कृष्णाकांठ१४३

लोकांमध्ये भावना जागृत झाल्या होत्या. नव्या जाणिवा निर्माण झाल्या होत्या. जसा एखादा विचार जादूने सगळीकडे एकदम पसरावा, तसा 'छोडो भारत'चा संदेश सगळीकडे जाऊन पोहोचला होता, असे मला दिसले. कारण मी बॅग घेऊन चालताना उजाडल्यानंतर मला कोणी तरी पाहिले आणि येऊन विचारले,

''इकडे कुठे जाणार?''

मी त्याला सांगितले,

''जास्त चर्चा करू नका. तुम्हांला यायचे असेल, तर माझ्याबरोबरच चला.''

अनोळखी तरुण माणूस, पण त्याने माझी बॅग घेतली. मी त्याला सांगितले,

''माझ्याबरोबर इंदोलीला चला.''

मध्ये आम्हांला कृष्णा ओलांडून जायचे होते. तेव्हा एके ठिकाणी जेथे उतार होता, अशा ठिकाणी त्या माणसाने मला नेले आणि बराच वेडावाकडा रस्ता काढून आम्ही पेर्ल्याहून सातारा रस्ता ओलांडून इंदोलीच्या आसपास आलो. मी गावाच्या बाहेर थांबून गावातील माहिती काढावयाचा प्रयत्न केला आणि तेथील आमचे कार्यकर्ते पुढारी दिनकरराव निकम यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. बराच वेळ जाऊ दिल्यानंतर दिनकरराव आपल्या एक-दोन मित्रांसह आले आणि आम्ही एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटलो. मी त्यांना मुंबईत काय घडले, याचा इतिहास सांगितला. भविष्यात कोणत्या पद्धतीने काम करावयाचे आहे, याविषयी माझी कल्पना दिली. दिनकररावांना तर आंदोलनाचा कार्यक्रम पहिल्यापासूनच हवा होता. त्यामुळे ते एक प्रकारे उत्सुकच होते. मग तेथून उठून आम्ही एका बाजूच्या शेतीच्या ठिकाणी गेलो. त्यांनी सुचविले,
''गावामध्ये जाऊन लगेच बैठक मारणे ठीक होणार नाही. तुम्ही प्रवास करून आला आहात, तर थोडा विसावा घ्या. मग पुढे काय करावयाचे, याचा आपण विचार करू.''

या तऱ्हेने माझ्या भूमिगत जीवनाचा श्रीगणेशा झाला. याच्यापुढे काय काय करावयाचे, याची मी मनाशी योजना करू लागलो. माझे पहिले काम हे होते, की पहिल्या प्रथम कराडमध्ये जाऊन कराडच्या माझ्या सर्व कार्यकर्त्या मित्रांना नव्या झगड्याचे रूप आणि कार्यक्रमाची रूपरेषा द्यावयाची. ते मी तातडीने केले पाहिजे आहे. तो दिवस मी इंदोलीत काढून दुस-या दिवशी आधी निरोप पाठवून कराडला गेलो.

यावेळी एक गोष्ट सांगितली पाहिजे, की मुंबईतून निघण्यापूर्वी मी सौ. वेणूबाईला एक सविस्तर पत्र लिहून घडलेल्या गोष्टी आणि नवीन येणारे संकटाचे जीवन याची थोडी-फार कल्पना दिली. तिला घेऊन मी एका वादळात शिरत आहे, याबद्दल तिची क्षमा मागितली आणि ते पत्र घरच्या पत्त्यावर पोस्टात टाकून दिले होते. ते तिने वाचल्यानंतर तिला काय वाटले, ते मी नंतर विचारले नाही. परंतु आमच्या घरात आता येऊन तिला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला होता. तिला थोडी-फार कल्पना आली असली पाहिजे.

मी ज्या दिवशी कराडला गेलो, त्या दिवशी, आम्ही ज्या वाड्यात राहत होतो, तेथेच राहणारे आमचे मित्र नाराणराव घाटगे त्यांच्या घरी जाऊन मी माझा मुक्काम केला. गेल्या तीन-चार  दिवसांमध्ये मी इतका प्रवास पायी, सायकलने आणि रेल्वेने केला होता, की एकदम थकून गेलो होतो. मी त्यांना सांगितले, की मला चांगली सहा तास झोप मिळेल, अशी व्यवस्था करा. घाटगे मंडळींनी मी आल्याची बातमी फक्त गणपतरावांना दिली आणि माझी निवांत झोपण्याची व्यवस्था करून ते आपल्या कामाला निघून गेले. मला आठवते, की त्यावेळी मी त्या दिवशी अखंड दहा तास झोपलो होतो. जाग आल्यावर ताजातवाना झालो आणि कामाची आखणी सुरू  केली. शांताराम इनामदार यांना बोलावून घेतले आणि कराडमधील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या रात्री कुठे तरी भेटले पाहिजे आहे, त्याची व्यवस्था करायला सांगितली. शांताराम बापू या योजना करण्यात मोठे तरबेज होते. त्या रात्री आम्ही आमचे वर्गबंधू विंगकर यांचा मोठा वाडा होता, त्या वाड्याच्या माडीवर निरोप पाठवून बैठक घेण्याची व्यवस्था केली. मी त्या रात्री तेथे गेलो, तेव्हा तेथे पंचवीस एक माणसे जमली होती. मी जे सांगत होतो, ते चळवळीचे रूप सगळ्यांना नवीन होते. परंतु  त्यांना आनंद यात होता, की अशा प्रकारच्या चळवळीत प्रत्येकाला काही ना काही काम करता येईल. त्या बैठकीला कराडमधले जुन्यापैकी श्री. वामनराव फडके वकील हे हजर होते, असे मला स्मरते आहे.