कथारुप यशवंतराव- नेहरूंचे आशीर्वाद

नेहरूंचे आशीर्वाद

सन १९५६ साली द्वैभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब हिरे यांच्यात चुरशीची लढत झाली. मोरारजी देसाईंनी यशवंतरावांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले व ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची यादी तयार केली. काँग्रेसचे नेते आणि देशाचे पंतप्रधान या नात्याने पं. नेहरुंना ही यादी दाखवावी म्हणून साहेब दिल्लीला गेले, नेहरूंना भेटले व म्हणाले, ' मी माझ्या मंत्रिमंडळाची आखणी केली आहे. आपण ती पाहून घ्यावी आणि योग्य ते बदल करावेत, ही विनंती.'

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभारात नेहरु सहसा हस्तक्षेप करीत नसत. त्यांनी यादीतील एक नाव खोडले व त्याठिकाणी दुसरे नाव लिहिले. मग साहेबांना म्हणाले, 'तुम्हाला योग्य वाटले, तर हा बदल करा. '
मग आणखी काही वेळ चर्चा झाली. शेवटी नेहरुंचे आभार मानून निघताना यशवंतराव वाकून त्यांना नमस्कार करीत म्हणाले, ' पंडितजी, मला आपले आशीर्वाद द्या.' हे ऐकताच का कोण जाणे, पण पंडितजी रागावले व ताडकन म्हणाले , ' माझे आशीर्वाद इतके स्वस्त नाहीत. ( My Blessings are not cheap ) आणि ते उठून उभे राहिले. साहेबांना अपमानास्पद झाले. नेहरुंच्या दालनातून बाहेर पडल्यावर ते तडक विमानतळावर गेले. त्यांच्या चेह-यावर उसने हसू होते पण मनात खोल जखम झाली होती. ते विचार करु लागले की पंडितजींनी मला आशीर्वाद का दिले नसतील ? मग त्यांच्या लक्षात आले की मी माझ्या शक्तीवर व लोकप्रियतेवर मुख्यमंत्री झालेलो नाही. मोरारजींच्या कृपेमुळेच मी या पदावर आहे. थोडक्यात, पंडितजींच्या दृष्टीने मी वशिल्याचा मुख्यमंत्री होतो आणि हेच त्यांना आवडले नसावे. त्यादिवशी दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानात बसूनच साहेबांनी निर्धार केला - जोपर्यंत आपण स्वत:ची कर्तबगारी सिद्ध करीत नाही तोपर्यंत नेहरुंजवळ बसायचे नाही.

पंतप्रधान राज्याच्या दौ-यावर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे असा संकेत आहे. त्यानंतर काही दिवसांनी पंडितजी महाराष्ट्रात आले. यशवंतराव दौ-यात सामील झाले, पण मोटारीत बसण्याची वेळ आली की ते मुद्दाम हळू चालायचे. नेहरु व राज्यपाल यांना मागच्या सीटवर बसू द्यायचे व मग स्वत: ड्रायव्हरजवळच्या सीटवर बसायचे. त्यानंतरही अनेकवेळा नेहरु महाराष्ट्रात आले पण मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव एकदाही त्यांच्याजवळ बसले नाहीत. त्यांच्या मनात एक भळभळणारी जखम होती.

पुढच्या काळात यशवंतरावांनी बेरेजेचे राजकारण केले. गुणीजनांना मान दिला. गरीबांना आधार दिला. नवनवीन योजना आखल्या. महाराष्ट्रातील वातावरण बदलले. नेहरुंच्या लक्षात हा बदल आला. असेच एकदा पंडितजी महाराष्ट्राच्या दौ-यावर आले होते. गाडीत बसण्यासाठी सर्वजण चालले होते. नेहमीप्रमाणे यशवंतराव मागे रेंगाळू लागले, पण पंडितजींनी पटकन् त्यांचा हात धरला व त्यांना स्वत:जवळच्या सीटवर बसवले. गाडी सुरू झाल्यावर नेहरुंनी साहेबांकडे पाहिले व म्हणाले, Chief Minister, now you have my blessings '