११. श्री. वसंतराव नाईक
संयुक्त महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री
(५-१२-६३ ते २०-१-७५)
एका अर्थाने वसंतराव सुदैवी ठरले. ते महाराष्ट्राचे जवळजवळ अकरा वर्षें मुख्यमंत्री होते आणि ते सुध्दा त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेला नसताना! ते कॉंग्रेसमध्ये आले तेच स्वातंत्र्योत्तर काळात. कन्नमवारांच्या नंतर नाईक हे विदर्भातले दुसरे मुख्यमंत्री.
जन्म व शिक्षण
वसंतरावांचा जन्म एका सधन बंजारा कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी बहुली ह्या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चार ठिकाणी झाले. ते नागपूरहून मॅट्रिक झाले. मॉरिस महाविद्यालयात त्यांनी बी.ए. ची पदवी मिळविली व १९४० साली ते एल. एल.बी. झाले. त्यानंतर त्यांनी १९४१ सालापासून वकिली करण्यास सुरुवात केली. समाज परिवर्तनाच्या दृष्टीने ह्यावेळी नाईकांनी टाकलेले पुरोगामी पाऊल म्हणजे श्रीमती वत्सला घाटे ह्या ब्राह्मण विदुषीशी प्रेमविवाह केला.
सार्वजनिक कार्य
कॉंग्रेसच्या कार्यात प्रत्यक्ष पडण्याआधी वसंतरावांनी सार्वजनिक कार्यात हिरीरीने भाग घेतला होता. स्वतःच्या म्हणजे बंजारा समाजाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले व दारुपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले. शेतीच्या मक्त्यात होणारी फसवणूक थांबविण्याकरता त्यांनी खूट मक्त्याच्या विरुध्द चळवळ केली. ह्या सर्व कार्यामुळे वसंतराव बंजारा जातीचे श्रेष्ठ पुढारी मानले जाऊ लागले. त्यांनी बंजारा समाजाला कॉंग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यातील लोकांना विज्ञाननिष्ठ विचाराकडे वळविले व त्याचबरोबर मतदानाबद्दल जागरूक केले.
वरील कार्यामुळे वसंतरावांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळून अनेक संस्था त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता येऊ लागल्या.
त्यांनी बहुली गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या. तेथे शिक्षणाची सोय केली. रस्तेबांधणीला चालना दिली. पुसद येथे महाविद्यालय सुरू केले. ते पुसद (१९४६) नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व कार्यामुळे लोक त्यांच्याकडे नेता म्हणून पाहू लागले.