आमचे मुख्यमंत्री -५८

मुख्यमंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या कारकिर्दीत संपांची लाटच आली होती. पोलिसांचा संप, कापड गिरण्यांचा संप, गट सचिवांचा संप, विद्युत मंडळाच्या कनिष्ठ अभियंत्रकांची संपाची धमकी इ. पोलिस खात्याच्या संपाची पार्श्वभूमी अशी होती – शरद पवारांनी पोलिसांचा युनियन स्थापण्याचा अधिकार आधीच मान्य केलेला होता. अंतुल्यांचेही पोलिसांना पाठबळ होते व ह्याचा परिपाक म्हणजे १५-८-८२ रोजी पोलिसांची बंडाळी व संप झाला. बाबासाहेबांनी पोलिसांची कामगार संघटना बरखास्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना संप यशस्वी रीतीने हाताळता येणार नाही अशी लोकांची अटकळ होती. परंतु त्यांनी वरील गोष्टी निकालात काढल्या. त्याचबरोबर पोलिस शासनास त्यांनी स्वतःची सुंदर वास्तु उपलब्ध करून दिली. त्यांनी पोलिस खात्याच्या कारभारात कधीच हस्तक्षेप केला नाही.

हा काळ दुष्काळाचा होता. त्याला तोंड देण्याकरता त्यांनी एक कार्यक्रम तयार केला. त्यांनी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. जनावरांच्या शिबिरांची व्यवस्था केली. मच्छीमार लोकांकरता विमायोजना लागू केली. असंघटित व असंरक्षित कामगारांकरता स्वयंरोजगाराला उत्तेजन दिले. त्याशिवाय श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना नावाची अपघातानंतर आर्थिक संरक्षण व मदत देण्याची योजना तयार केली. त्यांनी निवृत्तीवेतन रु. ५० वरून १५० पर्यंत वाढविले. किमान कुटुंबवेतन हे वेतन दिले जात असे.

बालमोहन शाळेत बाबासाहेब गेले असताना त्यांच्यावर गोळी झाडली गेली. कदाचित त्यांनी जुगार, वेश्याव्यवसाय, दारु व अंडरवर्ल्ड ह्यांवर नियंत्रण आणण्याचे जे प्रयत्न केले त्यांना हे प्रत्युत्तर असेल!

लिहिण्याची हौस

बाबासाहेबांना लिहिण्याची हौस होती. त्यांनी कॉंग्रेसचा इतिहास लिहिला. दैनिक नेता ह्या नावाने वर्तमानपत्र चालविले. कोर्टाची पायरी ह्या नावाचे पुस्तकही लिहिले. (१९६०).

बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व

बाबासाहेब हे विनोदी व्यक्तिमत्व होते. शब्दभांडारावर त्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे कोट्या करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचे चारित्र्य व कारभार स्वच्छ होता. जरी त्यांच्यावर एक किटाळ आले तरी त्यातून ते निर्दोष सुटले. त्यांच्यावर घाण आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. त्यांनी हलक्या दर्जाचे राजकारण कधीच केले नाही. परंतु यशवंतराव चव्हाणांशी त्यांची नाळ कधीच जुळली नाही. ते कुत्सितपणे म्हणत असत की यशवंतरावांची राजकारणात पिछेहाट झाली व माझी भरभराट झाली! कारण ते मुख्यमंत्री झाले.

लोक म्हणतात की त्यांना पैसे मिळवून देता आले नाही म्हणून त्यांची गच्छंती झाली. त्यांना पंजाब व काश्मिरचे राज्यपालपद देऊ केले असे ऐकिवात होते. परंतु ते त्यांनी नाकारले.

संदर्भग्रंथः
१)    श्री. सोपान गाडे – श्री. बाबासाहेब भोसले, २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे
२)    बाबासाहेब भोसले अमृत महोत्सव सत्कार समिती, महर्षी कर्वे रोड, मुंबई २९.-
      बॅ. बाबासाहेब भोसले – एक नायगारा.
३)    डॉ. विश्वास मेहेंदळे – मला भेटलेली माणसे, १९९५, सिग्नेट पब्लिकेशन.