भूमिका-१ (123)

खरे म्हणजे, सुरुवातीपासूनच अलिप्तता ही केवळ एकपदरी संकल्पनाच नव्हती. अनेक मूलभूत घटकांना सामावून घेणारी अशी ती अनेकपदरी संकल्पना आहे. अलिप्ततावादाची उद्दिष्टे जवाहरलाल नेहरूंच्या शब्दांत सांगावयाची, तर:

'कोणत्याही एका महासत्तेचा किंवा सत्तागटाचा आधार न घेता प्रत्येक विवाद्य किंवा संघर्षमय प्रश्नाकडे स्वतंत्र दृष्टिकोणातून पाहून शांततेचा मार्ग चोखाळायचा आहे. परतंत्र समाजाची मुक्तता, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय स्वातंत्र्याचे जतन, वांशिक भेदाभेदांचे निर्मूलन आणि जागतिक लोकसंख्येच्या फार मोठ्या भागाची उपासमार, रोगराई व अज्ञान या दु:स्थितीतून सुटका ही अलिप्ततावादाची उद्दिष्टे आहेत.' नेहरू अलिप्ततावादाकडे मानवतेच्या भूमिकेतून पाहात होते. अलिप्तता हे मानवजातीच्या हातांतील एक विधायक साधन बनावे, असा त्यांचा प्रयत्न होता. अलिप्ततावादाचा हा प्रमुख विशेष सदैव ध्यानात ठेवायला हवा.

बदलती जागतिक परिस्थिती लक्षात घेता, त्या त्या परिस्थितीनुसार अलिप्ततावादाच्या विविध विशेषांपैकी एखाद्या विशेषाला अधिक प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र अलिप्ततावादाचा कोणताही एक पैलू सध्याच्या परिस्थितीमध्ये निरर्थक झालेला आहे, असे मानणे माझ्या मताने अगदी चूक आहे. शीतयुद्धाचे युग आता समाप्त झालेले आहे, असा युक्तिवाद ऐकू येऊ लागल्यामुळे मला ही गोष्ट विशेष जोर देऊन सांगावीशी वाटते. कदाचित काही जण म्हणतात, त्याप्रमाणे शीतयुद्धाचे युग अस्तंगत झाले असेलही; परंतु मूलभूत परिस्थितीमध्ये बदल घडून आलेला आहे का, हा खरा सवाल आहे. मी त्यासंबंधी साशंक आहे. सर्व विकसनशील देशांना संपूर्र्ण स्थैर्य वाटत आहे का? सर्वांची भीती लोपली आहे, अशी ग्वाही आपण देऊ शकतो का?

१९६१ मध्ये बेलग्रेड येथे पहिली अलिप्ततावादी राष्ट्रांची शिखर परिषद भरल्यानंतरच्या काळामध्ये जागतिक परिस्थिती बदललेली आहे, हे कोणीच नाकबूल करणार नाही. परंतु अजूनही जग संघर्षमुक्त, दारिद्र्यमुक्त आणि तणावमुक्त झालेले नाही. म्हणूनच बदललेल्या आणि सतत बदलत असलेल्या जगामध्ये अलिप्ततावादाची चपखल संकल्पना १९६१ पेक्षाही अधिक अर्थपूर्ण ठरली आहे. ज्या देशांनी पूर्वी परस्परांविरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेतला होता, ते देश आता तणाव कमी करण्याच्या मार्गावर आलेले आहेत, हे खरे आहे. येथे मी मुद्दामच सामंजस्य हा शब्द वापरत नाही, कारण काही लोकांना या शब्दाचे वावडे आहे. तणाव कमी करण्याच्या विधायक घटनेचे आपण स्वागत केलेले आहे.

वस्तुस्थिती अशी आहे, की सर्व खंडांना आणि सर्व संघर्ष-क्षेत्रांना अर्थपूर्ण सामंजस्याचे (Detente) तत्त्व लागू व्हावे, याच भूमिकेचा आपण सतत पुरस्कार केलेला आहे. इतकेच नव्हे, तर ज्या विभागात आपला देश आहे, त्या विभागात चिरस्थायी शांतता आणि मित्रतापूर्ण सहकार्य प्रस्थापित व्हावे, यासाठी आपण सतत प्रयत्न करीत आलेलो आहोत. असे असले, तरीही लष्करी करारमदार रद्द झालेले नाहीत. उलट, चित्र असे दिसते, ते असे, की जुन्या लष्करी करारांना पुन्हा उजाळा देण्यात येत आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे, की मूलभूत साधनसामग्री, कच्चा माल आणि इंधन यांचा संभाव्य जागतिक तुटवडा लक्षात घेऊन पूर्वीच्या लष्करी गटांमध्ये नवा आर्थिक आशयही समाविष्ट केला जात आहे.