१.बहुजन समाजाची चळवळ आणि यशवंतराव चव्हाण
आदरणीय यशवंतराव यांच्या निधनाने एक ‘कोहिनूर’ नाहिसा झाला आहे.
शाहू महाराजानंतर ग्रामीण व शेतकरी समाजाला अखिल भारतीय मिळालेले किर्तीवंत नेतृत्व म्हणजे यशवंतरावच होत. परंतु त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ‘शाहू व टिळक’ यामधून टिळक निवडले. त्यामुळे त्यांचे हे आत्मचरित्र कित्येक उच्चभ्रूंना विलोभनीय वाटले! त्यांची समशितोष्ण स्वभाव व प्रखृती विवेकवंताना मानविली व मानवते. परंतु प्रत्यक्ष कामगिरी पहाता म. फुले – शाहू – शिंदे – सयाजीराव वगैरेंच्या परंपरेच्या बाहेरचे चव्हाण होते काय? त्यांची पाटी कोरी नव्हती. महराष्ट्रात म. फुले, टिळक-आगरकर-आंबेडकर झाले म्हणूनही यशवंतरावांना महाराष्ट्रात पार्श्वभूमी मिळाली व महाराष्ट्र राज्य प्रगत करता आले. असा आशय ‘सकाळ’ (पुणे) यांनी त्यांच्या मृत्यूवरील अग्रलेखात व्यक्त केला होता. त्यांच्याच आत्मचरित्राच्याद्वारे हे इथे सिद्ध करावयाचे आहे. यासाठी त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ ह्या आत्मचरित्रातीलच उतारे आधारासाठी घेतले आहेत.
कृष्णा कोयना काठावरचे क-हाड
या गावाचे सांस्कृतिक व राजकीय वर्णन देताना तेथे निघालेल्या टिळक हायस्कूलची माहिती व महत्त्व यशवंतराव सांगतात (पृ. २७). टिळक हायस्कूलचे चव्हाण हे एक विद्यार्थी होते व त्यांच्यावर तेथील वातावरणाचा परिणाम जास्ती होणे अशक्य नव्हते व पूर्ववयातील संस्कार बलवान रहातात. यातही नवल नाही; राहिलेच तर हे पूर्ववयातील संस्कार तपासले पाहिजेत. त्यांच्या घरीदारी एक दुसरा प्रवाह वाहात होता. त्याविषयी चव्हाणसाहेब लिहितात :.. “आम्हाला समजू लागले की बहुजनसमाजाच्या उन्नतीसाठी सत्यशोधक चळवळ किंवा पुढे तिला राजकारणामध्ये ब्राह्मणेतर चळवळ असे स्वरूप आले; ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी बहुजन समाजाच्या मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, वाचन केले पाहिजे, सार्वजनिक कामात भाग घेतला पाहिजे. अशा त-हेचे मानसिक व वैचारिक वातावरण त्यावेळी तेथे होते.” (पृ. २८)
चळवळीतील विधायक भाग जो वरीलप्रमाणे दिसला तो यशवंतरावांनी प्रथमत:च व्यक्त केला आहे. यात त्यांना काही वाईट दिसले नाही. स्वत: ते शिकले व पुढे विविध सार्वजनिक शैक्षणिक वगैरे कामातून त्यांनी फार मोठा भाग घेतला.
यशवंतरावांचा जन्म सर्वसामान्य मराठे कुळात झाला होता. त्या काळात मराठा समाज शिक्षणाभिमुख नव्हता. त्यांच्या बंधूंनी त्यांना शाळेत घातले, हा एक त्यावेळचा शिक्षण प्रसारक चळवळीचा प्रत्यक्ष परिणाम असावा. त्यांनी हे प्रत्यक्ष नमूद केलेले नाही.