थोरले साहेब - ४५

चव्हाण घराण्यात येऊन मला दीड महिना झाला.  गोकुळावाणी नांदणार्‍या या घरात साहेब क्वचितच थांबत असत.  सारखे मित्रमंडळीच्या गराड्यात राहत.  साहेब मुंबईला होणार्‍या काँग्रेस महाअधिवेशनाला जाणार अशी घरात कुजबूज सुरू झाली.  मला उगीचंच वाटलं, साहेब मुंबईला जाण्याविषयी माझ्याशी बोलतील म्हणून.  माझा भ्रमनिरास झाला.  के. डी. पाटील, आमदार चंद्रोजीराव पाटील, तात्यासाहेब कोरे व इतर कार्यकर्त्यांसह साहेब मुंबईला गेले.  घरातील कामात माझं लक्ष लागेना.  मी घरात इकडून तिकडे विनाकारणच येरझारा घालू लागले.  आईनं बोलावल्याचा आवाज आला.

''वेणूऽऽ'' आई.

''आले हं आई.''  मी
.
''काय गं, काय झालं ?  बरं नाही वाटत का ?  की माहेरची आठवण आली ?'' आई.

''नाही आई, तसं काही नाही.'' मी.

''जाताना यशवंत भेटला नाही म्हणून नाराज झालीस का ?  मीच त्याला सांगितलं, सूनबाईला काही सांगू नको म्हणून.  तू गेल्यावर मी सांगेल तिला सावकाश.''  आई.

माझं आईच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं.  मन जागेवर नव्हतं.  सारखे साहेबांविषयीचे नाही नाही ते विचार मनात येऊ लागले.  माझा जीव कासावीस होऊ लागला.  साहेबांना मुंबईला जाऊन चार-सहा दिवस झाले.  ऑगस्टची ९ तारीख जाऊन १२ तारीख उजाडली.  मुंबईहून काही निरोप नाही.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं गवालिया टँकवरील अधिवेशनात 'भारत छोडो'चा ठराव पास केला.  वर्तमानपत्रात महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद यांना ब्रिटिश सरकानं अटक केल्याच्या बातम्या येऊ लागल्या.  मी या सर्व बाबींचा विचार करीत असतानाच साहेबांचा भाचा - माझ्या नणंदेचा मुलगा बाबुराव कोतवाल मामी... मामी... म्हणून ओरडत पोस्टानं आलेलं एक पाकीट हातात घेऊन माझ्याकडे आले.  त्यांनी ते पाकीट माझ्या हातात दिलं.  पाकीट माझ्याच नावानं होतं.

''मामाचं दिसतंय ?'' बाबुराव.

मी काहीएक न बोलता माझ्या खोलीकडे निघाले.  बाबुराव थोडे हिरमुसल्यासारखे झाले.  कधी एकदा पाकीट फोडून पत्र वाचते असं झालं मला.  एकदाचं पाकीट फोडलं.  पत्र साहेबांचंच निघालं.