भूमिका-१ (96)

१८. समाजाभिमुख शिक्षण

शिवाजी विद्यापीठात १ डिसेंबर १९७४ रोजी
केलेल्या दीक्षांत भाषणाच्या आधारे

महाराष्ट्राच्या आणि भारताच्या दृष्टीनेही हे वर्ष अत्यंत मोलाचे आहे. राजर्षी श्री. छत्रपती शाहू महाराजांची जन्मशताब्दी, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यारोहण त्रिशत संवत्सर आणि भगवान महावीर स्वामींचा २५०० वा निर्वाणदिन या वर्षातच आपण साजरे केले. त्यागभावनेला आवाहन करण्याचे, अहिंसेचा दिव्य आणि अक्षय संदेश देण्याचे, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देण्याचे, जिद्द निर्माण करण्याचे आणि समतेचे नैतिक अधिष्ठान प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य आपल्या इतिहासात आहे. जीवनाच्या शाश्वत मूल्यांना उजाळा देणारे हे वर्ष आहे. असे असतानाही सभोवताली दलित समाजावर होत असलेले अन्याय पाहिले, म्हणजे उबग येतो, खंत वाटते, आत्मदंडन करावेसे वाटते. अशा घटनांमुळेच आपली सामाजिक आणि नैतिक मूल्ये धोक्यात येत आहेत. अर्थात शाश्वत मूल्यांना धक्का देणारी, सामाजिक जीवनात वा वर्तनात त्यांचे स्थान कमी अथवा नष्ट करणारी परिस्थिती आज निर्माण झाली आहे किंवा नाही, याबाबत कदाचित काहींचे मतभेद असू शकतात; परंतु तशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मानल्यास मात्र ती गंभीर चिंतेची बाब ठरते. संभाव्य मतभेदाच्या पलीकडे असा चिंतेचा हा विषय आहे.

आजच्या आपल्या सगळ्याच समस्या दिवसेंदिवस मोठ्या गुंतागुंतीच्या आणि कठीण होत आहेत, हे खरे. ही गुंतागुंत आम्ही आपल्या वर्तनाने अधिक वाढवली, की कमी केली, हा प्रश्न क्षणभर बाजूस ठेवू या. सामान्यत: आपले लक्ष याच प्रश्नावर केंद्रित होत असते. आर्थिक संबंधांच्या, सामाजिक जातीजमातींच्या, धार्मिक वा भाषिक गटांच्या किंवा राजकीय पक्षोपक्षांच्या स्पर्धेत वा कलहात असे उद्रेक होणे स्वाभाविक आहे. तथापि विशिष्ट प्रसंग वा घटनांच्या बाबतीत दोष कुणाचा वा श्रेय कुणास द्यावयाचे, याचा विचार करीत असताना मूळ प्रश्नाच्या विस्ताराकडे, स्वरूपाकडे दुर्लक्ष होता कामा नये, एवढेच मला सुचवायचे आहे. उदाहरणार्थ, अन्नधान्याच्या वाटप पद्धतीतील गुणदोष अवश्य तपासले पाहिजेत. परंतु तसे करीत असताना दरवर्षी अडीच टक्के वाढ होत असलेल्या साठ कोटी जनतेसाठी पुरेसे धान्य उत्पादन करण्याच्या वा पुरविण्याच्या प्रश्नाचे स्वरूप नजरेआड होऊ नये. निरनिराळ्या प्रश्नांच्या अशा तपासणीकडे लक्ष पुरविल्याने तात्कालिक गुणदोषांची कारणमीमांसा थोडीशी अधिक जबाबदारीने होऊ शकेल, असे वाटते. हे गुणदोष चर्चिलेच पाहिजेत. लोकशाही पद्धतीत अशा चर्चेतूनच योग्य मार्ग सापडू शकेल, असा माझा विश्वास आहे.