आमचे मुख्यमंत्री -६९

महिला योजना ही एका अर्थाने सामाजिक सुरक्षा योजनाच आहे. ह्या योजनेखाली कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्यास विधनांना संरक्षण मिळणार होते, तर बळीराजा संरक्षण विमा योजनेखाली नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना संरक्षण पुरविले आहे. उस तोडणा-या कामगारांना फक्त हंगामातच काम असते. त्यांना वर्षभर रोजगार नसतो. ज्यावेळी उस तोडण्याचा हंगाम नसतो त्यावेळी त्यांना रिटेन्शन भत्ता दिला जातो. अशा कामगारांना वर्षभर रोजगाराची शाश्वती नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे जरूर असते. ह्याकरता मुख्यमंत्री राण्यांनी काही प्रभावी पावले टाकली. स्त्रियांमध्ये औद्योगिक शिक्षणाची आवड निर्माण करण्याकरता त्यांना औद्योगिक शिक्षण संस्थांमध्ये फी माफ केली. त्यांनी दुय्यम सेवा मंडळ स्थापन केले. त्यांच्या पर्यटनाविषयी योजना होत्या, पण त्यांबाबत थोड्या काळात त्यांना विशेष काही करता आले नाही.

नारायणराव राणे आणि कॉंग्रेस

आज राणे कॉंग्रेसचे मान्यवर पुढारी आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. ते विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे महसूल खाते आहे. अत्यंत धडाडीचे, कर्तबगार, त्वरित व अचूक निर्णय घेणारे मंत्री अशी राण्यांची ख्याती आहे. ते काही काळ विरोधी पक्ष नेतेही होते. त्यावेळी विधिमंडळ कार्य व कार्यशैली ह्यांच्यावर त्यांनी प्रभावी पकड जमवली. त्यांचा जनसंपर्क विपुल असून ते एक स्पष्टवक्ते व वेळ आल्यास अप्रिय निर्णय घेण्यास न डगमगणारे मंत्री आहेत. अर्थात राणे ह्यांचा जनसंपर्क व लोकसंग्रह हा त्यांच्या सह्रदय स्वभावामुळेच आहे. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल दिसतो व ते अनेक उच्च पदे भूषवतील अशी जनतेची अपेक्षा आहे.

श्री. राजू परुळेकर ह्यांच्या मते कॉंग्रेसमधील प्रत्येकजण गांधी घराण्याचा आश्रित असतो. महाराष्ट्रात अपवाद सोडता कोणीही स्वबळावर मुख्यमंत्री झालेले नाहीत. त्यामुळे गांधी घराण्याचा आश्रित महाराष्ट्र बदलू शकत नाही. त्यामुळे त्या घराण्याचा आश्रयाला जाणे ही राण्यांची विकासदृष्टी आहे काॽ नारायणराव भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतीलही, परंतु सोनियावादी कॉंग्रेस त्यांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही. त्या पदापर्यंत पोहोचण्याकरता राणे ह्यांना काय काय व्यूहरचना करावी लागणार आहे हे पाहण्यासारखे आहे.

संदर्भः
१)    सोपान गाडे – राणे, २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे .
२)    राजू परुळेकर – माणसे भेटलेली न भेटलेली, नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली (प), मुंबई ९२.
      (पृष्ठे १८६-१९३)
३)    लोकराज्य – माहिती व जनसंपर्क संचालनालय.