यशवंतरावांना कळू लागणा-या समयी सातारा जिल्ह्यात विशेषत: सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ चालू होती. त्यांचे बंधूच या चळवळीत एक पुढारी होते. कृष्णाकाठात या सर्व तत्कालीन प्रभावी चळवळीतील इंगीत, उणीवा व जाणीवा यांचे ज्ञान यशवंतरावाना पूर्ववयातच झाले होते. सत्ता हातात आल्यावर या चळवळीच्या पाठीमागचा जो ‘शिक्षण’ हा प्रमुख मुद्दा होता. तो पकडून यशवंतरावानी शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. बहुजनसमाजाच्या चळवळीचे भास्करराव जाधव यांच्याप्रमाणे त्यांनी पुढे जरी नेतृत्व केले नाही, तरी त्यांनी गनिमी काव्याने योग्य ते सत्तेवर आल्यावर जरूरीचे पवित्रे घेतले की, ज्यामुळे राजर्षि शाहू नंतर, महाराष्ट्रातील बहुलोक समाज विशेषत: खेड्यापाड्यातील ग्रामीण समाज अधिक जागृत व अधिक प्रगत झाला. हा राष्ट्रीय प्रवाहात नव्हता. म. फुले व शाहू यांची धारणा अशी होती की – इंग्रजी राज्यात सरकाराशी आपण सहकार्य करू तर शूद्रातिशूद्र यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळेल. शिक्षणाची व व्यवसाय स्वातंत्र्याची दारे सर्वांना प्रथमच खुली झाली आहेत. या दृष्टीकोणातून फुले शाहूच काय पण डॉ. आंबेडकर यांचे स्वातंत्र्यपूर्वकाळातील राजकारण नेमस्त-मवाळ व केवळ प्रागतिक स्वरूपाचे होते. संघर्षवादी व विद्रोहवादी नव्हते. ब्रिटीश सरकारवर विश्वास व्यक्त करणे हा यांचा सर्वांचा जाहिर पवित्रा होता. हा टिळकांना पसंत नसे. म्हणून अंतर पडले. टिळक हायस्कूलमध्ये कराडात यशवंतराव शिकले. टिळकांच्या विषयी त्यांना पूज्य भाव शेवटपर्यंत होता. तरी यशवंतराव हे टिळक संप्रदायी नव्हते. म्हणजे त्यांना समाजसुधारणावादी प्रवाहाला विरोध करावयाचा नव्हता. गांधी यांच्यामध्ये समाजसुधारणा, अस्पृश्या निवारण व राजकीय सुधारणा यांचा पुरस्कार व पाठपुरावा एकाचवेळी चालल्यामुळे समाजसुधारणावादी पक्षाची एकपरी सोय होऊन, ते म. गांधीच्या जवळ लवकर जाऊ शकले. गांधींच्या शिक्षण प्रसाराला व अस्पृश्यतानिवारणाला विरोध नव्हता. टिळकांच्यावेळी महाराष्ट्रातील ‘फुले शाहू’ यांचा बहुजन समाज टिळकांच्या मागे तेवढासा नव्हता. गांधी काळात काँग्रेसपासून लांब राहाण्याची जी कारणे पूर्वी होती, ती संपुष्टात आली. गांधी यांची स्त्रीविषयक मते देखील समाजसुधारणेला प्रतिकूल नव्हती. यशवंतरावाचे समाज कारण जाणण्यासाठी ही सर्व पूर्व ऐतिहासिक, सामाजिक अवस्था चांगली जाणून घेतली पाहिजे. यशवंतरावानी कृष्णा काठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘खाकसार’ म्हणून संबोधिले आहे. कर्मवीर शिंदे तर धर्म व समाज सुधारणावादी होते.
कर्मवीर शिंदे व यशवंतराव
असा विवेक करून मग हा विषय स्पष्ट होतो. १९१७ सालापासून कै. वि. रा. शिंदे बहुजन समाजाल सांगित होते की, ‘तुम्ही काँग्रेसमध्ये जा’ राष्ट्रीय प्रवाहापासून दूर राहू नका. शिंदे राजकारणात व समाजकारणातही जहाल होते. म्हणून ते मवाळ व सहकार्यवाही ब्राह्मणेतर पक्षाचे प्रत्यक्ष नेते झाले नाहीत. परंतु सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे एक सहानुभूतीदार समीक्षक व सल्लागार शिंदे होते. यशवंतरावदेखील विरोधक नव्हते. पण त्यांना दोघांना फक्त ब्रह्मद्वेष आवडत नसे. शिंद्यांनाही केवळ ब्राह्मण विरोध आवडत नसे. या दोघांनाही उच्चभ्रूंच्या विषयी वागणुकीचा अनुभव आला होता. कृष्णाकाठात असे काही कटू सामाजिक अनुभवाचे नमुने यशवंतरावानी दिले आहेत. पंक्तीप्रपंच यशवंतरावांनी देखील गिळला होता! जवळकरांचे प्रतिक्रियात्मक क-हाडला झालेले भाषण यशवंतरावांनी ऐकिले होते व त्यांच्या टिळक द्वेषात व विरोधात ब्रिटीश धार्जिणे फक्त राजकारण यशवंतरावाना दिसले. म्हणून ते जवळकरांच्या चळवळीपासून संपूर्ण दूर राहिले. फार काय साता-याचे भाऊराव पाटील यांच्याजवळही ते अगोदर फारसे मुळीच गेले नव्हते.