कथारुप यशवंतराव- का उगाच ताटकळता ?

का उगाच ताटकळता ?

१९५२ ची विधानसभा निवडणूक जिंकल्यावर यशवंतराव मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात पुरवठा मंत्री झाले. मुंबईत राहू लागल्यावर यशवंतरावांनी आपल्या आईला ; विठामातेला आपल्याबरोबर राहण्यासाठी मुंबईला नेले होते. मंत्री असल्यामुळे साहेबांना पोलीस संरक्षण लाभले होते. एकेकाळी पोलीसांना सापडू नये म्हणून भूमीगत होणा-या आपल्या मुलाला येता- जाता पोलीस अधिकारी सलाम करतात हे पाहून विठामातेचा ऊर अभिमानाने भरून येई.

एकदा रात्री अकराच्या सुमाराला विठाबाईंना जाग आली. पुन्हा झोप येईना म्हणून त्या सहज बाहेरच्या दरवाजापर्यंत आल्या. घराबाहेर दोन पोलीस पहारा करीत होते. त्यांना पाहून विठामाता मायेने म्हणाल्या, ' आरं बाबानू, का उगा ताटकळता ? येसवंता झोपलाय वरती. तुमीबी झोपा की आता. ' बिचा-या पोलीसांना काय करावे कळेना. ते ' हो हो ' म्हणाले, पण विठामाता एवढे म्हणून थांबल्या नाहीत. आत जाऊन त्यांनी घरातल्या मंडळींना उठवले व सांगितले, ' बाहेर पोलीस ताटकळलेत. त्यांना सतरंजी व उशी नेऊन द्या. त्यांना झोपू द्या. ' हा सगळा गोंधळ ऐकून यशवंतराव जागे झाले आणि बाहेर आले. चौकशी केल्यावर त्यांना गोंधळाचे कारण कळले. साहेब हसून पोलिसांना म्हणाले, ' तुम्ही झोपल्याशिवाय आमची आई झोपणार नाही. तुम्ही झोपा.'