कृष्णाकांठ१३

गाव जरी लहानसा कसबा असले, तरी त्याला स्वत:चे एक व्यक्तिमत्त्व होते आणि आहे. व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र. विद्याव्यासंगाची व ज्ञानोपासनेची जुनी परंपरा. कृष्णाकाठी बहुधा ब्राह्मण वसती. कोयनाकाठी मराठा व इतर जमाती यांचे वास्तव्य. गावाच्या मध्यवस्तीत व्यापारी पेठ, मंडई आणि उंचवट्यावर मुस्लिम मोहल्ले. गावाच्या पूर्व बाजूला हरीजनांचे वाडे.  सर्वसामान्यतः एकमेकांशी संबंध ठेवून राहण्याची रीत या गावात होती. माझ्या विद्यार्थिदशेत या गावात एक हायस्कूल आणि कसेबसे चालणारे एक सार्वजनिक वाचनालय होते. पण हे वाचनालय व्याख्याने व चर्चा यांचे महत्त्वाचे केंद्र असे. या गावाला राजकीय परंपरा होती. राष्ट्रीय विचारांची चांगली जाण असलेल्या अनेक व्यक्ती येथे होत्या. आळतेकर पिता-पुत्र, श्री. पांडुअण्णा शिराळकर, बाबूराव गोखले, गणपतराव बटाणे, किसनलाल प्रेमराज ही त्यांतली वानगीदाखल काही नावे. लोकमान्य टिळकांचे स्मारक म्हणून गावातील प्रमुखांनी येथे इंग्रजी शाळा सुरू केली. सांस्कृतिक क्षेत्रातले हे एक महत्त्वाचे पाऊल होते. आज कराड हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे, त्याची ती सुरुवात होती. या लहानशा गावाला राजकारणाचा मोठा नाद होता. देशातल्या महत्त्वाच्या सर्व राजकीय चळवळींचे प्रतिनिधी तेथे होते. आणि ते सर्व क्रियाशील होते.  अशा गावाच्या संस्कारांत मी वाढत होतो.

कराडच्या वातावरणामध्ये आम्ही जेव्हा वाढत होतो, तेव्हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये काही नवे प्रवाह आणि नव्या शक्ती काम करत होत्या. योगायोगाने कराडमध्ये ज्या भागात व ज्या जागेमध्ये आम्ही भाड्याने राहात होतो, तिथे कराडमधल्या खानदानी मराठा कुटुंबाची महत्त्वाची वस्ती होती. कराडमध्ये जिला डुबल आळी म्हणत असत, तेथे आम्ही राहात असू. ही मराठा समाजातील प्रतिष्ठित कुटुंबे असल्यामुळे व कराड हे मध्यवर्ती व महत्त्वाचे स्थान असल्यामुळे तेथे बरीचशी मोठी मंडळी येत-जात असत. त्या मंडळींच्या तेथे चालू असलेल्या बोलण्या-चालण्याचा भाग जो आम्ही ऐकत असू, त्यावरून त्यांच्या विचारांची कल्पना येऊ लागली. आम्हांला समजू लागले, की बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सत्यशोधक चळवळ किंवा पुढे तिला राजकारणामध्ये ब्राह्मणेतर चळवळ असे स्वरूप आले; ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी बहुजन समाजातल्या मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, वाचन केले पाहिजे, सार्वजनिक कामांत भाग घेतला पाहिजे. अशा तऱ्हेचे मानसिक व वैचारिक वातावरण त्यावेळी तेथे होते.

या सुमाराला कराडमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती या चळवळीत काम करत होती.  आणि ती व्यक्ती म्हणजे श्री. भाऊसाहेब कळंबे.

प्राथमिक शिक्षणाचे तिसरे वर्ष पुरे केलेले (ट्रेन्ड) एक उत्तम गुरूजी, असा त्यांचा पूर्वी लौकिक होता. परंतु क्रांतिकारकांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नोकरी सोडावी लागली होती. डुबल आळीतील प्रसिद्ध असा बाळनाथ बुवाचा मठ हे त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र केले होते. अत्यंत बुद्धिमान, उत्तम वक्ते, उत्तम लेखक असा या गृहस्थांचा लौकिक होता. श्री. जवळकरांनी चालविलेले 'कैवारी' हे वृत्तपत्र या श्री. भाऊसाहेब कळंब्यांनी कराडमध्ये प्रथम प्रसिद्ध करून काही दिवस चालविले होते. नंतर ते मुबंईहून प्रसिद्ध होत असे. बहुजन समाजातील तरुण पिढीला सत्यशोधकीय विचार व संस्कार देण्याच्या हेतूने त्यांचे शिक्षण नव्या पद्धतीने करण्याची गरज आहे, असे मत ते मांडत असत. त्यासाठी त्यांनी आम्ही राहत होतो, त्या गल्लीतील एक मोठा वाडा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी 'विजयाश्रम' या नावाची एक संस्था सुरू  केली. या आश्रमात शिक्षणासाठी राहण्याकरता काही मुलांची त्यांनी निवड केली. माझे मधले बंधू गणपतराव या आश्रमात विद्यार्थी म्हणून राहायला गेले आणि त्यांच्या मनावर त्या विजयाश्रमाचे संस्कार झाले. ते मला तेथे नेहमी काय घडते, ते अधून मधून सांगत असत आणि श्री. भाऊसाहेब कळंब्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे, याची कल्पना देत असत. त्यामुळे आम्ही सर्वजण भारावून जात असू.

श्री. कळंब्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो, तेव्हा एक गोष्ट कबूल केली पाहिजे, की ते खरोखर एक प्रतिभाशाली गृहस्थ होते. परंतु त्यांनी कुठलेही एक काम स्थिर मनाने पुढे नेले नाही. त्यांना अनेक नव्या कल्पना सुचत असत आणि नवी कल्पना सुचली, की जुन्या कल्पनेचा त्याग, ही त्यांची कामाची पद्धत होती. त्यांनी ज्या निर्धाराने ही कामे सुरू केली, ती जर चालू राहिली असती, तर कदाचित त्यांतून एक वेगळीच संघटना आणि वेगळ्या कर्तृत्वाची माणसे निर्माण झाली असती. परंतु ते होणार नव्हते.