आमचे मुख्यमंत्री -२९

10 kannamwar
१०. श्री. मा.सा.कन्नमवार

संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
(२०-११-६२ ते २४-११-६३)

यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यावर त्यांनी विदर्भातील कन्नमवार ह्यांची आपला वारस म्हणून निवड केली. कन्नमवारांना मुख्यमंत्रिपदावर चढविण्यात अर्थात राजकीय डाव होता. कन्नमवार हे विदर्भातले पहिले मुख्यमंत्री. शिवाय ते एका अर्थाने मागासलेल्या वर्गातील व सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपण दिल्लीला गेलो तरी महाराष्ट्र सरकारच्या राजकारणावर आपली पकड राहील अशी अटकळ. अधिकार स्वीकारल्यानंतर अर्थात कन्नमवारांनी आपण यशवंतरावांची दिंडी पुढे घेऊन जाणारा वारकरी अशी घोषणा केली. परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्रिपद त्यांना फार काळ लाभले नाही. कारण ते निधन पावले. ते २०-११-६२ ते २४-११-६३ ह्या एका वर्षाच्या ते काळात मुख्यमंत्री होते.

जन्म व शिक्षण

कन्नमवारांचे घराणे खरे तर आंध्र प्रांतातले. ते विदर्भात केव्हा आले ह्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. दादासाहेबांचा जन्म एका सामान्य घराण्यात १०-२-१९०० रोजी चंद्रपूर येथे झाला. दादासाहेबांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. त्यांचे आयुष्य तसे खडतरच. तिकिट कलेक्टर, दुकानदार, लिपिक असे अनेक उद्योग करून त्यांना आपला निर्वाह करावा लागला.

राष्ट्रीय चळवळीत भाग

त्यांनी १९२० च्या नागपूर कॉंग्रेसनंतर राष्ट्रीय चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९२० च्या नागपूर कॉंग्रेसनंतर राष्ट्रीय चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९२०ची असहकाराची चळवळ, मुळशी सत्याग्रह, १९२२ चा राष्ट्रीय सप्ताह ह्यांत ते सहभागी होते.

१९३० सालात ते चांदा तालुका कमिटीचे सेक्रेटरी होते. १९२९ साली त्यांनी गांधी सेवा मंडळ स्थापन करून सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. १९३० साली त्यांनी नोकरी सोडून कॉंग्रेसच्या कार्याला सर्वस्वी वाहून घेतले. १९३२ साली कायदेभंगात भाग घेतल्याबद्दल कारागृहवास भोगावा लागला.