२१. श्री. विलासराव देशमुख
संयुक्त महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री
(१८-१०-१९९९ ते १८-१-२००३) (१-११-२००४ ते )
विलासराव हे मराठवाड्यातील तिसरे मुख्यमंत्री. त्यांच्या आधी कै. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर पाटील हे दोघे मराठवाड्यातील मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना १८-१-२००३ रोजी राजीनामा द्यावा लागला.
जन्म व शिक्षण
मराठवाड्यातील बाभळगाव येथे २५-५-१९४१ रोजी विलासरावांचा जन्म झाला. म्हणजे आज ते ६५ वर्षांचे आहेत. त्यांनी बी.एस.सी. पदवी पुणे येथील गरवारे महाविद्यालयात शिक्षण करून मिळविली. ह्या परीक्षेकरता त्यांचा विषय होता भौतिक शास्त्र. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळविली व १९६८ साली त्यांना कायदा शाखेतील पदव्योत्तर एल.एल.एम.ची पदवी मिळाली. त्यांनी वकिलीस सुरुवात पुण्यासच केली. त्यांना खरे तर लातूर येथे स्थायिक व्हायचे होते, परंतु त्यांच्या महत्वाकांक्षेच्या परिमाणात लातूर हे अतिशय मर्यादित क्षेत्र होते.
सामाजिक व राजकीय कार्य
लातूरला विलासराव १९८० पर्यंत होते. म्हणजे १९६८ ते १९८० ह्या बारा वर्षांच्या काळात सामाजिक व राजकीय उमेदवारी त्यांनी लातूरला केली. ते ग्रामपंचायत व जिल्हापरिषदेमध्ये कार्यशील होते. युवक कॉंग्रेसचे नेतृत्वही त्यांनी काही दिवस केले. ते सहकारी बॅंकेच्या क्षेत्रातही कार्यशील होते. १९८० साली त्यांना सहकारी चळवळीचा अभ्यास करण्याकरता रशियात जाण्याची संधी मिळाली.
राजकीय – विधिमंडळ कार्याला सुरुवात
१९८० साली प्रथम त्यांनी लातूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर ते दोनदा विधानसभेत अनुक्रमे १९८५ व १९९० साली निवडून आले. परंतु १९९५-९६ सालच्या दोन्ही निवडणुकांत ते यशस्वी झाले नाहीत. नंतर काही काळ त्यांनी शिवसेनेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि विधानसभा व लोकसभेत त्यांच्यामार्फत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. सुदैवाने सप्टेंबर १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते यशस्वी झाले व मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर त्यांनी झेप घेतली.
संसदीय कारकीर्द
खरे पाहता विलासरावांची संसदीय कारकीर्द १९८२ सालापासूनच सुरू झाली. बाबासाहेब भोसल्यांच्या मंत्रिमंडळात विलासराव राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे युवक कल्याण, तंत्रशिक्षण, ग्रामविकास, कृषी ही खाती होती.