ते उत्कृष्ट शिल्पकारही होते. मोकळा वेळ मिळेल, तेव्हा ते संगमरवरी मूर्ती तयार करण्याचे काम करत असत. मला माझ्या लहानपणाची आठवण आहे. बाळनाथबुवांच्या मठामध्ये ते एका संगमरवरी दगडातून सुंदर अशी दत्ताची मूर्ती तयार करीत होते. तेव्हा आम्ही काही मुले तेथे जाऊन, लांब उभे राहून ते हे कलापूर्ण काम कसे करतात, ते तासन् तास कुतूहलाने पाहत असू.
भाऊसाहेब कळंब्यांनी कराड तालुका, पाटण तालुका, वाळवे तालुका, येथल्या बहुजन समाजांतील अनेक कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षून घेतले होते. आणि या कार्यकर्त्यांची वर्दळ तेथे सतत चालू असे. आम्ही सर्व लहान मुले मोठ्या आदराने आणि कौतुकाने हे सर्व पाहत असू. माझ्या मधल्या बंधूंच्या या 'विजयाश्रमा'च्या प्रेमामुळे आणि श्री. भाऊसाहेब कळंबे यांच्याविषयीच्या आदरामुळे माझ्याही मनात ते विचार घोळत असत आणि त्यांबद्दल आकर्षण व आदर वाढत होता. नाही म्हटले, तरी सत्यशोधकीय व ब्राह्मणेतर चळवळीचे संस्कार मनावर नकळत होतच होते.
याच काळात, म्हणजे १९२७ किंवा त्यापूर्वीचे साल असेल. श्री. भास्करराव जाधव हे तेव्हाच्या मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे उमेदवार म्हणून आमच्या जिल्ह्यातून उभे राहिले होते. त्यावेळी मला निवडणुकीच्या बारकाव्यांची माहिती नव्हती. पण श्री. भास्करराव जाधव हे आपले प्रतिनिधी असावेत, अशी जी बहुजन समाजाची इच्छा होती, तिच्याशी मी सहमत होतो आणि तीमुळे मी भारावूनही गेलो होतो. त्या निवडणुकीत मी एक स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो आणि त्यासाठी कराडशेजारच्या चार-दोन गावी जाऊन आलो. निवडणुकीशी माझा जो संबंध आला, तो इतक्या लहान वयात आला आणि तेव्हापासून तो आजतागायत टिकला आहे.
श्री. भास्करराव जाधव निवडून आले आणि मुंबई राज्याचे दीवाण झाले. त्या वेळी मंत्र्यांना दिवाण म्हणत असत. आम्ही सर्व मंडळी फार आनंदी झालो.
याच काळात केव्हा तरी दुसरी एक घटना घडल्याची मला आठवण आहे. कराडला हल्ली जेथे आमचे घर आहे, त्याच्यापुढे एक मैदान आहे. या मैदानात महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय जोडी श्री. केशवराव जेधे आणि श्री. दिनकरराव जवळकर यांची एक तुफान सभा झाली. मी 'तुफान' शब्द अशासाठी वापरतो आहे, की माणसे फार तुफान गर्दीने जमली होती, या अर्थाने नव्हे; पण या सभेमध्ये श्री. दिनकरराव जवळकर यांनी केलेले भाषण हे अगदी तुफान किंवा खळबळ माजवणारे होते. त्यांनी व्याख्यानाचा विषय ठेवला होताः 'ब्राह्मणांचे भवितव्य'. ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत कठोर अशी टीका त्यांनी भाषणात केली होती. मी ते भाषण लक्ष लावून ऐकले होते. त्या सभेत त्यांनी लिहिलेले 'देशाचे दुश्मन', हे पुस्तकही वाटले जात होते. त्याची एक प्रत मी मिळवली आणि पुढे ती वाचून काढली.
मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे, की या सभेनंतर माझ्या मनामध्ये एक संघर्ष सुरू झाला. त्याची परिणती अशी झाली, की मी मनाने आणि विचाराने आमूलाग्र बदललो. मी त्यानतंर माझे मधले बंधू गणपतरावांशी त्यावेळच्या माझ्या समजुतीप्रमाणे चर्चा करू लागलो. वेगळे प्रश्न विचारू लागलो. विशेषतः, श्री. जवळकरांनी टिळकांच्यावर केलली टीका ही बरोबर नव्हती, असे माझ्या मनाने घेतले, कारण तोपर्यंत मी थोडे - फार वाचू लागलो होतो. लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरूद्ध लढणारे एक सेनापती आहेत, अशी माझी भावना होती. त्यामुळे अशा थोर माणसावरती टीका करणारी माणसे ही इंग्रजांचे मित्र तर नाहीत ना ? अशा तऱ्हेची शंका व विचार माझ्या मनात येऊन गेला होता. मला आश्चर्य वाटते, की त्या छोट्या वयात माझ्या मनात हा विचार आला. आणि परिणामी या सर्व प्रकारानंतर मी ज्या वातावरणात राहत होतो आणि वाढत होतो, त्याच्यापेक्षा वेगळे ठिकाण, वेगळी सहवासाची माणसे शोधणे याची गरज आहे, असे वाटू लागले.