भूमिका-१ (120)

संयुक्त राष्ट्रसंघाला आज जगात फार महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक शांतता व सुरक्षितता या राष्ट्रसंघाच्या सनदेत समाविष्ट असलेल्या उद्दिष्टांपासून जग अजूनही खूप दूर आहे, यात शंका नाही. परंतु देशादेशांतील तणाव कमी करण्यात आणि जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यात राष्ट्रसंघाने लक्षणीय कामगिरी बजाविली आहे. विशेषत:, वसाहतवादाचे उच्चाटन करण्यास संयुक्त राष्ट्रसंघाने बजावलेली कामगिरी दूरगामी व उल्लेखनीय आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे आतापर्यंतचे कार्य पाहता, भविष्यकाळातही राष्ट्र संघाचे महत्त्वपूर्ण स्थान अबाधित राहील, अशी माझी तरी धारणा आहे. याचा अर्थ असा नाही, की आतापर्यंत जे काही यश संयुक्त राष्ट्रसंघाने मिळविले आहे, त्यापलीकडे काही करण्यासारखे उरलेले नाही. जगातील विकसनशील देशांतील दारिद्र्य दूर करणे व विकसनशील व विकसित देशांतील विषमता कमी करणे, या दृष्टीने अनेक पावले उचलणे आवश्यक आहे. नुकत्याच संपलेल्या विशेष अधिवेशनात संमत झालेला एकमुखी प्रस्ताव हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय. वेगवेगळ्या देशांची अर्थरचना व संपन्नता ही एकमेकांशी किती निगडित आहे, याची सर्वांनाच जाणीव व्हावयास लागली आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. विशेषत:, विकसनशील देशांच्या प्रगतीशिवाय विकसित देशांतील संपन्नता अतिशय अस्थिर आहे, विकसित देशांना अधिक तीव्रतेने जाणीव होण्याची गरज आहे. जगातील अर्थरचना अधिक न्याय्य आधारावर पुनर्गठित करण्याच्या दृष्टीने अनेक ठाम पावले उचलणे आवश्यक झाले आहे.

एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने व जागतिक समस्यांवर सहकार्याच्या आधारावर काही उपाय शोधण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रसंघ हे एक फार उपयुक्त असे स्थान आहे. त्यामुळे आजच्या जगातील जे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, मग ते राजकीय क्षेत्रांतील असोत किंवा आर्थिक असोत किंवा सामाजिक क्षेत्रातील असोत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या राष्ट्रसंघाच्या घटक-संस्थांची कार्यक्षमता वाढविणे व त्यासाठी जरूर तर संयुक्त राष्ट्रसंघाची संघटनात्मक पुनर्रचना करणे हे विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे उद्दिष्ट नजरेसमोर असायला हवे, असे मला वाटते.