कथारुप यशवंतराव-अधिक काय लिहावे ?

अधिक काय लिहावे ?

यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतील हा प्रसंग. त्यांचे वास्तव्य दिल्लीत होते, पण अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचे महाराष्ट्रात येणे व्हायचे. यापैकी बहुतेक समारंभ सांस्कृतिक व वाङ्मयीन विश्वाशी निगडीत असायचे. राजकीय सभांपासून ते काहीसे दूर पडत चालले होते.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी ' स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था ' स्थापन केली आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासाचे चक्र गतीमान केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना गुरू मानणा-या बापूजींनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार हे ध्येय उराशी बाळगून खेडोपाडी माध्यमिक शाळांचे जाळे विणले. यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना व पुढे केंद्रात गेल्यावरही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला सढळ हाताने मदत केली होती. बापूजींचे आता वय झाले होते. संस्थेच्या पदाधिका-यांनी त्यांचा भव्य सत्कार करायचे ठरविले. बापूजींचा सत्कार करण्यासाठी यशवंतरावांहून अधिक योग्य व्यक्ती कोण असणार होती ?साता-यातील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य मो. नि. ठोके यांनी १९८२ च्या मार्च महिन्यात यशवंतरावांना दिल्लीच्या पत्त्यावर पत्र पाठवले.

यशवंतरावांनी हे निमंत्रण आनंदाने स्वीकारले. ' एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मला वेळ आहे. तारीख आणि वेळ आयोजकांनी ठरवावी' असे त्यांनी पत्राने ठोकेंना कळविले. त्याप्रमाणे सत्कारसमारंभ सकाळी अकरा वाजता होईल असे आयोजकांनी यशवंतरावांना कळविले. हा कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी यशवंतराव पिंपोडे ( ता. कोरेगाव ) येथे दुस-या एका छोट्या घरगुती समारंभाला जाणार होते. पण कार्यक्रमापूर्वी काही दिवस अगोदर सत्कारसमारंभाची वेळ बदलून ती दुपारी चारची करण्यात आली. आयोजकांनी केलेला हा बदल मो. नि. ठोकेंनी यशवंतरावांना पत्र लिहून कळविला. सत्कार समारंभाची वेळ बदलल्याने यशवंतराव अस्वस्थ झाले. या बदलामुळे त्यांचे पुढील अनेक कार्यक्रमांचे वेळापत्रक कोलमडणार होते. मग यशवंतरावांनी स्वहस्ताक्षरात ठोकेंना पत्र लिहिले. या पत्रात ते म्हणतात,

' श्री. प्रा. ठोके, यांस सनविवि,

तुमचे पत्र मिळाले. समारंभाची वेळ सकाळची अकरा वाजताची ( मला तसे सांगण्यात आले होते ) बदलून आपण माझी मोठी गैरसोय केली आहे. मला हा कार्यक्रम झाल्यावर पिंपोडे येथे पाच वाजता पोहोचायचे आहे. तेव्हा कृपा करून सायंकाळची चार वाजताची वेळ बदलून अडीच- तीनची केल्यास मला मदत होईल. अधिक काय लिहावे ?'
आपला,

यशवंतराव चव्हाण
या छोट्याशा पत्रातून यशवंतरावांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची पुरेपूर ओळख पटते. खरेतर साहेब सांगतील त्या दिवशी व सांगतील त्या वेळी आयोजकांनी कार्यक्रम घेतला असता इतका त्यांच्या शब्दाला मान होता. पण आदेश देण्याचा अधिकार असतानाही विनंती करूनच काम सांगायचे हा यशवंतरावांचा स्वभाव होता. म्हणूनच सत्तेने साथ सोडली तरीही त्यांच्या सुसंस्कृतपणाला ओहोटी लागली नाही. आजचा महाराष्ट्र साहेबांची आठवण काढतो ती या अभिजात आणि निखळ सुसंस्कृतपणासाठीच !