भूमिका-१ (100)

शिक्षणप्रसाराचा हा मूळ हेतू लक्षात घेता त्याबाबतची आपली जबाबदारी ध्यानात येईल. हा शिक्षणाचा प्रसार वाढता राहिल्याने त्याचा दर्जा खालावेल, अशी तक्रार अनेक वेळा कानांवर येते, परंतु हा केवळ तात्कालिक परिणाम मानावा लागेल. उलट, समाजाची औद्योगिक विकासाकडे वाटचाल सुरू झाली, की त्यातील सगळे व्यवहार अधिक वैशिष्ट्यपूर्ण होत जातात आणि ते चालविण्यासाठी विशिष्ट स्वरूपाचे ज्ञान, कौशल्य व क्षमता असणे आवश्यक ठरते. शिकलेले लोक मूठभर असतील, तर अशा प्रगतशील समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालूच शकणार नाहीत, ही गोष्ट आजच्या सुशिक्षितांनी ओळखली पाहिजे. शिक्षणाचा प्रसार सुरू झाला, की त्याचा कस वा दर्जा सुधारण्याची इच्छा समाजातच निर्माण होईल आणि कालांतराने आमचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोणही बदलू लागेल. शिक्षण ही ख-याखु-या अर्थाने समाजाची जबाबदारी बनेल.

शिक्षणाच्या दर्ज्याचा विचार करताना परंपरागत चौकटीतून आम्हांला बाहेर पडावे लागेल. मूठभर लोक शिकत असताना शिक्षणक्रमाचे जे स्वरूप योग्य ठरेल, ते आता सर्व समाजच बहुसंख्येने शिक्षणाकडे वळत असताना बदलावयास नको काय? प्रश्न केवळ शिक्षणाचा आलेख बदलून सुटणार नाही. शालेय शिक्षणक्रमाची ११ वर्षे आणि महाविद्यालयाची ४ वर्षे याऐवजी १०+२+३ असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यात फक्त आकड्यांचे कोष्टक बदलून बेरीज सारखीच काढण्याची कल्पना अभिप्रेत आहे, असे मला वाटत नाही. शिक्षण समाजाभिमुख करण्याच्या दिशेने टाकलेले ते पहिले महत्त्वाचे पाऊल होय. ते फलदायी होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात विविध प्रकारच्या कौशल्यांना, व्यावसायिक हुन्नरांना, बौद्धिक क्षमतेला स्थान मिळाले पाहिजे आणि त्याची नव्याने उभारणी झाली पाहिजे. हे बदल करणे वाटते तितके सोपे नाही. कारण एका परीने ते शिक्षकांतील बदलच होतात. त्यासाठी शिक्षकांचा दृष्टिकोण बदलणे इष्ट व आवश्यक ठरते. नवे कौशल्य व ज्ञान प्राप्त करून घेण्याची शिक्षकांची तयारी नसेल, तर विद्यार्थ्यांना ते कसे प्राप्त होणार? निदान तरुण शिक्षकांनी तरी प्रतिष्ठेची खोटी कल्पना उराशी न बाळगता, पगार, महागाई, नोकरीचे स्थैर्य इत्यादी प्रश्नांबरोबरच इकडेही लक्ष द्यावे आणि आपला जबाबदारीचा वाटा उचलावा, असे मी सुचवीन. यापुढे सर्व समाजच सतत शिकत राहिला पाहिजे. विद्यापीठातून बाहेर पडलो, की शिक्षण संपले, हा औपचारिक दृष्टिकोण झाला. त्याच्यापुढे जाण्याची गरज आता निर्माण होत आहे. अधिकाधिक होणार आहे. आणि या बाबतीत सुशिक्षितांनी-विशेषत: शिक्षकांनी-चांगला आदर्श घालून दिला पाहिजे, असा मी आग्रह धरीन.