कथारुप यशवंतराव- बाळ वाढतंय याचा आनंद आहे !

बाळ वाढतंय याचा आनंद आहे !

यशवंतराव केंद्रात अर्थमंत्री असताना पुण्यातील शनिवारवाडयासमोर एकदा त्यांची सभा होती. त्यावेळी देशात महागाई वाढली होती आणि नेहमीप्रमाणे लोक त्यासाठी अर्थमंत्र्यांना जबाबदार धरत होते. यशवंतरावांचे भाषण चालू असताना व्यासपीठावर बसलेले एक पुणेकर खोचकपणे म्हणाले, ' वाढत्या महागाईवर बोला. '

यशवंतराव म्हणाले, ' हो..., मी बोलतो.'

पुढे ते भाषणात म्हणाले, ' महागाई वाढल्यामुळे सामान्य माणसाला झळ बसते हे खरे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत अधिक भांडवली गुंतवणूक केली व समाजाच्या हातामध्ये अधिक रक्कम गेली की क्रयशक्ती वाढते व त्यामुळे आवश्यक वस्तूंची मागणी वाढते. पण त्या वस्तूची कमतरता असेल तर तिची किंमत वाढते. आपण एक उदाहरण घेऊ. नुकतंच लग्न झालेलं एक जोडपं होतं. लग्नाला पाच- सहा वर्षे झाली तरी त्यांच्या घरात पाळणा हलला नाही. नवससायास झाले. कर्मधर्मसंयोगाने त्या माऊलीला दिवस गेले आणि वर्षभरातच घरामध्ये एक गोंडस बाळ आलं. सर्वांना आनंद झाला. बघता बघता एक वर्ष निघून गेलं. आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करायचा असं दोघांनी ठरवलं. पण घरात तर पैसे नव्हते. मग त्या शेतक-याच्या बायकोने गळ्यातील मंगळसूत्रामध्ये असलेला सोन्याचा एक लहान तुकडा मोडला व बाळासाठी एक सिल्कचं ( रेशमी ) झबलं घेतलं. घरात गोडधोड करून त्यांनी बाळाचा वाढदिवस साजरा केला. गरीबी तर होतीच. मग तिचे ते कपडे पेटीत जपून ठेवले. पुढच्या वर्षी उपयोगाला येतील म्हणून. एका वर्षानंतर बाळाचा दुसरा वाढदिवस आला. नवरा म्हणाला, ' आता आपल्याकडं मोडायला काही नाही. तू गेल्यावर्षी पेटीत ठेवलेलं झबलं काढ. तेच बाळाला घालूया.' त्याप्रमाणे बायकोने पेटीतून झबलं काढलं, पण बाळाचं अंग त्यात मावेना. शेतकरी नाराज झाला, पण बायको मात्र खूश झाली. ती म्हणाली, ' हे झबलं बाळाला बसत नाही, याचं मला दु:ख नाही. बाळाचं अंग वाढतंय, याचा मला आनंद आहे.' हे उदाहरण सांगून यशवंतराव पुढे म्हणाले, ' देशाच्या अर्थव्यवस्थेतसुद्धा असंच होत असतं. भांडवली गुंतवणूक जास्त प्रमाणात केल्यावर त्यासोबत काही गोष्टी येत असतात. पण त्याची चिंता समाजाने करायची नसते.'

या चपलख उदाहरणाने प्रश्नकर्ता व समोर बसलेल्या पुणेकरांचे समाधान झाले.