कृष्णाकांठ४९

- आणि चौकशीअंती त्यांचा नातेवाईक सापडला. सुदैवाने हा त्यांचा नातेवाईक नव्या मनूतला होता. त्याने राघूआण्णांचे जितक्या प्रेमाने स्वागत केले, तितक्याच प्रेमाने माझेही स्वागत केले. त्यामुळे रत्नागिरीच्या या लिमयांच्या घरी आम्ही दोन दिवस मोठ्या मोकळेपणाने राहू शकलो.

आमच्या रत्नागिरीच्या भेटीचा उद्देश पुरा करण्यासाठी म्हणून पहिले काही काम केले असेल, तर ते म्हणजे राघूआण्णांना घेऊन रत्नागिरी शहर आणि रत्नागिरीचा समुद्रकिनारा पाहायला गेलो. मि-या बंदराच्या बाजूला जाऊन समुद्र पाहिला, तर चांगले दृश्य पाहायला सापडेल, असे आम्हांला एका स्थानिक इसमाने सांगितले.

बराच वेळ चालत राहिलो आणि....
मी एकदम लख्खदिशी समुद्र पाहिला.

मन हरखून गेले, प्रसन्न झाले. त्याचा केवढा अवाढव्य विस्तार होता ! सकाळच्या प्रहरी शांत वातावरणात समुद्र पाहिला, त्यामुळे त्याचे विशाल रूप कार्तिक-मार्गशीर्ष महिन्यात दिसणा-या निळ्याभोर आकाशासारखे वाटले.

किती तरी वेळ मी आणि राघूआण्णा तेथे सागरतीरी बसून होतो. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. लाटांची धीरगंभीर गाज वातावरणात भरून राहिली होती. समुद्रावरून नजर काढावीशी वाटत नव्हती.

माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिला समुद्र.

समुद्र पाहत बराच वेळ तेथे काढल्यानंतर आम्ही परतलो.

घरी आल्यानंतर राघूआण्णा म्हणाले,

''सावरकरांना भेटण्याची काही व्यवस्था होते काय, पाहून येतो.''

आम्ही ज्या लिमयांच्या घरी उतरलो होतो, त्यांची सावरकरांशी जवळची ओळख होती. त्यांनी मुलाखत ठरवून घेतो, असे सांगितले.

राघूआण्णा परत आले. दुस-या दिवशी सकाळची दहाची वेळ ठरली होती. काय योगायोग आहे ! स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या साहसी व्यक्तिमत्त्वासंबंधी आम्ही कित्येक गोष्टी ऐकल्या होत्या , वाचल्या होत्या. 'श्रद्धानंद' मध्ये प्रसिद्ध होत असलेली त्यांची 'माझी जन्मठेप' ही काळ्या पाण्याच्या शिक्षेची आत्मकहाणी मी अधून मधून वाचली होती. स्वातंत्र्यासाठी बेहोशीने आपले जीवन उधळून टाकणा-या त्या सावरकरांच्या मूर्तीला आपण केव्हा पाहतो, असे होऊन गेले होते.

दुस-या दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही त्यांच्या घराशी गेलो. एक जिना चढून वर गेलो. आम्हांला एका मध्यमशा खोलीत, चार खुर्च्या होत्या, तेथे बसविण्यात आले. आत सावरकरांना कोणी तरी भेटायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत होते. त्यांचा आवाज कानांवर येत होता. ती माणसे उठून गेल्यानंतर आम्हांला भेटण्यासाठी ते बाहेर आले. आम्ही उठून त्यांना नमस्कार केला.