चव्हाण यशवंतराव पुढे लिहितात-
ब्राह्मणांचा द्वेष केलाच पाहिजे हे टोक मान्य करणारी कित्येक माणसे जोतिरावांच्या समकाळात व नंतरही होती. यशवंतरावांना यापैकी पुढील अग्रगण्य मानावे लागते. बंधू गणपतराव यांनाही ब्राह्मण विरोध फक्त महत्त्वाचा वाटत होता, असेही नव्हते. “सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक बाबतीत या (ब्राह्मण) मंडळींनी इतर समाजाची गळचेपी केलेली आहे, यातून मुक्त नको का व्हायला?” बंधुद्वय गणपतराव व यशवंतराव यांच्यामधील संवादाचे मुद्देसूद स्वरूप असे वरीलप्रमाणे होते. गणपतराव यांनी यशवंतरावांची समजूत पटावी म्हणून त्यांना पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले म. जोतिराव फुले यांचे पहिलेच असे एक छोटे चरित्र वाचावयास दिले. यशवंतरावांनी हे चरित्र लक्षपूर्वक वाचले ‘जेधे – जवळकर’ कालखंडात चळवळीला क्रिया – प्रतिक्रियेचे स्वरूप आले होते.
‘ब्राह्मण द्वेष’ वावडा वाटला
ह्या काळात बहुजनसमाजाच्या चळवळीत न भूतो न भविष्यति! असे द्वेषाचे व ब्राह्मणसमाजाच्या विरोधाचे स्वरूप प्राप्त झाले होते; हे खरे! बंधूराज गणपतराव यांच्याशी यशवंतराव चर्चा करीतच राहिले. चर्चा करणे हा एक सत्यशोधनाचा मार्ग ठरतो. यशवंतराव सांगतात:- “फुल्यांचे चरित्र वाचल्यानंतर मला काही तरी नवीन वाचल्यासारखे वाटले. त्यांनी उभे केलेले प्रश्न महत्वाचे आहेत. पण त्यासाठी कोणत्या तरी एका जातीचा द्वेष केला पाहिजे, ही गोष्ट मला पटली नाही. जे समाज मागे पडले आहेत. त्यांना जागृत करणे त्यांच्यात नवीन धारणा निर्माण करणे हाच एक मार्ग उत्तम आहे. अशी माझी बाजू होती” (पृ. ३४). कै. गणपतराव त्यांची बाजू त्यांना सांगत. कै. कळब्यांच्या ‘विजयाश्रमात’ जी फुल्यांची शिकवण त्या काळात दिली जात होती; तिच्यापेक्षा मूलभूत व विधायक दृष्टी म. फुल्यांच्यात यशवंतरावांनी पाहिली. गणपतराव व यशवंतराव यांच्यामधले हे अंतर पुढे म. गांधींच्या राष्ट्रीय चळवळीत संपलेच. दोघेही स्वातंत्र्य सैनिक झाले. मातोश्री विठाबाई, पत्नी कै. सौ. वेणूबाई आदीकरून सर्वांनी चव्हाणांच्या देशभक्तीला साथ दिली. चव्हाणांच्या कुटुंबियावर जो राष्ट्रीय स्वराज्यवादी परिणाम होऊ लागला; त्यांचे कारण म. गांधी यांचे नवे नेतृत्व होय. टिळकांचेच जुने नेतृत्व असते तर हा बदल अशक्य होता. डॉ. आंबेडकर व टिळक –गांधी-नेहरू वगैरे राष्ट्रीय पुढा-यांत का फरक पडला हे चव्हाणांच्या पुढे प्रश्न असत.
लो. टिळकांचा परिणाम
चव्हाणांना सामाजिक स्वातंत्र्यापेक्षा राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अगत्याची वाटली. क-हाडच्या टिळक हायस्कूलमधील यशवंतराव चव्हाण हे एक विद्यार्थी होते; त्यांना टिळकांविषयी खूप वाचावयास मिळाले व टिळकांच्या विषयीचा आदरभाव आमरण राहिला. महर्षी शइंदे व डॉ. आंबेडकर यांनी टिळकांच्या पडत्या सामाजिक मनाबद्दल त्यांचा कठोर समाचार घेतला होता. जवळकरांची भाषा उग्र होती. डॉ. आंबेजकर यांनी ‘मूकनायकाच्या’ पहिल्या अंकात जवळकरांचे टिळक विरोध विचार भारदस्त मांडले आहेत. यशवंतरावांना महाराष्ट्र ब्राह्मणेतर चळवळीची काही काळ जरूरी का वाटली व ह्या चळवळीला ग्रामीण जनतेने काही काळ तरी पाठिंबा का दिला? वगैरे प्रश्न उद्भवतात.