मी मराठी सातवी इयत्तेच्या वर्गात शिकत होतो, त्यामुळे मला समज होती. वृत्तपत्र-वाचनाचीही सवय लागली होती. परंतु त्यावेळी जी वृत्तपत्रे मला वाचायला मिळत असत, ती म्हणजे पुण्यात प्रसिद्ध होणारा 'विजयी मराठा' आणि बेळगावाहून प्रसिद्ध होणारा 'राष्ट्रवीर' ही ब्राह्मणेतर चळवळीचा पुरस्कार करणारी होती. ती एकाच व एकांगी विचाराचा परखड प्रचार सतत करत असल्यामुळे त्यांचा थोडा-फार परिणाम मनावर झालेलाच होता.
त्यानंतर तेव्हा मी या संकुचित व दूषित क्षेत्रातून प्रयत्न करून बाहेर पडलो व इतर काही मंडळींच्या संपर्कात आलो, त्यांमध्ये मुद्दामहून उल्लेख केला पाहिजे असे पहिले नाव म्हणजे माझे जुने मित्र हरिभाऊ लाड यांचे. शरीराने ते काहिसे ठेंगू व अपंग आहेत. पण मनाने मोठा धैर्यशाली माणूस, असा त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव आहे. ते आपल्या छोटेखानी दुकानात बाहेरची वृत्तपत्रे घेत असत. त्यामध्ये पुण्या-मुंबईची पत्रे असत. त्यामुळे या माणसाशी संबंध आल्यानंतर बाहेरची वृत्तपत्रे वाचण्याची सोय झाली आणि सवयही लागली. यांमध्ये जसे पुण्याहून प्रसिद्ध होणारे 'मजूर' हे पत्र आम्ही वाचत असू, त्याचप्रमाणे मुंबईहून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक 'श्रद्धानंद' हेही वाचू लागलो. त्यामुळे मनावर अधिक व्यापक स्वरूपाचे संस्कार व्हायला सुरुवात झाली. हरिभाऊ व्यापारी समाजातील होते. त्यामुळे त्यांना ब्राह्मणेतर चळवळीबद्दल फारसे आकर्षण नव्हते. पण त्यांचा त्याला काही विरोधही नव्हता. त्यांच्याशी माझ्या त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मला हे दिसून आले. परंतु त्यांच्या मनात हिंदुत्ववादासंबंधाने काहीसे आकर्षण होते. मी, नाही म्हटले, तरी त्यांच्या या मताला काही काळ पाठिंबा व होकार देत राहिलो. आणि स्थानिक परिस्थितीमध्ये काही वेगळे कार्य सुरू केले पाहिजे, असा त्यांचा-आमचा विचार सुरू झाला. या आमच्या विचारातून आम्ही मुलामुलांनी 'शिवछत्रपती मंडळ' सुरू केले. हरिभाऊ आमच्यापेक्षा वयाने मोठे होते. परिस्थितीने त्या वेळी ते बरे होते. व्यापारी वगैरे मंडळींमध्ये त्यांच्या ओळखीपाळखी होत्या. त्यावेळचे कराडातले प्रसिद्ध पुढारी आणि व्यापारी श्री. गणपतराव ऊर्फ भाऊसाहेब बटाणे यांचा व त्यांचा चांगला घरोबा होता. तेव्हा त्यांच्या मदतीने आम्ही हे काम सुरू केले. श्री. बटाणे यांचे थोरले चिरंजीव शिवाजी बटाणे हेही आमच्या मंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून काम करू लागले. बटाणे यांच्या मंदिरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असे आणि कराडमध्ये त्याला एक प्रतिष्ठाही होती. त्या उत्सवासाठी एक मेळा काढण्याची कल्पना आम्ही मुलांनी ठरवली. आणि मी स्वतः त्या मेळ्यामध्ये वर्ष, दोन वर्ष तरी गाणी गात फिरत होतो. या मेळ्यासाठी काही पदे करून देण्याचाही मी प्रयत्न केला होता, अशी आठवण आहे.
मी ही सर्व गोष्ट यासाठी सांगतो आहे, की ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडून काही केले पाहिजे, अशी जी माझ्या मनाची ओढ सुरू झाली होती, त्याला आता कोठे तरी एक नवे कार्यक्षेत्र मिळाले. नवे मित्र मिळाले आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात मी रममाण होऊन गेलो. त्या सर्व मंडळींशी माझे संबंध पुढे जन्मभर चांगले राहिले. हरीभाऊ आजही आहेत. त्यांनी तुरूंगाच्या अनेक वा-या केल्या. अजून ते थोडे-फार कष्टप्रद आयुष्य काढत आहेत. परंतु त्यांची-माझी ओळख माझ्या मनाला कलाटणी देणा-या महत्त्वाच्या वळणावर झाली, म्हणून ती मला महत्त्वपूर्ण वाटते आणि उल्लेखनीयही वाटते. कारण एका संस्काराच्या चाकोरीतून बाहेर पडून नव्या दिशेने चालण्यास मी या वेळी सुरुवात केली.
आम्ही सुरू केलेला शिवजयंती उत्सव पुढे कित्येक वर्षे चालू राहिला. त्यासाठी व्याख्याने, भजने असे कार्यक्रम आम्ही करत असू. व्याख्यानासाठी कधी कधी बाहेरून लोकांना बोलवत असू. मला आठवते, आम्ही पुण्याच्या 'स्वराज्य' पत्राचे तेव्हाचे संपादक श्री. विनायकराव भुस्कुटे यांना निमंत्रित केले होते. व्याख्याने ही काही तेव्हा लोकप्रिय नव्हती. गणेशोत्सवातल्या मेळ्यांच्या कार्यक्रमांना आणि भजनांच्या कार्यक्रमांना मात्र चांगलीच गर्दी असे. पण व्याख्यानासाठी ओढून ताणून व गोळा करून माणसे आणावी लागत. श्री. भुस्कुटे यांच्या भाषणाला आम्ही कशी तरी पन्नास एक माणसे जमा करू शकलो. परंतु त्यांनी श्रोते कमी आहेत, म्हणून आपल्या व्याख्यानाचा विषय बदलला नाही. किंवा त्यांना जो विषय मांडायचा होता, त्या विषयाच्या मांडणीमध्ये कोठे काटछाटही केली नाही. श्री. विनायकराव भुस्कुटे यांची माझी पहिली ओळख या उत्सवानिमित्ताने झाली. ती पुढे १९३२ साली ते आणि मी एके ठिकाणी जेलमध्ये असताना अधिकपक्की झाली.