कृष्णाकांठ५१

सावरकरांना बरे वाटले.

नंतर त्यांनी आमचे इतर कुशल विचारले व आम्हांला सदिच्छा दिल्या.

त्यांचा निरोप घेऊन आम्ही त्या घराबाहेर पडलो.

सागर आणि सावरकर हे रत्नागिरीत एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण ह्या भेटीशी कायमची संलग्न झालेली आहे.

दुस-या दिवशी आम्ही चिपळूणमार्गे कराडला पोहोचलो. राघूआण्णांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांना घडलेल्या गोष्टींचा व झालेल्या कामाचा अहवाल द्यावा, असे ठरल्यामुळे मी त्यातून मुक्त झालो. मी समुद्र आणि सावरकर यांची गोष्ट माझ्या मित्रांना केव्हा एकदा सांगेन, असे मला झाले होते.

दुस-या दिवशी संध्याकाळी कृष्णेच्या वाळवंटात आमचा गप्पांचा फड बसला. बिळाशीच्या भेटीपासून समुद्र आणि सावरकर यांच्या दर्शनापर्यंतच्या सगळ्या हकीकती जेव्हा मी माझ्या तरुण मित्रांना सांगितल्या, तेव्हा त्या ते डोळे विस्फारित करून ऐकत होते. बिळाशीतल्या पोलिसांच्या झोपेमुळे आम्ही बचावलो, हे ऐकून ते खूप हसले. पण सावरकरांच्या भेटीच्या हकीकतीमुळे ते माझ्याकडे काहीशा आदराच्या भावनेने पाहू लागले. सावरकरांशी आम्ही प्रत्यक्ष बोललो, हे त्यांना खरेच वाटले नाही. मी जेव्हा ते कसे दिसतात, कसे बोलतात, याचे वर्णन सांगितले, तेव्हा मात्र ते लक्ष लावून ऐकू लागले. आमच्या भेटीचा सारा वृत्तांत व तपशील त्यांना सांगितला, तेव्हा त्यांचा त्यावर विश्वास बसला. मीही, आपण कोणी तरी आहोत, अशा रूबाबात त्यांना हे सगळे सांगत होतो.

ज्या घटनेने मला काही शिकवले आणि माझ्यावर कायमचा परिणाम केला, अशा १९३० सालच्या माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटनांपैकी ही एक घटना आहे.