कथारुप यशवंतराव- ... तर बरे झाले असते !

... तर बरे झाले असते  !

कै. दादासाहेब साखवळकर हे कोरेगाव ( जि. सातारा ) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. यशवंतरावांचा आणि त्यांचा चांगला स्नेह होता. स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यात काँग्रेसची सरकारे आली. सत्तेच्या सोबतीने काँग्रेस पक्षात काही अपप्रवृत्ती शिरल्या. दादासाहेबांसारख्या ध्येयवादी स्वातंत्र्यसैनिकांना हे पटत नसे.

त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती. महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेसविरोधी होत चालले होते. अशातच एकदा कोरेगाव येथे यशवंतरावांची सभा होती. दादासाहेब सभेचे अध्यक्ष होते. दादासाहेबांचे भाषण चांगले झाले. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी काँग्रेसमधील अपप्रवृत्तींवर टीका केली. ' गांधी, नेहरूंची काँग्रेस आता राहिलेली नाही' असं ते म्हणाले. खरे म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सभेत काँग्रेसवरच टीका करणे राजकीयदृष्ट्या चुकीचे होते. पण दादासाहेबांसारख्या निस्वार्थी देशभक्तांना याची पर्वा नव्हती. सभा संपली. पुढे पुसेगावला एक सभा घेऊन यशवंतराव मुंबईला गेले. मुंबईहून त्यांनी दादासाहेबांना पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी लिहिले -

' आपण आम्हाला गुरूस्थानी आहात. काँग्रेस पक्षात आपणाला भीष्माचार्यांचा मान आहे. आमचे काही चुकत असेल तर कान धरून तसे सांगण्याचा हक्क आपणाला जरूर आहे. परंतु तो हक्क चार भिंतीच्या आत बजावला गेला असता तर बरे झाले असते.'

इतरांचा सन्मान जपूनही निषेध कसा व्यक्त करावा हे यशवंतरावांपासून शिकण्यासारखे आहे.