कृष्णाकांठ६

यापुढचे माझे सारे आयुष्य पितृप्रेमाला वंचित असेच गेले. त्यामुळे आईचे प्रेम दुपटीने वाढले असले पाहिजे, असे माझे मत आहे. तिने आम्हांला दिलासा दिला, जिव्हाळा दिला. आमच्याकडे पाहून तिने आपले दु:ख गिळले. ख-या अर्थाने वडिलांनंतर आम्ही अक्षरश: पोरके झालो होतो. आजी व मामांचा आसरा होता; पण त्यालाही काही मर्यादा होत्या. माझ्या आईकडून मी तिच्या पुढच्या प्रपंचाची जी हकीकत ऐकली आहे, तीवरून पुढचे सर्व काही तिला एकटीला एकाकी पद्धतीने करावे लागले.

आपल्या माहेरी फार दिवस राहणे तिला शक्य नव्हते. प्लेगचे दिवस संपताच आम्ही कराडला जेथे भाड्याच्या घरात राहत होतो, त्या घरी आलो. पुढे काय, असा प्रश्न होता. घरात मिळवता हात नव्हता. शेतीचे उत्पन्न चुलत्यांच्याकडून केव्हा काही मिळाले, तर मिळे, अशी परिस्थिती होती. शेती हा व्यवसाय स्वतः न करणा-याचा नव्हे. त्यात जो राबेल, त्यालाच काही तरी मिळते. इतरांना ते कसे मिळणार? आमच्या आईने कष्ट करून चार-सहा महिने तरी आम्हांला धीर दिला आणि जगवले.

यावेळी माझे थोरले बंधू ज्ञानदेव हे सतरा-अठरा वर्षांचे होते. माझ्या वडिलांचे अनेक बेलीफ मित्र माझ्या आईच्या सांत्वनासाठी येत आणि आपण काही तरी प्रयत्न करू, असे सांगून जात. माझे वडील अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारे गृहस्थ होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल समव्यवसायातील मंडळीना आपुलकी होती. विशेषतः कराडचे त्यावेळचे मुन्सफ यांनाही सहानुभूती होती. त्यांनी माझ्या आईला बोलावून धीर दिला, आणि सांगितले,

''तुमच्या थोरल्या मुलाला बेलिफाची नोकरी द्यावी, अशी मी शिफारस करतो.''

मला त्या मुन्सफाचे नाव आजही माहीत नाही, याची मला खंत आहे. पण आमच्यासाठी खूप खटपट करणारे माझ्या वडिलांचे मित्र बेलीफ श्री. शिंगटे यांची आठवण मात्र झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या थोरल्या बंधूंना नोकरी मिळावी, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्या खात्यात त्यांच्याही ओळखी-पाळखी होत्या आणि एकमेकाला मदत करण्याची त्यावेळची परंपराही होती. त्यांनी अशी कल्पना सुचवली, की आमच्या आईने आपल्या दोन धाकट्या लेकरांना बरोबर घेऊन, सातारला तेव्हा असलेले जिल्हा न्यायाधीश अधिकारी-कोणी इंग्रज गृहस्थ होते, त्यांना जाऊन भेटावे.

त्याप्रमाणे एके दिवशी रात्रीच्या रेल गाडीने आम्ही कराड स्टेशनहून सातारला जायला निघालो. सातारला रेल्वेने जायचे, म्हणजे कोरेगावपर्यंत जायचे. आणि तेथून अकरा मैल बैलगाडीने सातारला जावे लागत असे. मोठ्या पहाटेस आम्ही कोरेगाव स्टेशनवर उतरलो आणि तेथून एका बैलगाडीने - त्यावेळी तिला तिकडे छकडा म्हणत असत, त्यातून सातारला जाण्यास निघालो. बैलाच्या गळ्यातल्या घंटेचा मंजुळ आवाज आणि त्या नादात अर्धवट झोपेत व अर्धवट जागत केलेला तो प्रवास अजूनही माझ्या लक्षात आहे. या प्रवासात श्री. शिंगटे आमच्या बरोबर होते. त्यांनी आपल्या ओळखीच्या ठिकाणी आम्हांला नेले व दुपारी जिल्हा न्यायाधीशाच्या कोर्टात घेऊन गेले. सातारच्या न्यायाधीशाचे कोर्ट म्हणजे सातारचा राजवाडा. त्या राजवाड्याचे त्यावेळी पाहिलेले ते धूसर चित्र अजूनही माझ्या डोळ्यांपुढे अंधूक तरंगत आहे.  आम्ही दोन्ही लहान भावंडे आणि माझी आई कोर्टात बराच वेळ थांबलो होतो. मध्येच येणारे-जाणारे आमची मोठ्या सहानुभूतीने चौकशी करीत होते. थोड्या वेळाने श्री. शिंगटे आम्हांला म्हणाले,

''चला, तुम्हांला साहेबांच्या पुढे उभे करायचे आहे.''

- आणि ते आम्हांला त्यांच्या ऑफिसमध्ये दुस-या एका अधिका-याकडे घेऊन गेले, इतके मला स्मरण आहे.