आमचे मुख्यमंत्री -६८

20  narayan rane
२०. श्री. नारायणराव राणे

संयुक्त महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री
(१-२-१९९९ ते १८-१२-१९९९)

आज श्री. राणे हे कॉंग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. एकेकाळी ते शिवसेनेचे प्रथम श्रेणीचे पुढारी होते. कोकण हा राण्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्यामुळेच शिवसेनेला कोकणात प्रतिष्ठेचे स्थान मिळाले होते.

जन्म व शिक्षण

नारायणराव हे गरिबीतून वर आलेले नेतृत्व आहे. त्यांचा जन्म कोकणातील वरखेडे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात झाला. ते एका गरीब कामगाराच्या कुटुंबात जन्मले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले (१९७०). त्यानंतर त्यांनी काही काळ इन्कमटॅक्स खात्यात काम केले व १९८४ साली नोकरीचा राजीनामा देऊन ते शिवसेनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले.

महानगरपालिकेतील वैधानिक कारकीर्द

राणे यांची सार्वजनिक कामाची कारकीर्द मुंबई महानगर पालिकेत सुरू झाली. १९८५ साली ते मुंबई महानगर पालिकेत निवडून आले होते. १९९० साली ते मालवण मतदार संघातून विधिमंडळात निवडून आले. त्यावेळी शिवसेना व भारतीय जनता पक्ष ह्यांची युती होऊन मनोहर जोशी ह्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बनले होते.

मंत्रिपद

राणे ह्यांना मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळाले. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते (१४-५-१९९५). त्यांच्याकडे मत्स्यव्यवसाय, पुनर्वसन ही खाती होती. राण्यांच्या कर्तबगारीला ह्याच वेळी बहर आला. त्यांची अभ्यासू वृत्ती व धडाडीचे वक्तृत्व ह्या गुणांमुळे पुढे वाव मिळाला.

मुख्यमंत्रिपद

पक्षादेशामुळे मनोहर जोशी ह्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला(११-१-९९). त्यावेळी पी.सी. अलेक्झांडर हे राज्यपाल होते. मनोहर जोशींनंतर मुख्यमंत्रिपदाची माळ साहजिकच नारायणराव राण्यांच्या गळ्यात पडली. परंतु राणे हे फक्त दहाच महिने म्हणजे अत्यंत अल्पकाळ मुख्यमंत्री होते. एवढ्या थोड्या काळात त्यांनी प्रशासकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर आणले. राण्यांना महिला व तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाण आहे व त्यांना साहाय्य करण्याची तळमळ आहे. जिजामात महिला आधार योजना, बळीराजा संरक्षण योजना ह्यांना त्यांनी चालना दिली.