कृष्णाकांठ५६

अशा परिस्थितीत याच सुमारास हिंदुस्थानच्या राजकारणातील एक महत्त्वाची घटना घडली. महात्मा गांधींची सुटका झाली. लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींना भेटीचे निमंत्रण दिले. सर्व राजबंद्यांची मुक्तता होऊ लागली होती. गांधींच्या बरोबर काँग्रेस कमिटीच्या सर्व नेत्यांचीही सुटका झाली, आणि हिंदुस्थानातील राजकीय घडामोडींना एक नवा वेग प्राप्त झाला. लोकांचा उत्साह विलक्षण वाढला. शिक्षा संपण्यापूर्वीच जे लोक सुटले, त्यांना तर आपला एक प्रकारचा विजयच झाला, असेच वाटत होते. या सर्व सुटणाऱ्यांत अजूनही बिळाशी भागातील पकडलेले लोक मात्र सुटत नव्हते, याची आम्हां लोकांना चिंता होती. बिळाशी भागातील कार्यकर्त्यांवर सरकारचा विशेष रोष होता. कारण त्यांनी तेथे लोकराज्य स्थापन करण्याचा श्रीगणेशा केला होता.

वर्किंग कमिटीच्या चर्चेनंतर गांधींना लॉर्ड आयर्विन यांनी भेटीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्यामध्ये चर्चा व वाटाघाटी सुरू झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून झळकू लागल्या. या चर्चेच्या अंती महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यांत जो करार झाला, तो हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीचा फार मोठा विजय ठरला. या समेटानंतरच वर उल्लेखिलेल्या काही नेत्यांच्या सुटका झाल्या होत्या. जनआंदोलनाला या प्रकारचे आलेले यश हे जनतेला दुप्पट शक्ती देते. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना जनमनामध्ये एक नवीन आदराचे स्थान प्राप्त झाले.

आता करण्यासारखे विशेष काही नव्हते, म्हणून मी माझी परीक्षा झाल्यानंतर विश्रांतीसाठी आजोळी गेलो. माझे ते आवडते ठिकाण होते. पण या खेपेला जाताना मित्रांकडून आणि लायब्ररीमधून वाचण्यासाठी म्हणून बरीच पुस्तके गोळा करून घेऊन गेलो. जवळ जवळ तीन-चार आठवडे या खेपेला मी देवराष्ट्रामध्ये राहिलो. लहानपणी राहिलो होतो, तेव्हाची माझी दृष्टी आता बदलली होती आणि गावात मागासलेपणा किती आहे, गरिबी किती आहे, याची मला कल्पना येऊ लागली. देवराष्ट्रामध्ये चळवळीचे वारे काहीसे येऊन पोहोचले होते. परंतु गावातले कोणी जेलमध्ये वगैरे गेलेले नव्हते. दहा-पाच तरुण मुले त्या कामामध्ये रस घेणारी होती. ती माझ्याकडे नियमित येऊ लागली व चर्चा करू लागली. मला आठवते, त्यांतला एक पोस्टमन होता. तो रोज माझ्यासाठी नवे वर्तमानपत्र घेऊन येई आणि अनेक गोष्टींची चर्चा करी. माझ्या मामांची काही बागायत शेती होती. थोडी-फार कोरडवाहू शेती होती. म्हणून मी व आमच्या आजोळच्या कुटुंबाचे मित्र म्हस्के यांच्याकडे वहिवाटीला असलेल्या, सोनहि-याच्या काठच्या आंबराईमध्ये जात असे. ओळीने असलेल्या आंब्याच्या झाडांच्या रांगा, त्यांची सुरेख सावली, आंब्याच्या झाडांना आलेला मोहर आणि काहींना लागलेले आंबे आणि त्यांचा येणारा हवाहवासा मंद वास असे मोठे प्रसन्न वातावरण तेथे असे. चैत्र-वैशाखाचे महिने असल्यामुळे आंब्याच्या डहाळीआडून सकाळी-दुपारी-संध्याकाळी ओरडणा-या कोकिळेची गीते. अशा त्या रम्य वातावरणात मी माझे दिवसचे दिवस काढत होतो. सकाळी घरून न्याहरी करून निघावे, दुपारच्या जेवणासाठी थोडेसे बांधून बरोबर घ्यावे, बरोबर आणलेली वाचायची पुस्तके काखेत मारावी आणि आंबराईच्या त्या निसर्गरम्य ठिकाणी पुष्कळ वेळ वाचन, काही वेळ गप्पा आणि मग निवांत झोप, असा दिवसभर माझा छान कार्यक्रम होता.

मी वाचायला नेलेल्या पुस्तकांत बहुतेक कादंबरी होत्या. कादंबरी वाचनाचा माझा नाद जुना आहे. माझा वाचनाचा शौकच मुळी कादंबरीपासून सुरू झाला. हरिभाऊ आपटे यांच्या ऐतिहासिक कादंब-या वाचून झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कादंब-या मी वाचल्या. नाथमाधवांच्या बहुतेक कादंब-या वाचून झाल्या होत्या. या वर्षी मी येताना माझ्याबरोबर 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या हरिभाऊंच्या सामाजिक कादंब-या आणि केतकरांची 'ब्राह्मणकन्या' ही कादंबरी आणली होती.