कृष्णाकांठ१८

पोवाड्यांच्या कार्यक्रमाप्रमाणेच टाळ आणि मृदंग यांच्या साथीचे संगीत भजन हा एक नवा प्रकार मला अनुभवायला मिळाला. स्वातंत्र्य-संग्रामातील पुढील काळातील माझे एक ज्येष्ठ स्नेही काशिनाथपंत देशमुख यांनी आम्हांला सुचविले,

''आपण या शिवजयंतीच्या कार्यक्रमात भजनाचे कार्यक्रम ठेवू या, त्या क्षेत्रातील नामांकित लोक निमंत्रित करू या.''

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ती सूचना मान्य केली आणि त्यावेळी त्या क्षेत्रात नामवंत असलेले कृष्णा बागणीकर, भागवत हणबरवाडीकर, म्हैसूरकर महाराज, औंधचे आंधळे पण अत्यंत नाणावलेले मृदंगवादक दाजी गुरव यांना आम्ही निमंत्रण दिले. या कार्यक्रमाची जाहिरात छापून प्रसिद्ध केली. गावात आणि आसपासच्या खेड्यांत या जाहिराती वाटल्या. या कार्यक्रमाला थोडा खर्च येणार होता. त्यासाठी आवश्यक ते पैसे श्री. बटाणे कुटुंबीय आणि हरिभाऊ लाड यांच्या प्रयत्नांमुळे उभे करता आले. रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. त्याच्याआधी जवळ जवळ तासभर लोकांची गर्दी तेथे होऊ लागली. खेड्यापाड्यांतून मुद्दामहून लोक आले होते. इस्लामपूर, नेरले या लांबच्या गावांहूनही लोक टोळीटोळीने मुद्दामहून आले होते. मला हे सगळे नवीन होते. गाण्याचा कान मला होता, आणि आहे; परंतु ही संगीत भजने इतकी लोकप्रिय असतील, असे मला वाटले नव्हते. रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि जवळ जवळ पहाटे दोन-अडीच वाजेपर्यंत तो चालू होता. बैठक, अर्थात याला बैठक म्हणायची, की काय, हा वेगळा प्रश्न आहे, फारच रंगली, यात शंका नाही. कृष्णा बागणीकरांनी बागेश्री रागात एक अभंग इतका सुरेख गायला, की त्या जाहीर चौकात बसलेला तो श्रोतृवर्ग अगदी तल्लीन होऊन गेला. आणि तो अभंग जेव्हा संपला, तेव्हा लोकांनी टाळ्यांचा मनमुराद गजर करून पसंती व्यक्त केली.

मी ही लहानशी आठवण अशाकरता देतो, की गायनाच्या क्षेत्रातील महाराष्ट्रीय लोकजीवनातले हे नवे दालन मी प्रथमच पाहत होतो. त्यानंतर पुढे कित्येक वर्षे माझ्या सुटीच्या दिवसांत काशिनाथपंत देशमुखांच्याबरोबर मी अनेक गावी स्थानिक संगीत भजनांच्या बैठकांना जात असे. काही दिवस ही भजने ऐकण्याचा छंदच मला लागला होता, असे म्हटले, तरी चालेल. काही वेळा मी घराबाहेर रात्रीच्या रात्री राही. त्यामुळे आई आणि बंधू गणपतराव दोघेही रुष्ट होत. पण मी जेव्हा त्यांना, मी कुठे व कशाकरता जातो, हे सांगितले, तेव्हा त्यांची काहीशी समजूत पटायची. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष होते, म्हणून त्यांची तक्रार चालूच राही.

हा जसा भजनांचा छंद काही काळ केला, तसाच चैत्र-वैशाखांत गावोगावी होणा-या जत्रांच्या निमित्ताने होणारे तमाशांचे फड पाहण्याचाही छंद मी केला. आमची शाळेतील अशाच काही छंदी मित्रांची एक टोळीच बनली होती. खेड्यांतील तमाशे आणि कुस्त्या आवडीने पाहायचा हा नादच त्यांनी घेतला होता. देवराष्ट्राच्या निमित्ताने मला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी माहिती असली, तरी या जीवनातील सांस्कृतिक बाजू या निमित्ताने समजून येऊ लागली. रामा कुंभार, सावळजचा तातोबा मांग आणि निसरे-नावडीचा एक तमासगीर - आज त्याचे नाव माझ्या लक्षात नाही, या तमासगिरांचे तमाशे आठ-दहा मैलांच्या अंतरावर जेथे असतील, तेथे पाहण्यासाठी आम्ही जात असू. त्यावेळी मी इंग्रजी शाळेत पाचवी-सहावीत असेन. शाळेतील संमेलनाच्या निमित्ताने एकदा बर्नार्ड शॉच्या 'डॉक्टर्स डायलेमा' या नाटकातील एका प्रवेशातले काम मी केले होते. त्या निमित्ताने बर्नार्ड शॉ यांच्या नावाची ओळख झाली होती. या तमाशा बघण्याच्या माझ्या नादात बर्नार्ड शॉच्या नावाचा मी केलेला एक मजेदार उल्लेख मला नेहमी आठवतो.