वाचनाची आवड
सत्यशोधक चळवळीत भाग घेणारे चव्हाणांचे बंधू गणपतराव यांच्यामुळे पूर्ववयात चव्हाणांना पुण्याचा ‘विजयी मराठा’ व बेळगावचा राष्ट्रवीर ही दोन वर्तमानपत्रे वाचावयास मिळत, परंतु त्यामुळे चव्हाणांचे मत झाले की – ही त्या काळातील एकाच व एकांगी विचारांचा परखड प्रचार सतत करीत असल्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम मनावर झालेला होता. (पृ. ३३) प्रस्तुत लेखक समकालीन असल्यामुळे त्यांच्यावर किंवा सातारा जिल्ह्यावरही ह्या पत्रांचा आठ-दहा वर्षे जो परिणाम होत असे; तो पहिली शेतक-यांची जागृती होण्यास उपयोगी पडला. पुढे चव्हाण ‘मजूर’ व ‘श्रद्धानंद’ वगैरे पत्रे वाचू लागले. त्यांच्या वाचनाची आवड, ग्रंथ व साहित्यप्रेम त्यांनी राजकारणात असूनही शेवटपर्यंत वर्धमान ठेविले. हा गुण त्यांना मानणा-यांनी जरूर घ्यावा, कक्षा ओलांडाव्या लागतात. ‘विजयी मराठा’ व ‘राष्ट्रवीर’ यांच्यापुरते त्यांचे वाचन मर्यादित होते; पुढे केळूस्कर-कृत ‘शिवाजी व ‘शिवरामपंत परांजपे’ यांचा ‘काळ’ वाचू लागले. केळूस्कर हे फुले-लोखंडे काळापासून ब्राह्मणेतर चळवळीत होते व शिवाजी चरित्रात शिवाजी महाराजांवर इतिहास संशोधकांनी जे काही अन्याय केले होते; ते निवारणार्थच त्यांच्याकडून लिहून घेऊन प्रसिद्ध करण्यात आले. मराठा शिक्षण परिषदेने यात पुढाकार घेतल्याचे मला स्मरते. शिवाजी महाराज देखील सर्वांनाच स्फूर्तीप्रद वाटत होते.
हिंदुत्ववादी विचाराकडे
क-हाड क्षेत्राचे गाव असल्यामुळे हिंदुत्ववादी विचार-प्रवाह तेथे असणे अटळ होते. हरीभाऊ लाड यांचा ब्राह्मणेतर चळवळीला विरोध नव्हता. तरी त्यांचा कल हिंदुत्ववादी विचाराकडे असे. ‘मी नाही म्हटले, तरी त्यांच्या या मताला काही काल पाठिंबा व काही काळ होकार देत राहिलो’ असे चव्हाणांनी नमूद केले आहे (पृ. ३१). ज्याप्रमाणे ब्राह्मणेतर चळवळीत त्यांना दूषित वातावरण आढळले त्याप्रमाणे ह्याही विचारप्रवाहात त्यांचे समाधान झाले नाही. त्यांचे महत्वाचे एक मित्र हरिभाऊ लाड यांच्या मदतीने त्यांनी ‘शिवाजी उत्सव’ व ‘गणेश उत्सव मेळे’ या सार्वजनिक कार्याची आवड त्यांना त्यांच्या घरातूनच प्रथम प्राप्त झाली. ब्राह्मणेतर चळवळीतील गुणदोष त्यांनी स्पष्ट केले आहेत (पृ. २८, ३२). पण त्यांना ‘सार्वजनिक’ कार्याचे पहिले धडे, ह्या
ब-यावाईट वाटलेल्या चळवळीत मिळाले. हे त्यांचे आत्मकथन दर्शविते. आत्यंतिक ब्राह्मण द्वेष व विरोध १९२० ते ३० ह्या दशकात बळावला होता. ब्राह्मणेतर चळवळीची चिकित्सा त्याच काळात महर्षी शिंदे व डॉ. आंबेडकर यांनी सहानुभूतीने पणे कठोर न्यायबुद्धीने केलेली आजही वाचनीय आहे. चव्हाणांचे साधक-बाधक विचार मोठे अभ्यासनीय आहेत.
म. फुले व यशवंतराव चव्हाण
विद्यार्थी दशेपासून चव्हाणात विवेक दिसतो. समकालीन सर्वच विचारप्रवाह व चळवळी त्यांनी तपासल्या. खरे-खोटे निवडले. सत्यशोधक चळवळीत आत्मीयतेने भाग घेणारे त्यांचे बंधू गणपतराव यांना प्रश्न विचारतच राहिले. दोघात फरक पडत चालला; पण जेव्हा प्रत्यक्ष यशवंतराव राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊ लागले; तेव्हा हा सर्व मागील फरक इतिहास जमा झाला. हे दोघे बंधू व सर्वच त्यांचे घर ‘बहुजन समाजाने शिकले पाहिजे हे खरे; पण कशासाठी? नोकरीसाठई की देशासाठी?... निव्वळ ब्राह्मणांना विरोध करून बहुजन समाजाचे हित कसे होईल? या त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसत (पृ. ३४).