कथारुप यशवंतराव-मुख्यमंत्री कुणासाठी थांबत नसतो !

मुख्यमंत्री कुणासाठी थांबत नसतो  !
 
वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वयाने त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये होते. ते यशवंतरावांना मनापासून मान  देत नसत, त्यांना पोरसवदा समजत. यशवंतराव मात्र त्यांना तो मान देत असत.

मुख्यमंत्री असताना एकदा ते विदर्भाच्या दौ-यावर गेले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा विदर्भाचा पहिलाच दौरा होता. त्यावेळी बियाणी शेठ हे विदर्भातील मोठे नेते होते. यशवंतरावांनी त्यांना आपल्या दौ-यात बरोबर घेतले होते. नागपूरला मुक्काम होता. एके दिवशी सकाळी सर्वजण सर्किट हाऊसवर जमले. सकाळची मानवंदना झाली आणि मुख्यमंत्री गाडीत जाऊन बसले, पण गाडी सुटेना. यशवंतरावांनी कारण विचारले तेव्हा एक अधिकारी म्हणाला, ' शेठजींचा फोन चालू आहे.' सुमारे पाच सहा मिनिटे शेठजी फोनवर बोलत होते. तोपर्यंत सगळा ताफा जागेवरच थांबला होता. फोन संपल्यावर शेठजी आले आणि गाड्या सुरू झाल्या. यशवंतरावांना ते आवडले नाही. पण त्यांनी फारसे मनाला लावून घेतले नाही. मात्र दुस-या दिवशीही तसेच झाले. मुख्यमंत्री आपल्या सहका-यांसह गाडीत बसल्यावर बियाणीशेठ स्वत:च्या गाडीतून उतरले आणि चालत जाऊन सर्किट हाऊसच्या व्हरांड्यात उभे राहून कुणाला तरी फोन लावू लागले. आता मात्र यशवंतराव संतापले. अधिका-यांना म्हणाले, ' गाड्या सुरू करा.'
कोणीतरी म्हणाले, ' शेठजींचा फोन चालू आहे.'

साहेब म्हणाले, ' त्यांना सांगा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणासाठी थांबत नसतो.' आणि गाड्या सुटल्या. यशवंतरावांनी मुख्यमंत्रीपदाची शान नेहमीच राखली आणि वाढवली.