आमचे मुख्यमंत्री -३५

जमीन महसूलाच्या बाबतीत त्यांनी सर्वंकष एकसूत्रता आणली. भांडवलाचा अभाव ही शेतीमधील मुख्य अडचण हे लक्षात घेऊन बॅंकेकडून शेतक-यांना पुरेसा व योग्य वेळी कर्जपुरवठा होईल ह्याकरता कार्य केले.
शिक्षणाबाबत वसंतरावांचे पाच सूत्री धोरण होते. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता उत्तेजन देणे, त्यांच्याकरता इतर भागांत महाविद्यालये स्थापण, उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्त्या देणे, त्यांच्याकरता वसतिगृहांत राखीव जागा ठेवणे आणि त्यांना पुस्तकांकरता अनुदान देणे हे त्यांच्या शैक्षणिक धोरणाचे पाच पैलू होते.

स्वातंत्र्यसैनिकांचा विचार करणारे नाईक हे पहिले मुख्यमंत्री म्हणण्यास हरकत नाही. त्यांना निवृत्तिवेतन, कसण्याकरता जमीन, मुलांच्या शिक्षणाकरता कर्ज व सवलती, त्यांच्या मुलांना नोक-यांत प्राधान्य ह्या हिताच्या योजना नाईकांनी आखल्या. सैनिकांकरताही ध्वजदिनाच्या दिवशी भरीव निधी गोळा करण्याचे प्रयत्न केले.

त्यांच्या कारकिर्दीत कृष्णा-गोदावरी नद्यांच्या पाण्याविषयी असलेला पाणीवाटपाचा तंटा आणि कर्नाटकाशी असलेला सीमावाद हे जटिल प्रश्न होते. ते प्रश्न सामोपचाराने सोडविले पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती.

त्यांच्या कारकिर्दीतील भरीव कामगिरीची कल्पना त्यांच्या कार्यामुळे येईल. साखर कारखान्यांच्या वाढीला उत्तेजन, मराठी ही राज्यभाषा ही घोषणा, दारुबंदीचे नवे धोरण, अन्नधान्याविषयी क्रियाशील धोरण, ज्वारी-कापूस बाजारात शेतक-यांच्या हितसंरक्षणाकरता हॅरीस पध्दतीचा अवलंब, शेतीला उद्योगधंद्याचा दर्जा देण्याची कल्पना, शेतीप्रधान उद्योगांना चालना, नवी पिके व शेतीचे नवे तंत्र ह्यांना उत्तेजन व शेतीमालाची किंमत ठरविणे हे त्यांच्या शेतीविषयक धोरणाचे प्रमुख पैलू होत. जमिनीच्या सुधारणाही त्यांच्याच कारकिर्दीत झाल्या. तसेच त्यांनीच मेट्रिक सिस्टिम सुरू केली. पशुपालन, दुग्धव्यवसाय, वसंत बंधा-याची कल्पना, फळबागांची वाढ ह्यांवर त्यांनी भर दिला. भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरता त्यांनी व्हिजिलन्स कमिशन नेमण्याचा निर्णय घेतला. निर्वासितांकरता नवीन गावाची स्थापना केली. अशा त-हेने आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत वसंतराव नाईकांनी सर्व क्षेत्रांत सुधारणा करण्याकरता प्रयत्न केले. रोजगार हमी योजना ही त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली.

नाईकांनी जवळजवळ ११ वर्षें मुख्यमंत्रिपद भूषविले. परंतु लोकमताबरोबरच कॉंग्रेसच्या चौकटीत अधिकार स्थानावरील दिवस श्रेष्ठींवर अवलंबून असतात. कारण १९७२ साली त्यांच्यावरील इंदिरा गांधींचे कृपाछत्र निघाले व मुख्यमंत्री म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर ते लोकसभेवर निवडून आले. परंतू प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडून कोणतेच भरीव कार्य झाले नाही. १८ ऑगस्ट १९७९ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे ह्रदयविकाराने निधन झाले.