यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : २९

सत्यशोधक चळवळीचे स्वरूप

‘महाराष्ट्र सत्यशोधक विचारांची एक चळवळ १९२२-२३ सालपर्यंत झाली. त्यावेळी तिच्यामध्ये मूळ जोतिबा फुल्यांच्या प्रेरणा कार्य करीत होत्या. जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्या मंडळींशी बोलले की, याची थोडी फार कल्पना येत असे. त्यानंतरही सत्यशोधक विचरांचा प्रसार करणारे केशवराव विचारे यांच्यासारखी निष्ठावान मंडळी काम करीत होती आणि त्यांना या सामाजिक प्रेरणा अजूनही महत्त्वाच्या वाटत होत्या. पण सत्यशोधक समाजाच्या पाठीमागच्या सामाजिक प्रेरणआ कुठे तरी मध्येच गळून पडल्या असाव्यात आणि मुख्यत: जो प्रवाह शिल्लक राहिला, तो ब्राह्मणेतर चळवळीचा. सरकारी नोक-यामध्ये महत्त्वाचा हिस्सा असावा, राजकीय सत्ता जी थोडी फार होती किंवा मिळेल; अशी आशा होती, तीमध्ये योग्य तो वाटा मिळावा, ही त्या चळवळीची ध्येये होती, असे दिसते’ (पृ. ९२ व ९३).

वरील उता-यावरून म. फुले यांच्या वेळची चळवळ व यशवंतरावांच्या काळात चाललेली चळवळ यातील तफावत मोजक्या शब्दात यशवंतरावांनी व्यक्त केली आहे. इंग्रज सरकारने जे हक्क दिले होते व देणार! देणार!! म्हणून जाहीर होत होते; त्यामुळे ब्राह्मणेतर पक्षाचेही समाधान होणे अशक्य झाले. यामुळे तरूण पिढीला ब्राह्मणेतर चळवळीच्या मर्यादा ओलांडून पुढे जावे लागले. दुसरी गतीच नव्हती!

वरील चळवळीत आपला समाज कसा पुढे येईल असा विचार करणारे केशवराव विचा-यांच्यासारखी निष्ठावान माणसे होती. सत्यशोधक चळवळीत निष्ठावान काही माणसे होती हे चव्हाणांना दिसले होते. पण देशाला स्वराज्य मिळाले पाहिजे; हा राष्ट्रव्यापी गांधींचा विचार त्यांच्या मनात व सर्वत्र प्रभावी ठरला व लहान मोठ्या सामाजिक-धार्मिक सुधारणापर चळवळी व उपक्रम मागे पडले. सत्यशोधकीय ब्राह्मणेतर चळवळ राष्ट्रीय चळवळीने गिळली.

आज स्वातंत्र्य आले आहे व असा नव्या काळात यशवंतरावजींनी वरील चळवळीतील गुणदोष स्वच्छपणे दर्शविले याचे चिंतन नव्या पिढीने करावे.

सत्यशोधकीय ब्राह्मणेतर चळवळ हे मूठभर प्रस्थापितांच्या विरूद्ध एक बंड होते. बंडाची कारणे चालू पिढीला आता बोथट झाली आहेत. एक इतिहास म्हणून अभ्यास होत असतो म्हणून हे भाष्य साकार केले आहे हा लेख म्हणजे ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्राचे समग्र ग्रंथ परीक्षण नव्हे.

जातीय विचाराच्या पलीकडे

यशवंतरावांनी झेप घेतली. कोल्हापूरला राजर्षि शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जातवारीने बोडींगे निघाली होती. मराठा बोर्डिंग देखील चांगले चालले होते. कृष्णाकाठच्या ह्या आत्मचरित्रात शाहू महाराजांचा शेवटी जोडलेल्या सूचीमध्ये उल्लेख मिळत नाहीत. पण तो पृ. १४८ वर एकदा आढळतो. चव्हाणांनी मराठा बोर्डिंगमध्ये राहाण्याचा विचार मनात देखील न आणता १९३४ सालापासून राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी एक स्वतंत्र खोली कोल्हापूरात घेऊन बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुरे केले. समाजासाठी अगर देशासाठी काही तरी कार्य करावे असे चव्हाणांच्या त्यावेळच्या पिढीत ध्येयवाद होता. विद्यार्थी असतानाही चव्हाणांचे राष्ट्रीय चळवळीकडे लक्ष होतेच. प्रि. बाळकृष्ण यांचे त्यांना सहाय्य व सहकार्य झाले. राजाराम कॉलेजचा विकास शाहू छत्रपती व राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत झाला. पुण्यापेक्षा उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरच यशवंतरावांनी पत्करले. साता-यास कॉलेज नव्हते. शाहू महाराजांचा पाया चव्हाणांना उपयोगी पडलाच नाही; असे म्हणता येत नाही. लोकमान्य टिळकांच्यापेक्षा शाहू महाराजांच्या मुळे बहुजनसमाजात सामाजिक जागृती होऊन स्वतंत्र ‘अस्मिता’ निर्माण झाली हे खरे नव्हे काय?