कृष्णाकांठ५२ (प्रकरण दुसरे - वैचारिक आंदोलन)

प्रकरण दुसरे - वैचारिक आंदोलन

हरिभाऊ लाड येरवड्याच्या तुरूंगातून परत आले. आम्ही त्यांच्याकडून येरवड्याचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांनी बरेच मजेदार अनुभव सांगितले. त्यांची ही साधी कैद असल्यामुळे त्यांना काही काम करावे लागले नाही. त्यामुळे आरामात बसून तुरूंगातील इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहण्यास त्यांना सवड मिळाली. पण त्यांना वेगळे-एका बाजूस ठेवले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ऐकलेल्या सर्वच गोष्टी आता लक्षात नाहीत. पण त्यांनी सांगितलेली एक आठवण मात्र माझ्या मनाशी पक्की आहे. याच सुमाराला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हेही याच जेलमध्ये कैदेत होते. त्यांनीही चळवळीत भाग घेतला होता. जेलमध्ये असताना हरिभाऊ व विठ्ठल रामजी शिंदे यांची अनेकदा भेट झाली. त्यांच्या शेजारच्या किंवा जवळपासच्या खोलीत हरिभाऊंना ठेवले होते. हरिभाऊ शरीराने अपंग, म्हणून त्यांच्याबद्दल जेलमध्ये सर्वांना सहानुभूती होती. विठ्ठल रामजी शिंदे तर त्यांची फारच आपुलकीने चौकशी करत. ते त्यांना काही तरी वाचायला देत.

या तीस सालच्या चळवळीचे एक वैशिष्ट्य असे आहे, की या चळवळीत ग्रामीण समाजाचा प्रतिनिधी-वर्ग मोठ्या प्रमाणात जेलमध्ये गेला. हे साधे जेलमध्ये जाणे नव्हते, तर स्वातंत्र्याचा चळवळीचे व्रत स्वीकारणे होते. निश्चेष्ट पहुडलेल्या या समाजातून ही माणसे निघाली कशी, असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा अनेक वर्षे चाललेल्या स्वांतत्र्य-चळवळीचा समाजावर झालेला अप्रत्यक्ष परिणाम हे कारण असू शकेल, असे मला वाटते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी व पंडित नेहरूंबद्दल असणारी श्रद्धा हीही कारणीभूत झाली असेल. पण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले, तर हा जो ग्रामीण समाज हलला, त्याचे काही श्रेय विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांना दिले पाहिजे. तीस सालच्या चळवळीत हे दोघेही प्रथमपासून सामील झाले होते. आणि दोघेही कायदेभंग करून कारागृहातही गेले होते. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तरुण मुलांच्या मनावर निश्चित झाला होता. काही तरुण मुलांशी बोलताना मला हे आढळूनही आले होते. माझी वाढ वेगळ्या पद्धतीने झाली असल्यामुळे या दोघांबद्दल माझ्या मनामध्ये आदर होता. विशेषतः, ब्राह्मणेतर चळवळीपासून बाजूला निघून केशवराव जेध्यांसारखा तरुण नेता स्वातंत्र्य-चळवळीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला, याचा आम्हांला आनंद झाला. विठ्ठल रामजी शिंद्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळ्या तऱ्हेचे होते. त्यांची बैठक समाजसुधारकाची आणि काहीशी आध्यात्मिक अशी होती.

हरीभाऊ लाडांना मी एकदा विचारले,

''जेलमध्ये तुमचे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी काही बोलणे झाले का?'' ते म्हणाले,

''थोडे बोलणे झाले, ते मला धीर देत असत.''

विठठल रामजींच्या मनात गांधींबद्दल आत्यंतिक आदर होता, असे त्यांच्या बोलण्यावरून हरिभाऊंना दिसून आले. एवढी माहिती त्यांच्याकडून मला समजली. याच्यापेक्षा त्यात जास्त प्रकाश पडेल, असे काही नव्हते. पण विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांचे महाराष्ट्रातील १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीतले कार्य हे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य आहे, असे माझे मत आहे.

महाराष्ट्रात सत्यशोधक विचाराची एक चळवळ १९२२-२३ सालपर्यंत झाली. त्यावेळी तिच्यामध्ये मूळ ज्योतिबा फुल्यांच्या प्रेरणा कार्य करीत होत्या. जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्या मंडळींशी बोलले, की याची थोडी-फार कल्पना येत असे. त्यानंतरही सत्यशोधक विचाराचा प्रसार करणारे केशवराव विचारे यांच्यासारखी निष्ठावान मंडळी काम करीत होती आणि त्यांना या सामाजिक प्रेरणा अजूनही महत्त्वाच्या वाटत होत्या. पण सत्यशोधक समाजाच्या पाठीमागच्या सामाजिक प्रेरणा कुठे तरी मध्येच गळून पडल्या असाव्यात आणि मुख्यतः जो प्रवाह शिल्लक राहिला, तो ब्राह्मणेतर चळवळीचा. सरकारी नोकऱ्यांमध्ये महत्त्वाचा हिस्सा असावा, राजकीय सत्ता-जी थोडी फार होती, किंवा मिळेल, अशी आशा होती, तीमध्ये योग्य तो वाटा मिळावा, ही त्या चळवळीची ध्येये होती, असे दिसते.