोतर व पटका असाच त्यांचा पोशाख होता.  थंडीच्या दिवसात तंग तुमान आणि अचकन वारत असत.  त्यांच्या पोशाखात भपकेबाजपणा किंवा डामडौल अजिबात नव्हता.  परंतु स्वच्छ व नीटनेटके कपडे त्यांना आवडत असत.

त्यांना सिगारेट ओढण्याचा छंद होता.  नंतर काही दिवसांकरिता त्यांनी हे व्यसन बंद केले.  अन्य दुसरे कसलेही व्यसन त्यांना नव्हते.  सुरुवातीला त्यांचा स्वभाव तापट होता.  पण नंतर या स्वभावाला त्यांनी मुरड घातली.  त्यांची घरची राहणी साधीच होती.  त्यामध्ये बडेजावपणा, भारदस्तपणा अथवा खानदानीपणाचा आव अजिबात नव्हता.  उलट दुःखितांच्या अंतःकरणात डोकावण्याचा छंद त्यांनी मनाला लावून घेतला.

व्यक्ती समाजात कशी वावरते यावरून तिचे व्यक्तिमत्त्व ठरवता येत नाही कारण काही व्यक्ती घरात एक व बाहेर एक चेहरा धारण करतात.  पण यशवंतराव जसे बाहेर होते तसेच घरातही.  सगळीकडे स्वच्छ पारदर्शकता, मनही पारदर्शक.  वेणूताई व यशवंतराव दोघेही देवावर श्रद्धा ठेवणारे होते.  आंघोळ झाल्यानंतर देवघरात जाऊन देवाला व साईबाबांच्या मूर्तीला नमस्कार केल्याशिवाय ऑफीसला जायचे कपडे घालत नसत.  देव्हार्‍यात जवळपास सर्व चांदीचे देव होते,  आणि देवघरात सर्व लहानथोर मृत नातेवाईक व जिव्हाळ्याच्या लोकांचे फोटो होते.  कोणत्या व्यक्तीचे स्थान कोठे आहे याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती.  रोज रात्री जेवणानंतर ९:३० च्या सुमारास सरकारी कागद पाहून झाल्यानंतर ते एखादे पुस्तक हातात घेत.  घड्याळाकडे लक्ष न देता वाचन चालू असे.  डोळे थकले म्हणजे वाचन बंद करीत.  यशवंतराव कृष्णकाठचे रहिवासी.  त्या भागातील माणसे कशी मराठमोळी रांगडी.  तिखट जेवण पसंत करणारी.  त्यामुळे ज्वारीची भाकरी आणि कांदेवांग्याची भाजी हे त्यांचे आवडते जेवण.  मांसाहारही त्यांना आणखी जास्त पसंत होता.  गोड कमी आवडत असे.  भात हा त्यांच्या आवडीचा पदार्थ.  मुंबईत असताना ते चहा पीत असत.  दिल्लीला आल्यापासून कॉफी.  त्यांना खेळाची आवड होती किंवा नाही याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही.  पण लहानपणी व्यायाम मात्र करीत असत.  पुढेपुढे राजकारणाच्या व्यापामुळे फक्त चालण्याचा व्यायाम घेत, तोही घरात.  यशवंतराव निसर्गवादी आणि मानवतावादी होते.  देवावर विश्वास होता.  पण देवभोळे नव्हते.  वयाच्या चाळीशीनंतर दिवसातील काही क्षण ते प्रार्थनेत व्यतीत करत असत.  मातापित्यानंतर त्यांनी म. गांधींना स्थान दिले.  म्हणून म. गांधी हे त्यांचे दुसरे श्रद्धास्थान.  ते स्वतः गांधीवादी जीवन जगले आणि इतरांनाही गांधीवादाचे धडे त्यांनी दिले.  

लहान मूल ज्याप्रमाणे कुतूहलाने जगाकडे पाहते, त्याच्या परीने जग समजून घेण्याचा प्रयत्‍न करते, नजरेत अफाट कुतूहल आणि हालचालीत धडपड असते, तसेच काहीसे कुतूहल उराशी बाळगून यशवंतराव जगले, यशस्वी धडपड केली.  जीवनातील प्रत्येक प्रसंगातून आशेच्याच किरणाकडे पाहात राहिले.  वेणूताई जोपर्यंत हयात होत्या तोपर्यंत निराशा कधी त्यांना शिवली नाही.  वेणूताईंच्या निधनानंतर मात्र ते हताश झाले आणि थोड्याच दिवसांत हे न भूतो न भविष्यति असे व्यक्तिमत्त्व लोप पावले.