यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : २६

महर्षि शिंदे व केशवराव जेधे

मागे कै. केशवराव जेधे (व जवळकर) यांचा उल्लेख इंग्रज सरकाराकडे तर त्यांचा कल नाही ना? अशी शंका यशवंतरावांना जवळकरांची तुफानी व्याख्याने ऐकून आली होती (पृ. ३०). पण तीस सालच्या चळवळीत महर्षि शिंदे व केशवराव जेधे तुरूंगात गेले याचा परिणाम ग्रामीण तरूणांवर फार झाला. “ब्राह्मणेतर चळवळीपासून बाजूला निघून केशवराव जेध्यासारखा तरूण नेता स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. याचा आम्हाला आनंद झाला” असे चव्हाण म्हणतात (पृ. ९२). पण जेधे यांना प्रोत्साहन देणारे व बहुजनसमाजाने गांधी-नेहरूंच्या काँग्रेसमध्ये जावे; असा उघड उघड सल्ला देणारे महर्षि शिंदे यांचे या बाबतीतील जेष्ठत्व चव्हाणांनी वाचकांच्या ध्यानात आणून दिलेले नाही ही त्रुटी वाटते. “जेधे व शिंदे’ यांना एकाच मापनाने मापले. सायमन कमिशनवर बहिष्कार घाला असा विचार ब्राह्मणेतर पक्षाच्या सभेत कर्मवीर शिंदे यांनी मांडला. भाऊराव पाटील देखील बहिष्काराच्या बाजूचे होते. ब्राह्मणेतर पक्षात व चळवळीत जहाल व मवाल (सहकारवादी नेमस्त) असे दोन पक्ष पडले. जहाल पक्षाचे बहुमत होऊन उत्तरोत्तर गांधींच्या तिरंगी झेंड्याखाली बहुतेक बहुजनसमाज गेला. तेव्हा सन १९३४ साली मराठा विद्यार्थ्यांच्या सभेत पुणे येथे शिवाजी हायस्कूलातील भाषणात म. शिंदे म्हणाले की- “ब्राह्मणेतर पक्ष बरखास्त झाला नसून त्याने काँग्रेस व्यापली.” ब्राह्मणेत्तरांचे राष्ट्रीयकरण करण्यात शिंदे विजयी झाले. कै. भास्करराव जाधव वगैरे तत्सम इंग्रज धार्जिण्यांचे राजकारण संपले व पुढे शिंदे म्हणाले की- ‘वेगळ्या ब्राह्मणेतर पक्षाची व त्याच्या अधिवेशनाची गरजच नाही’ पस्तीस सालानंतर ब्राह्मणेतर पक्ष संपला. चव्हाणांनी जे परिवर्तन केले; ते त्यांच्यापुरते व्यक्तिगत मर्यादित नव्हते. नाना पाटील, बागल, जेधे, लठ्ठे वगैरे अनेक ह्यात सामावतात. परिवर्तन सामाजिक होते व ही बहुजन समाजातील क्रांती सर्व त्यावेळच्या मुंबई इलाख्यात व त्यातील महाराष्ट्रात झाली. टिळकांच्याप्रमाणे म. गांधी यांची समाजसुधारणा व अस्पृश्यता निवारक क्षेत्रात पडती बाजू नव्हती. शिवाय त्यांचा दृष्टिकोन ग्रामभिमुख होता. स्वत: गांधी जन्माने ब्राह्मण नव्हते. त्यांना काँग्रेस शेतक-यांची व सर्वसामान्य जनतेची समाजसुधारणा करावयाची होती व प्रत्यक्ष केली. ब्राह्मणेतर पुढा-यांना भेटून त्यांच्याशी संवाद व संपर्क साधून गांधींनी सर्व वर्ग व सर्व थर आणि जाती जमाती व अनेक धर्म यांचा स्वराज्याप्रित्यर्थ विश्वास संपादण्यात टिळकांच्यापेक्षा व्यापक व सर्वत्र भारतात जय मिळविला. ‘गांधी-नेहरू बद्दल श्रद्दा हीही कारणीभूत झाली’ (पृ. ९२). असे निवेदून चव्हाण मान्य करतात की, ‘पण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर हा जो ग्रामीण समाज हलला त्याचे काही श्रेय विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांना दिले पाहिजे’. शिंदे –जेधे यांनी प्रथम सत्याग्रहात उडी घेतली नसती तर गांधींच्या मागे महाराष्ट्र जाण्यास फार वेळ लागला असता.

ब्राह्मणेतर चळवळीपासून बाजूला होत केशवराव राष्ट्रीय चळवळीत गेले; याचा चव्हाणांना आनंद वाटला. पण केशवराव जेधे हे कर्मवीर शिंदे यांना अगदी तरूणापासून गुरूस्थानी मानीत. अस्पृश्योद्धारक कार्यात पडण्याची स्फूर्ती देखील गुरूवर्य शिंदे यांच्यापासून केसवरावांनी घेतली व तुरुंगात सत्याग्रह करून जाण्याचा आग्रह व तगादा शिद्यांनीच केला. जेधे-गाडगीळ मध्यवर्ती कौन्सिलला उभे राहिले; तेव्हा महर्षि शिंदे यांनी पाठिंबा दिला. पुढे महर्षि शिंदे आजारी पडले व १९४४ साली निवर्तले. जेधे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रांताध्यक्ष झाले. शिंद्यांच्या राजकीय आशाआकांक्षा ‘जेधे केशवराव’ यांच्या चरित्रात श्री. य. दि. फडके यांनी दिला आहे. तो सर्व कृपया वाचावा.