कृष्णाकांठ१०

रामोशी गल्लीतील काही मुलांच्याबरोबर देवराष्ट्राच्या माळावर केलेल्या उनाडक्या मला आजही आठवतात. एके दिवशी दुपारनंतर देवराष्ट्रापासून दोन मैलांवर असलेल्या डोंगरावर करवंदे खाण्याकरता म्हणून चार-सहा मुलांची टोळी गेली होती. त्या मुलांचा डोंगर चढण्याचा सराव व करवंदे काढण्याची कुशलता पाहून मी काहीसा शहरी झालो आहे, याची जाणीव वयाच्या आठव्या दहाव्या वर्षी झाली. पण मला करवंदांपेक्षाही या मुलांच्या संगतीत एक वेगळीच चव आली होती. मी कराडसारख्या एका मोठ्या गावातून सुट्टीसाठी तेथे येत असल्यामुळे मला ते थोडे अदबीने आणि प्रेमाने वागवीत असत. ते ज्या गोष्टी करू शकतात, त्या करण्यात आपण मागे नाही, हे दाखविण्याचा माझा प्रयत्न असे. पण तो नेहमीच यशस्वी होत नसे. मला आठवते, एकदा सोनहि-याच्या काठी आम्ही गेलो होतो. अनपेक्षितपणे ओढ्याला एकदम पाणी आले. अशा ओढ्याच्या पाण्याला, नदीच्या पाण्यापेक्षा जास्त ओढ असते. मला वाटते, ही ओढ जास्त असते, म्हणूनच त्याला 'ओढा' म्हटले जात असेल. ओढ्याचे पाणी एकदम चढत असे. आणि तसे ते चार-दोन तास राहून निघून जात असे. मी कोयनेमध्ये पोहायला शिकलो होतो. या पोहण्याच्या शहरी अनुभवाच्या आधारावर, ज्या दिवशी सोनहि-याला थोडे पाणी जास्त आले होते, त्या दिवशी त्या ओढ्यात पोहण्यासाठी म्हणून मी अंग टाकून दिले. मला वाटले होते, की मी त्या ओढ्याचे अरूंद पात्र केव्हाच, सहज पोहून जाईन. परंतु प्रत्यक्ष अनुभव काही वेगळाच आला. पोहण्याचा थोडा-फार प्रयत्न करून पुढे गेल्यानंतर, मध्य धारेच्या जवळपास असताना मला इतकी ओढ लागली, की मला असे वाटले, की मी आता बुडून जाणार. माझा धीर काहीसा खचला होता आणि शरीर पण थकून जाणार, असे वाटू लागल्यानंतर मी काठावरच्या बरोबरच्या मित्रांना  हाक दिली.  त्यातल्या  दोघा-तिघांनी उड्या टाकल्या आणि मला मदत करून ओढ्याबाहेर काढले. क्षणभर मनात असे येऊन गेले, की आपण आज बुडणार होतो; पण ओढ्यात पोहण्याची सवय असणा-या मित्रांनी मला आज वाचविले होते. मी काहीसा शरमिंदा झालो होतो. मला वाचविणारी मुले माझी चेष्टा करू लागली आणि म्हणू लागली,

''आमचा सोनहिरा कृष्णा-कोयनेपेक्षा जबरदस्त आहे, हे लक्षात आले का?'' त्यांचे म्हणणे एका अर्थाने खरे होते. कृष्णा-कोयनेचे मोठेपण हे तर खरेच आहे; पण सोनहि-याचे स्वत:चे काही महत्त्व आहे, हे माझ्या अनुभवास आल्यामुळे मी त्यांना तशी कबुली दिली. सोनहि-यामध्ये माझा पुनर्जन्म झाला, अशी काहीशी भावना तेव्हापासून माझ्या मनात आहे.

देवराष्ट्र येथील आणखी किती तरी आठवणी आहेत. त्या सगळ्या देऊ लागलो, तर सगळा वेळ व जागा यातच जाईल, म्हणून हे आवरते घेतले पाहिजे.  पण त्यांतली एक आठवण घेतल्याशिवाय हे काम पुरे होणार नाही.

मी इंग्रजी शाळेत जाऊ लागल्यानंतर जेव्हा देवराष्ट्राला येत असे, तेव्हा आमच्या आजोळच्या घरचे एक मित्र श्री. सखाराम म्हस्के यांचे व माझे वारंवार संभाषण होई. ते मला नेहमी म्हणायचे,

''तू किती शिकणार आहेस?''

मी सांगत असे,

''जितके जास्त शिकता येईल, तितके मी शिकणार आहे.''

ते मला म्हणायचे,

''मामलेदार होण्याइतके तू  शिकशील का ? ''

मी त्यांना उत्तर देई,

''हो, इतके तर नक्कीच शिकेन.''

मग पाणावलेले डोळे करून ते मला म्हणायचे,