थोरले साहेब - ४१

साहेब कराडला आले.  गणपतरावांच्या विरोधात प्रचार कसा करावा हा प्रश्न साहेबांसमोर उभा राहिला.  साहेब खिंडीत सापडले.  रात्रभर विचार केला.  विचाराशी प्रतारणा करायची नाही हा मनाचा कौल साहेबांना मिळाला.  दुसर्‍या दिवशी साहेबांनी काँग्रेसचे उमेदवार रामा बाळा कदम यांच्याकरिता गणपतरावांविरोधात सभा घेतली.  त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.  गणपतराव निवडणुकीत पडले.  काँग्रेसचा उमेदवार रामा बाळा कदम निवडून आला.  साहेब दिवसभर घराकडे फिरकले नाहीत.  दिवेलागण झाली, जेवणवेळ टळून गेली तरी साहेब घरी आले नाहीत.  गणपतरावांनी आईकडे यशवंत दिसत नाही याबद्दल चौकशी केली असता दिवसभर घराकडे आला नसल्याचे आईने सांगितले.  

आईच्या या उत्तरानं गणपतरावांच्या मनात कालवाकालव झाली.  नाही, नाही ते विचार गणपतरावांच्या डोक्यात थैमान घालू लागले.  गणपतराव घराबाहेर पडले.  गावात साहेबांच्या जवळच्या मित्राकडे विचारपूस केली.  त्या मित्रांनाही आश्चर्य वाटलं.  तेही गणपतरावांसोबत साहेबांना शोधू लागले.  शेवटी एके ठिकाणी साहेब एकटेच गुडघ्यात मुंडके घालून बसलेले त्यांना आढळले.  गणपतरावांनी वडीलकीच्या अधिकारानं साहेबांना झाडलं.  

म्हणाले, ''वेडा कुठला ?  अरे पराभव माझा झाला नाही, माझ्या विचारांचा झाला आहे.  यशवंत विजयी झाला नसून, यशवंतच्या विचारांचा विजय झाला आहे.  ही गणपतराव विरुद्ध यशवंत अशी लढाई नव्हती, तर सत्यशोधक विरुद्ध काँग्रेस या दोन विचारांची ती लढाई होती.  चल घरी, आई काळजीत पडली आहे.''

साहेब अपराधी मनानं गणपतरावांच्या मागे मागे चालू लागले.  घरी आले.  दोघा बंधूंनी एकत्र बसून जेवण केलं.  आईनं आपल्या हातानं दोघा भावंडांना जेऊ घातलं.  

आई म्हणाली, ''गणपत, यशवंताला सांभाळ रे बाबा.  त्याच्या पाठीशी थोरल्या भावाप्रमाणं उभा राहा.''

''आई, काळजी करू नकोस.  आता इथून पुढे मी यशवंताच्या विचाराच्या मागे उभा राहील.  त्याच्याच विचारानं सामान्य माणसाचं भलं होईल याची खात्री पटलीय मला.  यशवंत मोठा झालेला पाहायचं मला !''  असं म्हणून गणपतराव आपल्या झोपण्याच्या खोलीकडे निघून गेले.

साहेबांचा रात्रभर डोळा लागला नाही.  गणपतराव किती मोठ्या मनाचे आहेत याची त्यांना जाणीव झाली.  आपल्या भावाची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे ही खूणगाठ साहेबांनी मनाशी बांधली अन् दुसर्‍याच दिवशी साहेब कोल्हापूरला निघून गेले.

१९३८ ला साहेब बी.ए. पास झाले.  पदवी तर मिळाली.  आता पुढे काय ?  कायद्याचा अभ्यास करावा असं साहेबांनी ठरविलं.  त्याअगोदर सातारला किंवा कराडला एखादं वर्तमानपत्र काढावं व संपादक म्हणून समाजप्रबोधनाचं काम करावं असा साहेबांचा विचार होता.  राष्ट्रीय विचारांची एखादी शाळा काढावी व तिथे शिक्षक म्हणून काम करावं असा दुसराही विचार साहेबांच्या मनात घोळत होता.  कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी खर्चाचाही प्रश्न होताच.  मित्रमंडळीनं साहेबांनी कायद्याचं शिक्षण घेण्यासंबंधी विचार करावा, खर्चाचं आम्ही पाहून घेऊ, असं त्यांना सांगितलं.  शेवटी पुण्याला जाऊन एलएल.बी. करायचं साहेबांनी ठरविलं.  राजकारणात राहायचं झाल्यास एलएल.बी.चा उपयोग होऊ शकतो.  थोडंफार उत्पन्नही मिळू शकेल.  तेवढाच घरच्यांना आधार होईल, असेही विचार त्यांच्या डोक्यात आले.