कथारुप यशवंतराव- मला घाई झालेली नाही !

मला घाई झालेली नाही !

सन १९६९ सालचे काँग्रेसचे बंगळूर अधिवेशन गाजले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोरारजी देसाई, स.का. पाटील, अतुल्य घोष, निजलिंगप्पा इत्यादींशी तीव्र मतभेद झाले. काँग्रेस पक्षात फूट पडली. ' इंडिकेट ' व ' सिंडीकेट ' अशी काँग्रेसची दोन शकले झाली. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत संजीव रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. पण इंदिरा गांधींनी त्यांचा पराभव करून ग्यानी झैलसिंग यांना निवडून आणले. मग त्यांनी मोरारजींचे अर्थखाते काढून घेतले. यशवंतरावांनी आणि महाराष्ट्र काँग्रेसने निवडणुकीत रेड्डींना पाठिंबा दिला होता. हा राग मनात धरून इंदिरा गांधींनी यशवंतरावांच्या खात्यातील काही विभाग काढून घेतले व पुढे तर त्यांचे खातेच बदलले. अशा वातावरणात सिंडीकेटने यशवंतरावांना ऑफर दिली की त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास संमती द्यावी. इंदिरा गांधीच्या जागी त्यांना पंतप्रधानपदी बसविण्यास सिंडीकेट काँग्रेसची नेतेमंडळी तयार आहेत. यशवंतरावांच्या काही निकटवर्तीयांकडून यासाठी थोडाफार दबावही आणण्यात आला. पण यशवंतराव आपल्या सहका-यांना ठामपणे म्हणाले, ' उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या पाठिंब्यावर मला या देशाचे पंतप्रधान व्हायचे नाही. ही मंडळी आज वर चढवतील आणि थोड्या दिवसांनी खाली ओढतील. मला पंतप्रधानपदाची घाई झालेली नाही. व्यक्तिगत मोठेपणापेक्षा देशाच्या भल्याच्या विचाराला आपण प्राधान्य देतो.'

यशवंतरावांच्या या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. काहीजणांनी ' साहेब कचखाऊ आहेत ' अशी टीकाही केली. यशवंतरावांचे मित्र व पत्रकार अनंतराव कुलकर्णी यांनी त्यांना लोकांची ही प्रतिक्रिया सांगितली तेव्हा ते म्हणाले, ' पंतप्रधानपद आपसात भांडून मिळविले तर हा देश नीट चालविणे अशक्य होईल. विरोधकांना काँग्रेसमध्ये फूट हवी आहे. मी माझ्या हाताने फूट पडू देणार नाही. औट घटकेच्या पंतप्रधानपदाची मला हौस नाही. माझ्यावर सोपविलेल्या खात्याची जबाबदारी मी उत्तम रितीने पार पाडत आहे. त्यात मला समाधान आहे.'