शैलीकार यशवंतराव ५८

या सहकारी कारखान्यामुळे ग्रामीण भागाचे चित्र बदललेच.  शिवाय खेडेगावातील लाखो लोकांना या कारखान्यामध्ये रोजगार मिळाला.  हे साखर कारखाने आता साखर कारखाने राहिले नाहीत तर ते त्या त्या भागाच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची केंद्र बनली आहेत.  म्हणून सहकारी चळवळ ही महाराष्ट्रात इतर प्रांतांच्या मानाने दृष्ट लागावी अशीच आहे.  दुर्बलांना सामर्थ्य देण्याकरिता सहकारी चळवळीचा जन्म झालेला आहे.  यामुळे प्रेरणेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.  असा सल्लाही दिला आहे.  विकासाची ही प्रक्रिया तळाच्या माणसांपर्यंत पोहोचवायची असेल तर विकासाची संघटना व सत्ता जनतेच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांना वाटत होते.

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती करायची असेल, तर शिक्षणाचा प्रसार होऊन जनता शहाणी व समजूतदार झाल्याशिवाय सहकारी चळवळीचा पाया भक्कम होणार नाही.  शिवाय सतत कष्ट करण्याची आवड पाहिजे.  म्हणजे श्रमावर भक्ती आणि निष्ठा पाहिजे.  तरुण माणसाने नेहमी आव्हानांच्या शोधात असावे.  धैर्य शाबूत ठेवावे आणि समोर काही ध्येये ठेवावी.  संकटाचीसुद्धा चव घ्यावी लागते, असा सल्ला त्यांनी तरुण पिढीला देऊन जीवनातील वास्तवतेस निर्भयपणे सामोरे जाण्याचा मार्ग ते सांगतात.  यशवंतरावाना सत्तेचा मोह नव्हता.  पण विचारांचा मात्र जरूर होता.  आपल्या बुद्धीच्या जोरावर या सहकारी चळवळीतील संभाव्य धोका देखील ते सूचित करतात, 'सहकार चळवळीत आर्थिक सत्ता आहे, याची जाणीव लोकांत आणि त्याचप्रमाणे सहकारी कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे.  ही चळवळ एका अर्थाने सत्तेचे केंद्र आहे आणि सत्तेचे केंद्र म्हटले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवलाच पाहिजे.  तसे न केल्यास अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल, अशी मला साधार भीती वाटते,' असे चिंतनही ते व्यक्त करतात.  सहकारी चळवळ ही मूलतः जनतेच्या स्वतःच्या प्रयत्‍नांवर आधारलेली असली तरी सरकारनेही त्यावर अंकुश ठेवला पाहिजे.  उद्योगधंद्याची वाढ करून रोजगारी वाढवीत असताना सामाजिक न्यायाकडे दुर्लक्ष होता कामा नये.  यशवंतरावांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शुद्ध शासनाच हमी दिली होती.  ग्रामपंचायती, सहकारी संस्था, इतर सामाजिक स्वराज्य संस्था, अधिकार्‍यांचे विकेंद्रीकरण यांना चालना दिली.  

शेती हा महाराष्ट्रीयन लोकाचा मुख्य व्यवसाय आहे.  तो ग्रामीण विकासाचा गाभा आहे.  या गाभ्याभोवती छोट्या उद्योगधंद्यांची इमारत उभारली पाहिजे.  ही महाराष्ट्राच्या भूमीवर या उद्योगांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन, मदत आणि उत्तेजन असायला हवे.  सामान्य माणसांचे अर्थशास्त्र सहकाराशिवाय सुटणार नाही.

चव्हाण साहेबांच्या जाणीवपूर्वक प्रयत्‍नांतून महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीने नेत्रदीपक प्रगती केली.  या नेत्याच्या विचाराप्रमाणे सहकारी संस्था या व्यावसायिक संघटना असल्या तरी सामाजिक बांधिलकी व समाज परिवर्तनाचे अंतिम उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते, हे विसरता येणार नाही आणि म्हणून इतर कोणत्याही अर्थव्यवस्थेपेक्षा सर्वसामान्यांची हित जपणारी व जोपासणारी अर्थनीती म्हणून सहकारी चळवळीला त्यांनी प्राधान्य दिले.  यशवंतरावांनी सहकाराशिवाय एकही साखर कारखाना महाराष्ट्रात काढायचा नाही, असा निर्णय घेतला.  म्हणून तर आज कोट्यवधी रुपये भांडवली गुंतवणुकीचे साखर कारखाने शेतकर्‍यांच्या मालकीचे म्हणून उभे आहेत.

ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून उद्योगधंद्यांची उभारणी करण्यासाठी औद्योगिक वसाहती स्थापन केल्या.  वीज, पाणीपुरवठा वगैरे सोयी उपलब्ध करून दिल्या.  विजेवर चालणारे अनेक उद्योग प्रत्येक विभाग सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.  महाराष्ट्रात विकास औद्योगिक महामंडळाची निर्मिती निर्मिली झाली.  यामुळे तालुका पातळीपासून ते ग्रामीण भागापर्यंत उद्योगाचे विकेंद्रीकरण झाले.  यामुळे शहराकडे धाव घेणारा कामगारांचा लोंढा थांबविण्यास निश्चितच या सहकारी उद्योगधंद्यामुळे उपयोग झाला.  ग्रामीण भागात सहकारी तत्त्वामुळे शेतीच्या क्षेत्रात शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे काढणे औद्योगिक विकासाची १९६१ मध्ये यशवंतरावांनी दाखविलेली दिशा आज चांगलीच रुळल्याचे आपल्या निदर्शनास येते.

यशवंतराव चव्हाणांनी बॉम्बे स्टेट को-ऑपरेटिव्ह लॅण्ड मॉर्गेज बँकेच्या रौप्यमहोत्सवी प्रसंगी केलेल्या भाषणामध्ये आपले विचार व्यक्त करताना म्हणतात, 'सहकारी चळवळ ही काही एखाद्या पक्षाची चळवळ नव्हे.  तात्त्विदृष्ट्या सहकारी चळवळ ही मूलतः लोकशाही चळवळ आहे.  हे आपण विसरता कामा नये.  या चळवळीमागील हा दृष्टिकोन आपण नीट समजावून घेतला पाहिजे आणि लोकशाहीचे हे स्वरूप कोठेही डागाळणार नाही, अशी आपण काळजी घेतली पाहिजे.'  यशवंतरावांची लोकशाहीवरील निष्ठा ही सजग आणि अविचल होती.  हे त्यांच्या या विचारांतून स्पष्ट होते.