यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : २७

हरिभाऊ लाड यांनी विठ्ठल रामजी यांनी येरवडा तुरूंगातील चव्हाणांना सांगितलेली आठवण मोठी हृद्य आहे (पृ. ९१-९२). त्यावरून दुस-यांना मदत करणारा शिंद्यांचा स्वभाव समजतो. लाड हे अपंग असत.

हरीभाऊ लाड यांच्याकडून जेवढे समजले तेवढेच विचार चव्हाणांनी मांडले आहेत. वास्तविक महर्षि शिंदे व केशवराव जेधे हे महाराष्ट्रातील प्रभावी पुढारी होते. इंग्रज सरकारने येरवडा तुरूंगात दिवाण कै. भास्करराव जाधव यांना शिंद्यांचे मन वळविण्यास पाठविले होते. तरी शिंद्यांनी माफी मागितली नाही. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे :- ‘विठ्ठल रामजी शिंद्यांचे व्यक्तिमत्व वेगळ्या त-हेचे होते. त्यांची बैठक समजासुधारकाची आणि काहीशी अध्यात्मिक होती’. पण एवढ्याच पुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. शिंद्यांनी व्यापकपणे न्याय देणे, जरूरीचे वाटते.

मुसलमान, ब्राह्मणेतर व दलित या वर्गांनी राष्ट्रीय प्रवाहापासून दूर राहून इंग्रजांच्या फुसीनुसार स्वराज्याच्या चळवळीला विरोध करू नये. त्यांनी त्यांची उन्नती करावी. पण इंग्रजांचा कक्षा ओळखावा. शिंद्यांची दुसरी धारणा अशी होती की- सत्यशोधक समाजाचे कार्य मूळच्या ब्राह्मोसमाजाच्या एकात्मक पायावर करावे. शिंदे इहवाद व अध्यात्मवाद ह्यात फरक करत नव्हते. शिंदे समन्वयवादी होते; संसार व राजकारण धर्म्य झाले पाहिजे. ‘विठ्ठल रामजींच्या मनात गांधींबद्दल आत्यंतिक आदर होता’ असे जे हरिभाऊ लाड यांनी चव्हाणांना सांगितले होते, ते (पृ. ९२) गुरूवर्य अण्णासाहेब शिंदे यांच्या सहवासात आलेल्या प्रस्तुत लेखकाने अनुभविले होते. म. गांधींच्या जवळ जाणारे शिंदे हे बहुजनसमाजातील पहिले ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकर्ते होते.

‘शहरातून स्वराज्याची चळवळ जी खेडेगावात गेली, ती १९३० च्या आंदोलनात आणि त्यामुळे एक महत्त्वाचा सामाजिक बदल झाला’ (पृ.९७) चव्हाणांनी जो येथे ‘सामाजिक बदल’ सांगितला आहे. तो टिळक काळात का होऊ शकला नव्हता? व १९३० च्या गांधी चळवळीपासून महाराष्ट्रातील बहुजनसमाज व विशेषत: जो ग्रामीण समाज स्वराज्याच्या लढ्यात मोठ्या संख्येने उतरू लागला; यांची स्वानुभवपूर्वक मीमांसा व त्यांच्या स्वत:चा प्रयत्न पुढे सांगितला आहे (पृ. ९७). लो. टिळक यांच्यामुळे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हा संदेश वरच्या पांढरपेशा विचारवंतापुरताच मर्यादिक राहिला होता; तो खेड्यापाड्यातील सामान्य शेतक-यापर्यंत जाऊन पोहोचला, असे चव्हाण निवेदतात.

सत्यशोधक माधवराव बागल

या संबंधाने कोल्हापूरचे प्रसिद्ध सत्यशोधक पुढारी माधवराव बागल यांच्या अध्यक्षत्वाखाली मसूर (ता. कराड) येथे झालेल्या परिषदेचा वृत्तांत दिला आहे व मालवीय यांच्या भाषण प्रसंगी
क-हाड येथील सभेला पुण्याचे श्री. न. चि. केळकर यांना अध्यक्ष म्हणून नेमण्याच्या घटनेचा वृत्तांत दिला आहे. वादळ शमविण्यासाठी भाऊसाहेब बटाणे व केळकर यांना अर्धे-अर्धे अध्यक्षपद देण्यात आले. ही जरी तडजोड असली; तरी सर्वसामान्य जनता व तिचे पुढारी जागृत झाल्याचे चिन्ह होते. हळूवार भाषेत चव्हाण कृष्णाकाठच्या घटना मांडतात (पृ. १०५-१०६).