आमचे मुख्यमंत्री -६४

लोकसभेचे सदस्य

१९९८ साली त्यांनी वाशिम मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला. त्यावेळी ते अखिल भारतीय कॉंग्रेस सभेचे सदस्य होते. परंतु शरद पवार ह्यांना सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या प्रश्नावरून कॉंग्रेसमधून अर्धचंद्र दिला गेला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. श्री. सुधाकरराव राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाले व अशा त-हेने कॉंग्रेस पक्षाची विभागणी झाली. त्यानंतर सुधाकरराव १९९९ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुसद मतदार संघातून विधिमंडळात निवडून आले. त्यावेळी विलासराव देशमुख ह्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस व राष्ट्रवादी ह्यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले. सुधाकररावांना जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष केले. हे खाते महाराष्ट्रात नित्य पडणा-या दुष्काळाला तोंड देण्याकरता सुधाकरावामुळेच निर्माण झाले होते. परंतु सुधाकररावांचे दुर्दैवाने १२-५-२००१ रोजी निधन झाले.

मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांचे कार्य

त्यांना ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांची चांगली जाण होती. त्यांना स्त्रियांच्या प्रश्नांचे महत्व पटल्यामुळे त्यांनी स्वतंत्र महिला व बालकल्याण विभागाची स्थापना केली. त्यांना अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांचीही जाण होती. त्याकरता त्यांनी अल्पसंख्यांक आयोग स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी असलेल्या आदरामुळे त्यांनी चैत्यभूमीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. त्यांचे सामाजिक संस्थांना भरीव मदत करण्याचे धोरण होते. सर्वोदय आश्रम, साने गुरुजी कथामाला ह्यांना त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. म. गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याकरता त्यांनी गांधी-चरित्राच्या स्वस्त प्रती उपलब्ध करून देण्याची योजना आखली. संत तुकडोजी महाराजांचे वाड.मय छापण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी काही काळ पत्रकारिता केली असल्यामुळे (उदा. ग्रामराज्य साप्ताहिक) पत्रकारांच्या शिक्षणाकरता त्यांनी यवतमाळ ट्रस्ट स्थापन केला. त्या ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. त्यांनी सहकारी सुताच्या गिरण्या स्थापन करण्यास उत्तेजन दिले.

सुधाकरराव नाईकांचे व्यक्तिमत्व

सुधाकरराव हे थोडा काळच मुख्यमंत्री होते. पण दलित व शोषित वर्गाविषयी त्यांना असलेल्या आस्थेमुळे लोकमानसात त्यांच्याविषयी आदर होता. शेतीच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. ते अभ्यासू आणि व्यासंगी होते. वसंतराव नाईकांप्रमाणे ते सुसंस्कृत, सौजन्यशील आणि शालीन होते. उत्तम प्रशासक, राजकारणी आणि कसलेले संसदपटू होते.

संदर्भः
१)    सोपान गाडे – सुधाकरराव नाईक, जानेवारी २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे.
२)    हूज हू-
३)    लोकराज्य – माहिती व जनसंपर्क संचालनालय.