प्रकरण ६ - नेतृत्वाची उभारणी
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणात आपले वेगळेपण सांभाळून अनेक महत्त्वाच्या भूमिका यशवंतरावांनी पार पाडल्या. त्यांचे नेतृत्व हे बहुजन समाजातून वर आलेले होते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात अतुलनीय अभिजात गुणांची जाणीवपूर्वक जोपासना केली होती. त्यांच्या नेतृत्व-उभारणीमध्ये अनुवंशाचा भाग अजिबात नव्हता. पुढारीपण करण्यासाठी कौटुंबिक वातावरण, पैसा, प्रतिष्ठा, परंपरा वगैरे पोषक ठरणार्या बाबी यशवंतरावांच्या वाट्याला आलेल्या नव्हत्या. त्यांचे नेतृत्व स्वकष्टार्जित होते. त्यांनी हेतुपूर्वक आपल्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची उभारणी केलेली होती. त्यामुळेच त्यांच्या या नेतृत्वाचा विकास कसा झाला हे संक्षिप्तपणे पाहणे महत्त्वाचे वाटते. या नेतृत्वउभारणीमध्ये कुटुंबातील माणसे, सहकारी, मित्र, यांनी त्यांना कसे सहकार्य केले तेही स्वतः यशवंतरावांनी आठवणींच्या रूपाने अथवा लेख, भाषणांच्या माध्यमातून सांगितले आहे. या आधारभूत साहित्यातून त्यांच्या नेतृत्वाची उभारणी, पायाभरणी कशी झाली हे पाहणे महत्त्वाचे आहे.
यशवंतरावांनी राजकारणाची धुरा समर्थपणे सांभाळून साहित्य क्षेत्रातही आपली सेवा रुजवली आहे. यशवंतरावांमधील राजकीय नेतृत्वगुण आणि त्यांचे लेखकगुण असलेले व्यक्तिमत्त्व ग्रामीण परिसरातून उदयाला आले होते. अशा या ग्रामीण मातीतून आकारास आलेल्या राजकीय नेत्याच्या कर्तृत्वाची उभारणी कशी झाली हे विस्ताराने मांडण्यापेक्षा त्यांच्या या राजकीय जीवनाचा आणि जडणघडणीचा संक्षिप्त आढावा घेणे उचित आहे. शालेय जीवनामध्ये असताना त्या काळात म. गांधीजींची दांडीयात्रा आणि मिठाचा सत्याग्रह आदी आंदोलने झाली होती. या काळात कृष्णेच्या घाटावर अनेक नामवंत वक्तयांची भाषणे होते. ती भाषणे ऐकण्यासाठी यशवंतराव तासन् तास थांबत असत. त्याचा त्यांच्या राजकीय जीवनावर परिणाम घडत होता. १९२७ च्या सुमारास श्री. भास्करराव जाधव हे तेव्हाच्या मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे उमेदवार म्हणून सातारा जिल्ह्यातून उभे होते. त्यांनी प्रतिनिधी व्हावे अशी यशवंतरावांची इच्छा होती. त्यामुळे या निवडणुकीत एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले. या संदर्भात ते म्हणतात, ''त्या निवडणुकीत मी एक स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो आणि त्यासाठी कराड शेजारच्या चार-दोन गावी जाऊन आलो. निवडणुकीशी माझा जो संबंध आला, तो इतक्या लहान वयात आला आणि तेव्हापासून तो आजतागायत टिकला आहे.'' यशवंतराव विद्यार्थी दशेत असताना अशा नवनवीन विचार प्रवाहांचा संस्कार त्यांच्या मनावर होत होता. १९२९ ला लाहोर येथे रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्यानुसार २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरले. म. गांधीजींचे यासंबंधीचे आव्हान देशाच्या कानाकोपर्यात पोहोचले. कराडलाही हा सोहळा साजरा करण्याचे ठरले. टिळक हायस्कूलच्या आवारातील लिंबाच्या झाडावर काँग्रेसचा झेंडा लावून झेंडावंदन झाले. या मंगल सोहळ्यात वाचण्याचे यशवंतरावांनीच तयार केले होते. भारावलेल्या परिस्थितीत ते पत्र त्यांनी वाचून दाखवले आणि यशवंतरावांचे राजकीय जीवन सुरू झाले. यशवंतरावांचे वय यावेळी अवघे १६ वर्षांचे होते. वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय विचारांचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला. या काळात शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य चळवळीत ते आघाडीवर होते. सातारा, सांगलीमध्ये ते तरुणांचे नेतृत्व करू लागले आणि स्वातंत्र्यचळवळीत कसलीही तमा न बाळगता त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनतर १९३२ मध्ये सरकारविरोधी बुलेटीन वाचण्याचे काम यशवंतरावांनी केले व ह्या गुन्ह्याबद्दल त्यांना १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. याच काळात त्यांच्या विचाराला एक तात्त्वि बैठक प्राप्त झाली. फेब्रुवारी १९३२ मध्ये एक वर्ष ते येरवडा जेलमध्ये होते. आणि नंतरचे ३ महिने त्यांना विसापूरच्या जेलमध्ये ठेवले होते. १९३३ च्या मे महिन्यात ते तुरुंगातून सुटून बाहेर आले. अशा पद्धतीने १९३० आणि १९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेऊन त्यांनी कारावास भोगला. १९३० ते १९४५ या कालखंडात यशवंतरावांनी अनेक वेळा कारावासाच्या शिक्षा झाल्या. त्यावेळी त्यांनी राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले.
ब्रिटिश सरकारने केलेल्या १९३५ च्या राजकीय सुधारणा कायद्याप्रमाणे १९३७ च्या फेब्रुवारी मार्च मध्ये भारताच्या अकरा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पैकी आठ राज्यांत काँग्रेस बहुमताने निवडून आली. या निवडणुकीत सातारा मतदारसंघातून यशवंतरावांच्या प्रयत्नांमुळे आत्माराम पाटील यांना तिकिट मिळाले होते. हे तिकीट मिळविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेऊन त्यांना तिकीट मिळणे कसे महत्त्वाचे आहे हे त्यांच्या कानांवर घातले. सातारा काँग्रेसच्या तरुण-कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या. आणि आत्माराम पाटील बोरगावकर यांना तिकीट मिळाले, तेव्हा त्यांचा प्रचार यशवंतरावांनी सुरू केला. त्याचे वर्णन ते असे करतात, ''दिवस रात्र निवडणूक प्रचाराचे व्यवधान असे. मी सायकलवर बसत असे यावर आज कोणी कदाचित विश्वासही ठेवणार नाही. पण १९३७ च्या निवडणूक मोहिमेत मी निम्मा जिल्हा तरी सायकलवरून हिंडलो असेन.