कृष्णाकांठ२४

आईने एका अर्थाने, आम्हांला तिच्या या विचाराने जीवनाचे एक तत्त्वज्ञानच दिले होते. प्रपंच तीच चालवत होती. त्यामुळे त्यातल्या अडचणी तिला माहीत होत्या. परंतु ती धीर मात्र देत असे आम्हांला.

आईच्या म्हणण्याचा गणपतरावांच्यावर फार परिणाम झाला आणि आपल्या कुटुंबाचे नशीब आपल्या कर्तबगारीने आपण बदलले पाहिजे, असा काही तरी विचार त्यांच्या मनात येऊ लागला. मॅट्रिकच्या वर्गात ते शिकत होते, तेव्हा, आम्ही ज्यांच्या घरी राहत होतो, त्या श्री. डुबल यांच्या कुटुंबातील एक विशेष सुशिक्षित, करते-सवरते तरुण गृहस्थ यांनी एक कल्पना काढली, की शेती करण्यासाठी दूर इंदूर संस्थानात जावे. त्यांनी या योजनेत गणपतरावांना सामील केले. परिस्थिती अशी होती, की इंदूर संस्थानामध्ये बरीचशी अशी शेती होती व ती पडून होती. श्री. बाबुराव डुबल हे त्या तरुणाचे नाव. पुढे ते सैन्यातले मोठे अधिकारी होऊन निवृत्त झाले, त्यांनी या इंदूरच्या जमिनीच्या प्रकरणात तपशीलवार माहिती मिळवली आणि बरेचसे पैसे खर्च करून ती शेती करण्यासाठी इंदूरला जाण्याचे त्यांनी निश्चित केले. गणपतरांवानी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्धार केला. त्यांनी आपला निर्धार आईला व मला सांगितला. थोरल्या बंधुंनाही पत्राने कळविला. भाऊ हे धाडस करतो आहे, त्याला काही हरकत नाही, असे मला वाटले; पण माझ्या आईला त्यांची कल्पना आवडली नव्हती. तिने गणपतरावांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण गणपतरावांनी तिची समजूत काढली,

''असे रखडत जीवन काढण्यापेक्षा अशा प्रकारचे काही तरी नवीन धाडस केले पाहिजे. हे धाडस जर आम्ही आता केले नाही, तर आपण आहो असेच राहू. किती दिवस असे तू आमच्यासाठी कष्ट उपसत राहणार? आम्हांलाच काही तरी केले पाहिजे.''

आईने चर्चा बंद केली आणि जायला परवानगी दिली आणि महिना, दोन महिन्यांच्या तयारीनंतर श्री. बाबुराव डुबल आणि माझे बंधू गणपतराव हे दोघेही इंदूरला जमीन मिळविण्यासाठी गेले.

इंदूरला पोहोचल्यानंतर गणपतरावांची आम्हांला जी पत्रे आली, त्यांत इंदूर संस्थानातल्या एका जिल्ह्यात मरोठ म्हणून एक तालुक्याचे गाव होते. त्याच्या आसपास दीड-दोनशे एकरांचा जमिनीचा एक मोठा हिस्सा त्या दोघांनी शेती करण्यासाठी आपल्या नावावर करून घेतला आहे, असे लिहिले होते. गणपतराव दूर परप्रांती गेल्याने, नाही म्हटले, तरीमला थोडी खंत होती. परंतु धाडस करून ते काही तरी नवीन करत आहेत, याबद्दल अभिमानही वाटत होता. त्यांच्या मार्गात अडचणी येतील, याची कल्पना नव्हती आणि मी कधी फारसा विचारही केला नव्हता. तारुण्यसुलभ असा हा साहसी प्रयत्न होता. परंतु अशा तऱ्हेचे शेतीचे काम करण्यासाठी साधनांची आणि संपत्तीची भरपूर तयारी पाठीमागे लागते. ती या दोघांनीही केली नव्हती. जी थोडी-फार केली होती, ती प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर संपली आणि मग त्यांच्यापुढे अडचणी उभ्या राहिल्या. त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काही पैसे उभे करावे किंवा काय, असा प्रयत्न करण्यासाठी श्री. बाबुराव मरोठहून कराडला परत आले, तेव्हा माझ्या आईला थोडासा धक्का बसला. तिने बाबूरावांना विचारले,

''गणपतची तब्येत कशी आहे? तुम्ही परत आला, त्याला का नाही

आणलेत ? ''

त्यांनी सांगितले,

''मी त्याला तेथे राहायला सांगितले आहे. साधन-सामग्री घेऊन मी पुन्हा परत जाणार आहे.''