भूमिका-१ (124)

नव्याने मुक्त झालेल्या देशांचे स्वातंत्र्य जतन करण्यात, परतंत्र देशांतील स्वातंत्र्यसंग्रामांना बळ पुरविण्यात आणि साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि वर्णवाद यांच्या विरुद्धच्या लढ्यांना पाठिंबा देण्यात अलिप्ततावादी चळवळीने मोठीच भूमिका बजावली आहे. नवी आणि न्याय्य आंतरराष्ट्रिय अर्थव्यवस्था साकार व्हावी, यासाठी चाललेल्या लढ्यातही अलिप्ततावादी देश आघाडीवर आहेत. म्हणून अलिप्ततावादी चळवळीच्या वाढत्या बळाचे आणि पाठिंब्याचे आपण स्वागत करतो.

मात्र त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे, की किती देश या चळवळीत सहभागी झालेले आहेत वा होत आहेत, यावर या चळवळीचे सामर्थ्य अवलंबून राहणार नाही. तर अलिप्ततावादी देशांची एकजूट आणि परस्पर-सहकार्य यावरच ही चळवळ बलवान होणार आहे. तात्कालिक गरजेपायी या चळवळीमागील मूलभूत उद्दिष्टांना फाटा देण्यात आला, तर ही एकजूट आणि सहकार्य टिकू शकणार नाही, हेही तितकेच खरे आहे. भारताच्या राष्ट्रिय हितसंबंधांची जपणूक करणे हे भारताच्या परराष्ट्रिय धोरणाचे मुख्य सूत्र आहे, हे तर खरेच आहे. आपल्या देशाच्या परराष्ट्रिय धोरणाला ते सूत्र सोडता येणारच नाही. परंतु त्याबरोबरच या धोरणाचा आंतरराष्ट्रिय संदर्भ विसरता येत नाही. खरे पाहता, कोणत्याही देशाच्या परराष्ट्रिय धोरणाचे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रिय संदर्भ परस्परांशी अत्यंत निगडित असतात. कारण राष्ट्रिय संदर्भातूनच आंतरराष्ट्रिय संदर्भ जन्म पावतात.

काही देशांशी आपली 'खास' मैत्री असावी आणि इतरांबरोबर मात्र 'आम' मैत्री ठेवावी, असे काही जण म्हणतात. परंतु मैत्रीमध्ये असा फरक करणे मला मंजूर नाही. 'आपण आपल्या मित्रांची निवड केली पाहिजे', असे म्हणणाऱ्यांना आपण आपल्या शत्रूंचीही निवड केली पाहिजे, असेच सुचवायचे असते. परंतु मला हे अभिप्रेत नाही. मला हे मान्य आहे, की काही वेळा असे घडते, की काही ऐतिहासिक कारणांमुळे काही देशांबरोबरचे संबंध आपोआपच दृढ होत जातात. असे घडणे स्वाभाविक असले, तरी 'खास मैत्री' आणि 'आम मैत्री' असा आपण फरक करता कामा नये, असे मी मानतो. 'जागतिक सत्ता' हा शब्दप्रयोग ज्या अर्थाने वापरण्यात येतो, त्या अर्थाने भारताला 'सत्ता' प्राप्त करून घेण्याची इच्छा नाही. भारत बलिष्ठ असलाच पाहिजे, याविषयी दुमत नाही. शांततेत नांदता यावे आणि सहकार्याने वागता यावे, असाच भारत आम्हांला हवा आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिक क्रांतीमध्ये सहभागी होऊनच आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करता येईल.

विकसित देशांतील लोकांपाशी जेवढी बुद्धी आणि कर्तृत्व आहे, तेवढेच ते आपल्या लोकांपाशीही आहे, असे मी मानतो. आपण बुद्धिमत्तेत मुळीच मागे नाही. हा कालावधीचा प्रश्न आहे. विकसित देशांनी तांत्रिक क्रांतीच्या कार्याला दोनशे वर्षांपूर्वी प्रारंभ केला. आपल्याला तो आता करायला मिळत आहे, ही खरी अडचण आहे. असे असले, तरी तांत्रिक क्रांती घडवून आणण्याच्या कार्याला आपण गती दिली आणि तशी ती देऊ, याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर या उद्दिष्टाला अनुसरून आपण आपल्या आर्थिक, व्यापारी आणि परराष्ट्रिय धोरणाची आखणी केली, तर अखेरीस आपण तेथेही तांत्रिक क्रांती घडवून आणू शकू. आपल्या अंतर्गत राजकीय, आर्थिक आणि शास्त्रीय धोरणांवरच आपल्या परराष्ट्रिय धोरणाचे यश आणि सामर्थ्य अवलंबून आहे, हे मी वारंवार सांगत आलो आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपण आपले परराष्ट्रिय धोरण आखताना आणि अनेक देशांबरोबरचे संबंध ठरविताना काळजी घेतो, तशीच काळजी राजकीय, आर्थिक आणि शास्त्रीय धोरण ठरवितानाही घेतली पाहिजे. कारण भारताच्या सामर्थ्याचा तोच मूलाधार आहे. हा आधार आपण जेवढा बळकट करू, तेवढ्या प्रमाणात आपण भारताला आणि भारतीय जनतेला समर्थ करणार आहोत. कारण अखेरीस भारतीय जनतेचे सामर्थ्यच भारताचे परराष्ट्रिय धोरण समर्थ आणि यशस्वी करणार आहे.