आमचे मुख्यमंत्री -६२

18 sudhakarrao
१८. श्री. सुधाकरराव नाईक

संयुक्त महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री
(२५-६-१९९१ ते २२-२-१९९३)

सुधाकरराव हे श्री. वसंतराव नाईक ह्यांचे पुतणे. त्यामुळे त्यांना राजकारण व अधिकारपद ह्या गोष्टी काही नव्या नव्हत्या. ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी घराण्याची परंपरा काही काळ पुढे चालविली.

जन्म व शिक्षण

श्री. सुधाकरराव नाईक ह्यांचा जन्म २१-७-३४ रोजी पुसदपासून जवळ असलेल्या गहुली या गावी झाला. त्यांचे घराणे एका अर्थाने श्रीमंत होते. त्यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झाले. पुसद येथे वकिली करण्याकरिता त्यांनी सनद घेतली.

सामाजिक व राजकीय कार्य

त्यांनी विनोबा भावे ह्यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला होता. तसेच पंचायत, जिल्हापरिषद, कॉंग्रेस समिती ह्या संस्थांत अधिकाराची पदे भूषविली होती. त्यांचे मुख्य लक्ष शेतीचे स्वरूप बदलण्याकडे होते. कारण त्यांच्या चुलत्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याकडे आला होता. त्यांच्या मताप्रमाणे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

विधिमंडळात प्रवेश

त्यांनी विधिमंडळात १९७७ साली प्रवेश केला. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. दादांच्या मंत्रिमंडळात सुधाकररावांना राज्यमंत्र्याचे स्थान मिळाले. त्यांच्याकडे कृषिसिंचन क्षेत्रविकास प्राधिकरण व दुग्धव्यवसाय ही खाती होती. ते स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधान परिषदेत निवडून आले होते.

१९७८ साली ते पुसद मतदारसंघातून पुन्हा विधानसभेत निवडून आले. त्यावेळी ते वसंतदादांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे गृहनिर्माण, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय ही खाती होती. १९८० च्या मध्यावधी निवडणुकीत निवडून आले तरी त्यांना अंतुले ह्यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

१९८५ साली ते पुसद मतदार संघातून पुन्हा निवडून आले व वसंतदादांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले (मार्च १९८५ ते जून १९८५). सुधाकररावांकडे उद्योग, महसूल, पुनर्वसन व समाजकल्याण ही खाती होती. वसंतदादांनंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री झाले. त्यावेळी सुधाकररावांकडे उद्योग, महसूल आणि समाजकल्याण ही खाती होती. सुधाकरराव नाईक हे पुरोगामी आघाडीच्या मंत्रिमंडळातही मंत्रिपदावर होते (१९८८). त्यावेळी श्री. शरद पवार हे मुख्यमंत्री होते.