कृष्णाकांठ४८

''अरे, कुठले घर? आमच्या घरातल्या वडीलधा-या लोकांकडून आमचे हे मूळ गाव समजले व आम्ही मूळचे येथले, असे मी एकले आहे. तेव्हा वाटले, की लिमयांचे हे मूळ ठिकाण पाहावे.''

मी म्हटले,

''आता येथे तुमच्यापैकी कोणी लिमये उरले आहेत, की काय, हे तरी तुम्हांला माहीत आहे काय?''
ते म्हणाले,

''होय. आमच्या मूळ घराण्यापैकी कोणाची तरी एक-दोन घरे येथे आहेत. त्यांची माहिती काढून, ते भेटतात का, पाहू या ! ''

- आणि त्या गावात पोहोचल्यानंतर आम्ही पुन्हा लिमयांची चौकशी केली. आणि अखेर त्यांची भेट झाली. राघूआण्णांनी आपली स्वतःची सविस्तर माहिती त्यांना दिली. त्या मंडळींनी फारसे अगत्य किंवा उत्साह दाखविला नाही; पण अगदीच टाकल्यासारखेही केले नाही.

मी राघुआण्णांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

ते म्हणाले,

''आम्हां कोकणस्थांचा हा मूळ स्वभाव आहे. देशावर तीन-चार पिढ्या गेल्यामुळे मी देशस्थच झालो आहे; पण माझ्यावरून तू येथल्या मंडळींची कल्पना करू नकोस.''

राघूआण्णांच्या बरोबर आम्ही गाव फिरून पाहिले, लिमयांच्या पूर्वीच्या ज्या खोतीच्या जमिनी होत्या, तिकडे चक्कर मारून आलो. आणि दुपारच्या जेवणासाठी राघूआण्णांच्या त्या दूरच्या नातेवाइकांच्या घरी आम्ही पोहोचलो. राघूआण्णांनी माझ्याबद्दल आधीच सांगून ठेवले होते, की मी मराठा आहे. तेव्हा त्यांच्या घरात सोप्यात माझ्यासाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती. आणि त्या मंडळींची आत स्वतंत्र व्यवस्था होती. हा प्रकार पाहून राघूआण्णा काहीसे ओशाळले. त्यांनी आपल्या लिमये नातेवाइकांना सांगितले.

''तुम्ही आत जेवा, मी आणि यशवंत बाहेरच जेवायला बसू.''

त्या मंडळींना लिमयांचे बोलणे ऐकून कसेसेच वाटले. पण आता आम्ही त्यांच्या घरीच आलो होतो. त्यामुळे त्यांचा उपाय नव्हता. आम्ही दोघेही बाहेर बसून जेवलो. एक वेळ माझ्या मनात येऊन गेले, की मी या घरात आलो नसतो, तर बरे झाले असते. पण राघूआण्णांनी कशीबशी वेळ मारून नेली.

जेवण झाल्यावर ते गाव सोडून परत साखरप्याला पोहोचलो. तेथून पुढे रत्नागिरीला जायचे ठरले होते. राघूआण्णांनी लिमयांपैकी कोणी रत्नागिरीला आहे काय, याची आधी चौकशी करून घेतली होती आणि त्यांना तशी माहिती मिळालीही होती.

रत्नागिरीला पोहोचल्यानंतर ज्या लिमयांची चौकशी राघूआण्णा आणि मी करत होतो, त्यांच्या घरी गेलो. मला स्वतःला तिथले काहीच माहीत नसल्यामुळे राघूआण्णांच्या पाठोपाठ जाण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा मार्गच नव्हता. याही लिमयांच्या घरी तसाच अनुभव येणार काय, या चिंतेने मी काळजीत होतो. म्हणून राघूआण्णांना मी सांगितले,

''राघूआण्णा, माझ्यामुळे तुम्ही अडचणीत पडू नका. येथे एखाद्या खानावळीत माझी जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करा. तुमची अडचण होऊ देऊ नका.''
ते म्हणाले,

''खरे, रे. पण आपल्याला रत्नागिरीत राहून सावरकरांना भेटायचे आहे ना ? मग कुठे तरी राहण्याची व्यवस्था केलीच पाहिजे. म्हणून मी माझ्या नातेवाइकांची चौकशी करून राहिलो आहे.''