कृष्णाकांठ५५

सहा-आठ महिन्यांपूर्वी मी या मंडळींशी बोलत असताना त्यांची जी एक उदासीनता किंवा विरोध दिसे, तो आता राहिला नव्हता. ते माझ्याकडून चळवळीची वेगवेगळी अंगे समजावून घेऊ लागले. त्यांच्या गावी, घरी येण्याचे मला निमंत्रण देऊ लागले. मग मी इतर कार्यकर्त्यांसह त्यांच्या गावी जाई व चर्चा करी. मी त्यांच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करू लागलो. या निमित्ताने समाजामध्ये चळवळ कशी खोलवर पसरत होती आणि लोकजीवनात कशी मुळे धरत होती, याचा हा अनुभव आहे.

१९३० साल हे माझ्या मताने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य-चळवळीतील इतिहासाचे अतिशय महत्त्वपूर्ण वर्ष आहे. हे मी माझ्या जिल्ह्यापुरते किंवा महाराष्ट्रापुरते म्हणत नाही, तर सर्व देशाच्या दृष्टीने पुढे मी अनेक कार्यकर्त्यांशी बोललो, तेव्हा हे लक्षात आले, की शहरातून स्वराज्याची चळवळ जी खेडेगावांत गेली, ती १९३० च्या आंदोलनात आणि त्यामुळे एक महत्त्वाचा सामाजिक बदल झाला.

हिंदुस्थानच्या सर्व भागातला शेतकरी समाज आता विचारपूर्वक स्वातंत्र्य संग्रामाच्या पाठीशी येऊ लागला होता. महात्मा गांधींची ही मोठी देणगी होती. सबंध समाज त्यांनी ढवळून काढला होता. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हा विचार वरच्या श्रेणीतल्या थोड्या पांढरपेशा विचारवंतांपुरताच मर्यादित न राहता आता तो विस्कळून लांब खेड्यापाड्यांत राहणा-या सहस्त्रावधी सामान्य माणसांपर्यत पोहोचवला गेला होता.

हिंदुस्थानच्या जीवनात जसा या वर्षाने फरक केला, तसाच माझ्याही जीवनात केला. मी आता अनुभवी, विचाराने समजूतदार, असा एक कार्यकर्ता बनलो. आता कामे शोधायच्या मार्गात मी होतो.

माझ्या ओळखी आता तालुक्यात आणि जिल्ह्यात होऊ लागल्या होत्या. नवे मित्र जोडले जात होते आणि एका नव्या मोठ्या कुटुंबाचे आपण सभासद आहोत, अशी भावना मनात वावरत होती. एका नव्या उत्साहाचा अनुभव मी घेत होतो.

हे सारे करीत असतानाच माझी त्या वर्षाची इंग्रजी सहावीची परीक्षा मला द्यायची होती, ती मी घाईघाईत अभ्यास करून कशी तरी दिली; पण शेवटी पास झालो. ही काही छोटी कमाई नव्हती. माझे मित्र आणि घरची माणसे दोघांनीही माझे कौतुक केले.

चळवळीतील सर्व कामे करत असतानाच मी माझी परीक्षा पण पास झालो, याचे सर्वांना आश्चर्य वाटले, पण मला त्यात काही फारसे कठीण वाटले नाही. माझी सर्वसामान्य बुद्धी व समज वाढली होती. मराठी सातवी इयत्ता पास करून इंग्रजी शाळेत आल्यामुळे माझ्या बरोबरीच्या मुलांच्या वयापेक्षा माझे वय थोडे जास्त होते. त्यामुळे अभ्यासाचे विषय शिक्षकांकडून किंवा हुशार विद्यार्थ्यांकडून मी समजावून घेत असे, तेव्हा मला फारसा वेळ लागत असे. परीक्षेत पास होण्याचे खरे कारण हेच असले पाहिजे. पण मला बरे वाटले. या निमित्ताने पुढच्या वर्षाचे काम करायला आता त्यात कोणी अडथळा आणणार नव्हते.

३१ साल उजाडले होते. जेलमध्ये जाणारे लोक परत येत होते. काही नवे जेलमध्ये जात होते. कराडमधून 'ज्ञानप्रकाश'ला एक अनाहूत वार्ताहर म्हणून मी लिहीत असे. हे माझे काम चालूच होते. माझ्या वाट्यास अनेक नवे अनुभव व ओळखी येत होत्या.