कृष्णाकांठ४६

त्याप्रमाणे त्या रात्री गुडघ्याच्यावर असलेल्या पाण्यातून वाट काढत आम्ही नदी ओलांडली. रात्रीची वेळ, अनोळखी ठिकाण, निश्चित कुठे जायचे, याची कल्पना नसल्यामुळे वाटणारी अस्वस्थता, अशा परिस्थितीत आम्ही प्रवास करत होतो. पण आमच्यावर सोपविलेली कामगिरी आम्ही इतक्या सहजपणाने पुरी करू शकलो, याचा आंनद आणि आश्चर्य मनामध्ये होते.

नदीच्या पलीकडे गेल्यावर एक गाव लागले. आज मला त्या गावाचे नाव आठवत नाही. गावात प्रवेश करताच आम्हांला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी सांगितले, ''तुम्ही थकला असाल, तुम्हांला खायला दोन भाकरी आणून देतो. त्या तुम्ही खा व देवळात जाऊन झोपा.''

आम्हांला याचीच जरूरी होती. त्याने भाकरी, चटणी आणि कांदा आणून दिला. ते खाऊन आम्ही देवळात झोपी गेलो. गेल्या दोन दिवसांच्या प्रवासाचा व अनुभवाचा विचार करताना मनात हर्ष होत होता. या साहसी जीवनात एक नाट्य होते, रोमांचकारीअनुभव होते. पकडले जाऊन तुरुंगात जाण्याची शक्यता पण होती. पण ती टळली असल्यामुळे मनामध्ये एक नवी उमेद निर्माण झाली. अशा प्रकारचे विचार करत झोपी गेलो.

सकाळी उठून पुढच्या प्रवासाची दिशा आम्ही आखू लागलो. जो कार्यकर्ता आम्हांला रात्री भेटला होता, तो आला, तेव्हा तेथून जवळपास कसे, कुठे जायचे, याची आम्ही थोडी-फार चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले, की कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर मलकापूर नावाचे गाव थोड्या अंतरावर आहे. तास, दोन तासांच्या रस्त्यावर आहे. आम्ही तिकडे जाण्याचे ठरविले. त्या मुलाला त्या गावाकडे जाणारा रस्ता दाखविण्यास सांगितले. वाटेत आम्ही त्याच्याशी इकडच्या-तिकडच्या गप्पागोष्टी केल्या. आम्ही कोण होतो, याची त्याला थोडीफार कल्पना होती. तरी सुद्धा तो आम्हांला सांगू लागला, काल रात्री बिळाशीत फार मोठी सभा झाली आणि मग अशा प्रसंगी जी अतिशयोक्तिपूर्ण वर्णने येतात, तशी तो करू लागला. मला मनातून गंमत वाटत होती.

त्याने दाखविलेल्या रस्त्यावरून आम्ही प्रवास करून दीड-दोन तासांत मलकापूरला पोहोचलो. मलकापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव आहे. माझ्या कल्पनेने त्यावेळी ते एखाद्या छोट्या संस्थानिकाचे कारभाराचे केन्द्र होते. त्यामुळे तेथे व्यापार-उदीम बराचसा होता. ब-यापैकी बाजारपेठ होती. तिला लागूनच मोटार-स्टँडचे पटांगण आणि त्याच्या अवती-भोवती काही छोट्या छोट्या हॉटेल्स्ची गर्दी हे नेहमी दिसणारे दृश्य तेथेही दिसले. तसल्या एका हॉटेलात आम्ही सकाळची न्याहारी केली. आमच्याजवळचे खाण्याचे पदार्थ संपलेले होते आणि आम्हांला खूप भूक लागली होती. खिशात थोडे-फार पैसे होते. त्यामुळे खाण्यासारखे-साधारणतः आवडीचे जे जे पदार्थ दिसले, ते आम्ही थोडे-फार मागविले. त्यानंतर पुढचा दिवस कसा काढायचा, याचा विचार आम्ही करू लागलो. राघूआण्णांनी विचारले,

''आपण आता कोठे जायचे ?''

- आणि तेच पुढे म्हणाले,

''कोल्हापूर मार्गे परत कराडला किंवा मलकापूरहून सरळ खाली कोकणात.''

मी म्हटले,

''कोकणात जाऊन काय करणार ?''

त्यांनी सांगितले,

''येथून घाट ओलांडला, की साखरपे म्हणून गाव लागते, तो लहानसा मोटारींचा अड्डा आहे. त्याच्या शेजारी आमचे लिमयांचे मूळ गाव आहे. तेथे जाऊन लिमयांपैकी कोणी आहे का, ते पाहू. त्यांना भेटून पुढे रत्नागिरीला जावे, असा माझा बेत आहे.''