या ठरावानं विरोधी पक्षाचं समाधान झालं नाही. काँग्रेसच्या हृदयपरिवर्तनाच्या कार्यक्रमाला अव्यवहार्य ठरवून १८ नोव्हेंबरला बंदीहुकूम मोडून प्रचंड मोर्चा असेंब्लीवर धडकरणार असल्याचं जाहीर केलं. या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी स्वीकारलं. शेकडो सत्याग्रहींचा मोर्चा मुंबई असेंब्लीवर सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली येऊन धडकला. अत्रे, मिरजकर, सेनापती बापट यांनी बंदीहुकूम मोडीत काढून त्याचा भंग केला. मोरारजी देसाईंच्या आदेशाचं पालन पोलिसांनी केलं. पोलिसांनी या नेत्यांना अटक केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेले.
मोरारजींनी १८ नोव्हेंबरला कायदेमंडळातील काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची बैठक बोलावली. वगि कमिटीनं त्रिराज्य निर्मितीचा घेतलेला निर्णय या बैठकीत सदस्यांसमोर मांडून पास करून घ्यायचा होता. वगि कमिटीनं ठराव पास करताना मार्गदर्शक आदेशाचं पालन करण्याची तंबी दिल्यानं ठरावाच्या बाजूनं किंवा विरोधात सदस्यांना मत व्यक्त करता आलं नाही. हिरेंनी एक निवेदन तयार करून ते वाचण्याची परवानगी मोरारजी देसाईंकडे मागितली. मोरारजींनी त्यांची मागणी फेटाळली. काँग्रेस १४३, गुजरात ९८, कर्नाटक ४७, मुंबई २७ असे बलाबल होते; पण बहुसंख्य सदस्य महाराष्ट्राच्या विरोधात होते. याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत ठराव फक्त वाचून दाखवण्यात आला. यावर चर्चा झाली नाही. चर्चा न झाल्यानं काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. हा ठराव मंत्रिमंडळाचा ठराव म्हणून मानण्यास काही मंत्र्यांची हरकत होती.
हिरे यांनी १९ नोव्हेंबरला आपल्या निवासस्थानी एक बैठक बोलावली. या बैठकीत ठरावावर मत नोंदविण्यास बंदी घातल्यामुळं नाराज आमदारांनी राजीनामे देण्याचा विचार व्यक्त केला. या बैठकीला देव हजर होते. देव आणि डॉ. नरवणे यांनी हिरे यांची री ओढली. या बैठकीत राजीनामा देण्याच्या विचाराला साहेबांनी विरोध दर्शविला व त्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली.
म्हणाले, ''राजीनाम्याचा मार्ग आपण अवलंबू नये. यातून आपल्यातील बेबनाव श्रेष्ठीच्या निदर्शनास येईल व पक्ष कमकुवत होईल.''
देवगिरीकरांना साहेबांचं म्हणणं पटलं. त्यांनी साहेबांना साथ दिली. त्यांची माहिती होती की, काँग्रेसमधील एक गट तटस्थ किंवा विरोधात जाण्याची शक्यता आहे. देवगिरीकरांच्या या विचारला नाईक-निंबाळकर, गणपतराव तपासे, साठे, बी. डी. देशमुख, मुस्तफा यांचा पाठिंबा होता. साहेबांनी पक्षातील दुफळीबद्दल मोरारजींना कल्पना दिली. पक्षाच्या एकजुटीकरिता काही मार्ग काढण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केलं. यादरम्यान दिल्लीहून पक्षात फूट टाकण्याकरिता ठरावावरील चर्चा पुढे ढकलावी असा आदेश दिला. मोरारजींनी या आदेशाचं पालन केलं.
कायमची तहकुबी मागताना मोरारजींनी श्रेष्ठींकडे मुंबईसंबंधी फेरविचार करण्याकरिता स्थगिती मागावी असं देव यांचं मत होतं. मोरारजी राजकारणातले दुधखुळे निश्चित नव्हते. साहेब, देवगिरीकर, हिरे यांनी याबाबत मोरारजींचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान श्रेष्ठींकडून मोरारजींना संदेश आला की, सदस्यांना या ठरावावर मत व्यक्त करू द्यावं; पण विरोधात मतदान करता येणार नाही. काँग्रेसमधील गोंधळाच्या वातावरणात मोरारजींनी स. का. पाटील यांना हाताशी धरून चौपाटीवर सभेचं आयोजन केलं.